‘अनाजीसेना’च स्‍वराज्‍य आणि भगव्याशी द्रोह करू शकते, उद्धव ठाकरे यांनी गद्दारांवर डागली तोफ

“अनाजी पंतांकडून प्रेरणा घेत एक ‘अनाजीसेना’ आली आहे. स्वराज्याशी द्रोह करणं, भगव्याशी द्रोह करणं, हे अनाजी पंतच करू शकतात”, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गद्दारांवर तोफ डागली आहे. हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आज फोर्ट येथे शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने आयोजित केलेल्या भव्यदिव्य शिवराय संचलन कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी गद्दारांवर हल्लबोल केला आहे.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन 1966 मध्ये हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आपले दैवत आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेणारे आपण त्यांचे शिवसैनिक आहोत. पण प्रत्येक काळातलं आणि प्रत्येक युगातील एक युद्ध असतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज पुन्हा जन्माला येणं अशक्य आहे. पण दुर्दैवाने अनाजी पंत आणि औरंगजेब हे जन्माला येत असतात. तसेच याही काळातही आले आहेत.”

गद्दारांना लक्ष्य करत उद्धव ठाकरे म्हणाले, “आपण जसे शिवप्रेरणा घेऊन शिवसेनेची स्थापना केली. तसेच एका निष्ठेची परंपरा, जवळपास 59 वर्ष म्हणजेच तीन पिढ्या कायम ठेवून त्याच मार्गाने पुढे जात आहोत. तसेच अनाजी पंतांकडून प्रेरणा घेत एक ‘अनाजीसेना’ सुद्धा आली आहे. त्यांचं नाव आजपासून अनाजीसेना. कारण स्वराज्याशी द्रोह करणं, भगव्याशी द्रोह करणं, हे अनाजी पंतच करू शकतात.”

उद्धव ठाकरे म्हणाले पुढे म्हणाले, “दोन दिवसापूर्वी आणखी एका अनाजी पंतांनी मराठी भाषेबद्दल गरळ ओकली होती. त्यांना म्हणा, हातामध्ये भगवा घेतलेले हे मावळे आहेत, हे जिवंत आहेत. यामुळे महाराष्ट्राचा संस्कार, शिवरायांची परंपरा, त्यांचा वारसा, मराठी भाषा संपवण्याचा कोणी कितीही प्रयत्न केला तरी, तुमच्या अनाजी पंतांच्या कितीही पिढ्या जन्माला आल्या तरी, त्यांना हे शक्य होणार नाही.”