फोडा आणि राज्य कराची नीती वापरणाऱ्या भाजपला मी इशारा देतोय की सगळे दिवस सारखे नसतात. उद्याचं येणारं सरकार हे इंडिया आघाडीचं सरकार असेल. ज्या सांगलीला स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी आहे, त्या सांगलीकरांनी आता हातात मशाल घ्या आणि ही हुकूमशाही जाळून टाका, असं आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. सांगली लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते.
यावेळी सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, खूप वर्षांनी सांगलीत आलोय. या सांगलीत शिवसेनाप्रमुखांच्या महाविराट सभाही मला आठवल्या. सांगलीचं मन हे भगवंच आहे. सध्या मी सगळ्या मतदारसंघात आधी माफीच मागतो. कारण आम्हीच मूर्ख होतो, नसतंच लंचाड गळ्यात मारून घेतलं होतं. आता यांचा बुरखा उतरला आणि त्यांचा क्रूर बीभत्स चेहरा सगळ्या जगासमोर आला. आज सगळा देश ते बदनाम करताहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं. खुदीराम बोससारखे कोवळे तरुण देशासाठी फासावर गेले. देश पहिला प्रथम असला पाहिजे. ज्या सांगलीकरांचा इतिहास स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रसिद्ध आहे, त्याच सांगलीकरांसाठी मी आलो आहे. देशाचं स्वातंत्र्य धोक्यात असताना सांगलीकर हुकूमशाहीच्या बाजूने मतदान करणार की लोकशाहीच्या? हा प्रश्न देश तुम्हाला विचारतोय. इंग्रजांनी आपल्याकडच्या गद्दारांना हाताशी धरून शंभर सव्वाशे वर्षं इथे राज्य केलं होतं. आताही तीच परिस्थिती इथे आहे.’
‘आज संपूर्ण महाराष्ट्र लुटला जातोय. त्या लुटीत मी कधीही सहभागी होणार नाही. म्हणून मी भाजपच्या युतीला लाथ मारून बाहेर पडलो. आज सांगलीचे विषय काही केंद्राच्या अखत्यारित आहेत. जे इथून निवडून गेले, त्या काकांना तुम्ही का पाठवलंत, असा प्रश्न आता पडलाय. आम्हाला वाटलं होतं की मोदी पंतप्रधान झाले की सगळे प्रश्न सुटतील. ते प्रश्न काही सुटले नाहीत. उलट आता महाराष्ट्राच्या दौऱ्यात मोदी म्हणताहेत, दहा वर्षं हा ट्रेलर होता, पिक्चर बाकी आहे. हे भीतीदायक वाक्य आहे. दहा वर्षांत महागाई वाढली, पीक कर्ज वाढत चाललं आहे. उत्पन्न दुप्पट होणार होतं… झालं का? अजिबात नाही. निवडणूक रोख्यांमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट नाही झालं, उलट भाजपच्या खात्यात हजारो कोटी रुपये आले. ये तो ट्रेलर था.. पिक्चर अभी बाकी है.. आजपर्यंत यांनी महाराष्ट्र ओरबाडला, उद्योग, वित्तीय केंद्र गुजरातला गेलं. हा फक्त ट्रेलर होता. आता महाराष्ट्राचं नाव गुजरात करणार का? आजपर्यंत महाराष्ट्रावर आलेल्या संकटांच्या वेळी मोदी कधीही महाराष्ट्रात आले नाहीत. महापूर, अवकाळी आली तरी मोदी, शहा महाराष्ट्रात दिसले नाहीत. आता त्यांना कळलंय की महाराष्ट्रात आपलं काही खरं नाही. आपल्या अश्वमेधाचं खेचर महाराष्ट्र रोखणार आणि ते परत पाठवणार.. ‘ अशी जोरदार टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
सांगलीकरांना मतदानाच्या ताकदीचा वापर करण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. ‘या देशाने जागतिक विक्रम केला आहे, तो म्हणजे सर्वाधिक लोकसंख्येचा. 140 कोटींमधला एकच चेहरा आपण पंतप्रधान पदावर बसवणार? दहा वर्षं ही एखाद्या तरुणाच्या आयुष्यातली महत्त्वाची वर्षं आहेत. नोकरी मिळणं दूर राहिलं पण महागाई वाढली. दहा वर्षं उलटूनही आता आपण हीच चूक करणार आहोत का? आपल्याला हा प्रश्न पडलाय की सरकार कोण बदलणार? कोण आहे ताकदवान? तुम्हाला कळलेलं नाही, मोदींपेक्षा ताकदवान तुम्ही आहात, तुमचं एक बोट सरकार बदलू शकतं. आजपर्यं ईडी-आयटी-सीबीआयची मस्ती त्यांनी दाखवली आता ती मस्ती एका बोटाच्या टिचकीने तुम्ही उडवू शकता.’
फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्या भाजपला सज्जड इशारा देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज भाजपला मी इशारा देतोय की तुम्ही ज्या पद्धतीन तोडा फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबली आहे, सगळे दिवस सारखे नसतात. उद्याचं येणारं सरकार हे इंडिया आघाडीचं असेल. इंडिया आघाडीचे 300च्या वर खासदार निवडून आल्याशिवाय राहणार नाही. ज्या सांगलीला स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी आहे, तो सांगलीकर आता हुकूमशाहीविरुद्ध एकजुटीने मशाल पेटवल्याशिवाय राहणार नाही. फक्त मशाल बघायची. हातात मशाल घ्या आणि हुकूमशाही जाळून टाका, असं आवाहन त्यांनी सांगलीकरांना केलं.