गेल्या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत सरकारने आश्वासन दिले होते. त्यावेळी शिवसेनेने समर्थन दिले होते. शिवरायांच्या चरणाला हात लावून शपथ घेणाऱया मुख्यमंत्र्यांनी आता मराठा–ओबीसी संघर्षावरही सर्वमान्य तोडगा काढावा. शिवसेना सोबत राहील.
मिंधे सरकारला ‘खोके’ सरकार म्हणतात, महायुती म्हणतात. पेंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या भाषेमध्ये ‘डबल इंजिन’ सरकार म्हणत असतील, पण ही ‘महागळती’ सरकारे आहेत, ‘लिकेज’ सरकारे आहेत, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. अयोध्येतील राम मंदिराच्या गाभाऱयात लिकेज झाले आहे, पेपरफुटी झाली आहे, तरीही पेंद्र सरकारला लाजलज्जा, शरम नाही, अशी सणसणीत चपराकही त्यांनी लगावली.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. आज पहिल्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ‘शिवालय’ येथे पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी मिंधे सरकारचा चांगलाच समाचार घेतला. महाराष्ट्र ‘खोके’ सरकारला ‘बाय बाय’ म्हणतोय, आपण भरलेल्या किंवा रिकाम्या हृदयाने त्यांना निरोप देऊ या, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
शिवसेनेकडून अधिवेशनात जनतेच्या जीवाभावाचे प्रश्न उपस्थित केले जातील, असे आश्वासन देताना उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आत्महत्येच्या मुद्दय़ावरूनही सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, गेल्या दोनेक वर्षांत सवासहा हजार शेतकऱयांनी आत्महत्या केल्या, म्हणजे रोज नऊ शेतकरी आपले जीवन संपवत आहेत. विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतकऱयांना वालीच उरलेला नाही. एकटय़ा अमरावतीमध्ये रोज एक शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकऱयांना 10 हजार 22 कोटींची नुकसानभरपाई देणे अजून बाकी आहे, जाहीर केलेले आकडे केवळ कागदावरच आहेत, शेतकऱयांच्या हातात प्रत्यक्ष पैसे आलेलेच नाहीत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 1 जानेवारीपासून राज्यात 1046 आत्महत्या झाल्या असून शेतकऱयांना पीक विम्याचे पैसे नीट मिळत नाहीत. काही ठिकाणी तर शेतकऱयांच्या खात्यात अवघे 70 रुपये जमा झाले आहेत, याकडेही उद्धव ठाकरे यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.
मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाऊन अमावास्या, पौर्णिमेला विशेष पीक घेतात
उद्धव ठाकरे यांनी या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समाचार घेतला. राज्यात घटनाबाह्य सरकार अस्तित्वात आले तेव्हा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते की, एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. मुख्यमंत्र्यांचे काय… त्यांची पंचतारांकित शेती आहे. राज्यात नव्हे, तर देशात पहिला शेतकरी असेल जो हेलिकॉप्टरने शेती करायला जातो. अमावास्या, पौर्णिमेला तर विशेष पीक काढत असावेत असे माझ्या कानावर आहे, अशी खिल्लीही उद्धव ठाकरे यांनी उडवली.
भावी पोलिसांना सोयीसुविधा पुरवा
पोलीस भरतीसाठी राज्याच्या कानाकोपऱयातून मुंबईत आलेल्या तरुणांची गैरसोय होत आहे. तो मुद्दाही या वेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, पोलीस भरती सुरू आहे. 17,500 जागांसाठी 17 लाखांवर अर्ज आले आहेत, पण त्यांना राहण्यासाठी सोयीसुविधा नाहीत. गावागावांतून तरुण येत आहेत. माताभगिनींच्या रक्षणासाठी जे तरुण पोलीस होऊ शकतात त्यांना सोयीसुविधा पुरवा, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी या वेळी केली.
दुधाची भुकटी शुल्क माफ करून आयात केली जात आहे. सूर्यफूल, मोहरीचे तीन लाख टन तेलही आयात शुल्क न लावता आणले जातेय. मिंधे सरकारच्या या धोरणामुळे शेतकऱयांचे नुकसान होत आहे याकडेही उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले.
महायुतीच्या अपयशाच्या धन्याचा चेहरा समोर येऊ द्या
महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर आणावा असे स्पष्ट मत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मांडले. त्याबाबत विचारणा झाली असता ‘‘महाराष्ट्र हाच महाविकास आघाडीचा चेहरा आहे. आधी महायुतीच्या अपयशाच्या धन्याचा चेहरा समोर येऊ द्या. मग आमच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करू,’’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
विधान परिषदेत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा एकेक आमदार जिंकू शकतो
विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीबाबत पत्रकारांनी विचारले असता ‘‘विधान परिषदेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार जिंकून येऊ शकतो’’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. पुढची पॅल्क्युलेशन्स सांगण्यासारखी नसतात, पण निवडणूक गमतीशीर होणार असून पेढे गुप्तपणाने कोण कोणाला भरवतोय तेसुद्धा कळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना विधिमंडळ गटनेते अजय चौधरी, मुख्य प्रतोद सुनील प्रभू उपस्थित होते.
पुढच्या चर्चा लिफ्टमध्ये करू
विधिमंडळात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस लिफ्टमध्ये एकत्र होते. त्याबाबत माध्यमांनी विचारले असता उद्धव ठाकरे यांनी अत्यंत मिश्कील शब्दांत उत्तर दिले. ते म्हणाले की, अनेकांना वाटले असेल ‘ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे…’ पण ती योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती. नाना पटोलेंशीही त्या भेटीचा संबंध नाही. काही चर्चा झाली नाही. लिफ्टच्या भिंतीला कान नसतात. त्यामुळे पुढील चर्चा आम्ही लिफ्टमध्ये करू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
View this post on Instagram
थापा खूप झाल्या, निवडणुकीपूर्वी शेतकऱयांना कर्जमुक्त करा
शेपटावरती निभावले आणि कसेबसे पेंद्रात एनडीए सरकार परत आले. त्यांच्या लेखी असलेली महाशक्ती तिकडे विराजमान झाली आहे. आता थापा खूप झाल्या. ज्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री असताना आपण दोन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज माफ केले होते, तशी शेतकऱयांना तत्काळ कर्जमुक्ती करून निवडणुकीच्या आत त्याची अंमलबजावणी करावी, अशी शिवसेनेची जाहीर मागणी आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या कर्जमुक्तीची अंमलबजावणीही केली, परंतु दुर्दैवाने कोरोना संकट आले. नुसत्या घोषणा करण्यापेक्षा आधी अंमलबजावणी करा आणि नंतर निवडणुकीला सामोरे जा, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. पुण्यात एका पंत्राटदाराने शेतकऱयावर बंदूक रोखली, पण सरकारला त्याकडे बघायलाच वेळ नाही, जनतेला कुणी वालीच नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
पुणे ड्रग्जप्रकरणी सभागृहात आवाज उठवणार
पुण्यात पह्फावलेल्या ड्रग्ज संस्कृतीबद्दल माध्यमांनी सवाल केला असता सरकार सत्तेच्या नशेत धुंद आहे, पण शिवसेना ड्रग्जविरुद्ध सभागृहात आवाज उठवेल असे उद्धव ठाकरे म्हणाले. ड्रग्ज प्रकरणावरून सरकारला खेचायचे आहे. हे ड्रग्ज गुजरातमधील एकाच पोर्टवरून महाराष्ट्रात येतात. राज्यातील केमिकल्सचे कारखाने हे ड्रग्जचे सोर्स आहेत का? मग उद्योगमंत्री काय करतात? बंद कारखान्यांचे इन्स्पेक्शन करतात का? असा बोचरा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. आम्ही प्रश्न विचारतोय म्हणून ‘‘तुमच्या काळात जास्त ड्रग्ज सापडले’’ असे फालतू उत्तर देण्यापेक्षा ड्रग्ज प्रकरणावर सर्वांनी एकत्र येऊन हे प्रकरण खणून काढले पाहिजे, असे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.
फडणवीसांचे खोटे नरेटिव्ह
उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातच सर्वाधिक पेपरफुटी झाल्याचे फडणवीस म्हणाले होते. त्यावर ‘‘खोटे नरेटिव्ह यालाच म्हणतात’’ असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. माझ्या मुख्यमंत्री पदाच्या काळात कोरोना होता. पेपरफुटीचा विषय आला तेव्हा आम्ही तो पेपर रद्द करून दुसरा पेपर घेतला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दोन वर्षांतील घोषणांच्या अंमलबजावणीची श्वेतपत्रिका काढा
घोषणा खूप झाल्यात. घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असतो. गेल्या दोन वर्षांतील घोषणांची किती पूर्तता झाली हे या घटनाबाह्य सरकारने खरेपणाने सांगावे, त्याची श्वेतपत्रिका काढावी, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी मिंधे सरकारला दिले. यांची श्वेतपत्रिका म्हणजे कोरा कागद असेल याची खात्री असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
यांचा तर गाजर अर्थसंकल्प; पुन्हा घोषणांचा पाऊस पाडतील
आजपासून सुरू झालेले अधिवेशन खोके सरकारच्या निरोपाचे अधिवेशन आहे, असा पुनरुच्चार करत उद्धव ठाकरे यांनी हल्ला चढवला, उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यात घोषणांचा पाऊस पडेल. पण तो गाजर संकल्प असणार आहे. निधी खर्चच होणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
लोढा टॉवरमध्ये मराठी माणसांना 50 टक्के घरे द्या!
मुंबईतील नवीन इमारतींमध्ये मराठी माणसांना 50 टक्के घरे राखून ठेवणारे अशासकीय विधेयक अनिल परब यांनी विधिमंडळात सादर केले. त्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाने रक्त सांडून मुंबई मिळवली. त्यामुळे त्याला घरे मिळालीच पाहिजेत. मंगलप्रभात लोढा मुंबई महापालिकेत येऊन बसतात, मग लोढा टॉवरमधील 50 टक्के घरे मराठी माणसाला द्या. महाविकास आघाडीचे सरकार पाडले नसते तर मराठी माणसाला मुंबईत घर दिलेच असते, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
‘लाडकी बहीण’ योजना आणताय, मग ‘लाडका भाऊ’ही आणा
मध्य प्रदेशात ‘लाडली बहन’ योजना आहे तशी मिंधे सरकार ‘लाडकी बहीण’ योजना आणणार आहे, पण सरकारने असा मुलगा-मुलगी भेदभाव करू नये. ‘लाडका भाऊ’ म्हणूनही योजना आणावी, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला. ‘लाडकी बहीण’ योजना आणलीत तर चंद्रपुरात बहीणभावाच्या नात्याबद्दल हिणकस वक्तव्य करणाऱया सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे त्या योजनेची अंमलबजावणी देऊ नका, असेही ते म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दल आश्वासन दिले होते. आज मला चॉकलेट देऊन गेले, पण अशी योजनेची चॉकलेट जनतेला देऊ नका. जनता आता भोळी राहिलेली नाही. लोकसभा निवडणुकीत लोकांनी दाखवून दिले आहे. गाजर दाखवणे बंद करा, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.