आदिवासींच्या प्रश्नांवर उद्या मुंबईत राज्यस्तरीय बैठक; शरद पवार, उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन

आदिवासींच्या विविध प्रश्नांवर मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एका राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

आदिवासी विकास केंद्राकडून शुक्रवारी 5 जुलै रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सकाळी 10 ते दुपारी 4 यावेळेत बैठक आयोजित केली आहे. यावेळी आदिवासी क्षेत्रातील शिक्षण, आरोग्य, पोषण, उपजीविका, रोजगार, जल, जंगल, जमीन, स्वशासन कायदा यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वयंसेवी संस्था यांच्या राज्यस्तरीय संवादाचे आयोजन केले आहे. या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. या संवादामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कार्यरत सामाजिक संस्थेतील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

या संवादातील व चर्चेतील अनुषंगाने महाराष्ट्रातील 100 संघटना /संस्थांचे प्रतिनिधी आरोग्य, शिक्षण, उपजिवीका, नैसर्गिक संसाधनांचा अधिकार या विषयांवर आजची स्थिती आणि लोकांचे प्रश्न व त्यावर जनतेचा जाहीरनामा काय असेल यावर चर्चा करणार आहेत. या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी दुपारी 2 ते 3.30 वाजता पत्रकाद्वारे उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे. यावेळी सकाळी बैठकीमध्ये गटचर्चा होऊन विविध विषयांवर जनतेचा जाहीरनामा तयार करून तो दुपारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडला जाणार आहे. या बेठकीमध्ये सहभागी होऊन आलेल्या संघटनेच्या लोकांना मार्गदर्शन करण्याची विनंती पत्रकाद्वारे करण्यात आली आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांचीही उपस्थित असणार आहे, असे म्हटले आहे.