संसदेच्या अधिवेशनानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी मारकडवाडीत जाणार; संजय राऊत यांची माहिती

मारकडवाडी हे देशात लोकशाहीच्या लढ्याचे उदाहरण झाले आहे असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच संसदेच्या अधिवेशनानंतर मारकडवाडीत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी जाणार आहेत असेही संजय राऊत म्हणाले.

द वायरला मुलाखत देताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात गावागावातले लोक रस्त्यावर उतरले आहेत. गावागावातल्या ग्रामपंचायतींनी मागणी केली आहे की मतपत्रिकेवर निवडणुका घ्या. सोलापुरात मारकडवाडी हे गाव चर्चेत आहे. तिथे विरोधी पक्षाचा उमेदवार उत्तमराव जानकर जिंकून आले आहेत. तरी त्यांनी पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. विक्रोळीतून सुनिल राऊत यांचा विजय झाला आहे, तरी त्यांनी पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. जिंकल्यानंतरही काही उमेदवारांनी म्हटलं आहे की आमचे मताधिक्य घटले आहे.

 

तसेच लोकांनी सांगितलं की हा निर्णय आमचा नाहीये. आमचा निर्णय वेगळाच आहे. काही उमेदवार हरलेत त्यांचंही म्हणणं आहे की आम्ही हरू शकत नाही. अनेक दिग्गज या निवडणुकीत हरले. मोदींची एवढी मोठी लाट असताना काही लोक हरले नाहीत. आता अशी काही लाट नसताना काहींचा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीतही अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न झाला. जर असे झाले नसते तर आम्ही 40 जागा जिंकलो असतो. विधानसभेत आम्ही 150 ते 160 जागा जिंकण्याचा आम्हाला खात्री होती. तशी आम्ही मेहनतही घेतली होती. लोक म्हणतात की हा आमचा निर्णय नाही, हा आमचा वोट पॅटर्न नाही. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत काँटे की टक्कर होती. आम्ही 230 ते 240 जागा जिंकू असा आम्हाला अंदाज होता, पण संपूर्ण विरोधी पक्ष मिळून 50 जागाही जिंकू शकलो नाही असा निर्णय महाराष्ट्रात येऊच शकत नाही. आमचा पक्ष फुटला, शरद पवार यांचा पक्ष फुटला, तरी लोकसभा निवडणुकीत आम्हाला चांगल्या जागा मिळाल्या. मग विधानसभा निवडणुकीत अशी आमच्याकडून काय चूक झाली की लोकांनी आम्हाला नाकारलं? लोक तर विधानसभा निवडणुकीची वाट बघत होते, त्यांना परिवर्तन हवं होतं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अशी कोणती त्यांनी बाजी मारली? लाडकी बहीण सारख्या त्यांनी योजना राबवल्या. पण दीड हजार रुपयांची कुणीही वोट विकत नाही घेऊ शकत. आधी आम्ही ईव्हीएमवर संशय घेतला नव्हता. पण विधानसभेचा निकाल आल्यानंतर आम्हाला वाटलं की काहीतरी गडबड आहे. गावागावातले लोक बोलत आहेत की आम्ही एका उमेदवाराला मतदान केलं होतं पण नाही मिळाले. जर तसे झाले नसेल तर मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची त्यांनी मागणी केली आहे. मारकडवाडीत मतपत्रिकेवर मॉक निवडणूक होणार होती. पण ती रोखली गेली आणि कलम 144 लागू केलं गेलं. जर काही चुकीचं नसेल तर घाबरण्याचे कारण काय? ते यासाठी घाबरले की जर यात काही दुसरा निर्णय आला तर ते उघडे पडतील. आणि हे एकदा मारकडवाडीत झालं ते दुसऱ्या गावात होईल. त्यानंतर महाराष्ट्रातल्या शेकडो गावात ही ठिणगी पडेल. मारकडवाडीप्रमाणे ही चळवळ उभी राहिली पाहिजे. संसदेचे अधिवेशन झाल्यानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी मारकडवाडीला भेट देतील. मारकडवाडी हे देशात लोकशाहीच्या लढ्याचे उदाहरण झाले आहे. संपूर्ण देशातच नव्हे तर संयुक्त राष्ट्रसंघानेही याची दखल घेतली आहे. देशाची लोकशाही वाचवण्यासाठी एका गावाने ही लढाई सुरू केली आहे हा संदेश सगळीकडे पोहोचला आहे असेही राऊत म्हणाले.