बटेंगे तो कटेंगेवाल्यांची आता फटेंगी झालीय; उद्धव ठाकरे यांच्या कल्याण, डोंबिवली, ठाण्यात दणदणीत सभा

बटेंगे तो कटेंगे म्हणणारी भाजप महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तो में बाटेंगे हे कारस्थानही करत आहे. धर्माधर्मात आणि जाती-जातीत तेढ वाढवून त्यावर मतांची लूट करण्याचा आणि महाराष्ट्र अदानीच्या घशात घालण्याचा त्यांचा डाव आहे. पण लोकसभेच्या निकालानंतर बटेंगे तो कटेंगेवाल्यांची आता फटेंगी झाली आहे, असा जबरदस्त घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. लोकसभा निवडणुकीत हुकूमशहाला गुडघ्यावर आणले, आता विधानसभा निवडणुकीत त्यांना आणि त्यांचे बूट चाटणाऱया मिंध्यांना पाताळात गाडणारच, असा वज्रनिर्धार उद्धव ठाकरे यांनी केला.

कल्याण पूर्व विधानसभेचे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय बोडारे, कल्याण पश्चिमेचे सचिन बासरे, डोंबिवली विधानसभेचे उमेदवार दीपेश म्हात्रे, अंबरनाथचे उमेदवार राजेश वानखेडे, कल्याण ग्रामीण विधानसभेचे उमेदवार सुभाष भोईर, ऐरोलीचे उमेदवार एम.के. मढवी, कोपरी-पाचपाखाडीचे उमेदवार केदार दिघे, ओवळा-माजीवडय़ाचे उमेदवार नरेश मणेरा आणि ठाण्याचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या कल्याणच्या दादासाहेब गायकवाड, डोंबिवलीचे भागशाळा मैदान आणि ठाण्यातील गडकरी चौकात प्रचंड गर्दीच्या तीन दणदणीत सभा झाल्या. या सभांत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला ओरबाडणारा भाजप आणि दिल्लीची हुजरेगिरी करणाऱया मिंधेंची अक्षरशः सालटी काढली.

आताचा भाजप हा निष्ठा आणि स्वाभिमान हरवलेला संकरीत भाजप आहे. लोकांची घरं पह्डणाऱया आणि ती पेटवणाऱया भाजपच्या गर्भात आता इतर पक्षांची बीजे रुजली आहेत. संघाच्या कार्यकर्त्यांनी घरं सोडून अविवाहित राहून भाजप उभारला. पण आताच्या भाजपने संघालाही दूर केले आहे. नड्डा म्हणतात, संघाची गरज नाही. मग कार्यकर्त्यांनी आपले आयुष्य पणाला लावले ते याच संकरीत भाजपसाठी का

पुढची तयारी म्हणजे मोठी गद्दारी

भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी कल्याण, डोंबिवलीच्या वाट लागलेल्या रस्त्यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, कल्याणमध्ये येताना ट्रफिक तशीच आहे. खड्डे तसेच आहेत. धूळही तशीच आहे. मिंधेंनी फक्त मोठमोठे होर्डिंग लावलेत ‘केले काम भारी… आता पुढची तयारी’. यांची पुढची तयारी म्हणजे मोठी गद्दारी. खोके खालेल्याची लाज नाही, हरामखोरी केल्याची शरम नाही, पैशांच्या माजोरीची लाजलज्जा नाही. यांनी नुसत्या जाहिरातीवर किती खर्च केला हे पाहिले तरी लक्षात येईल की, कोणी किती पैसा खाल्ला आहे. खरं तर असले होर्डिंग लावण्याची त्यांना लाज वाटली पाहिजे, असे फटकारेही उद्धव ठाकरे यांनी लगावले.

महाराष्ट्र लुटू देत नव्हतो म्हणून सरकार पाडले

महाराष्ट्र खड्डय़ात घातला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी ही मशाल पेटणार आहे. महाराष्ट्र को लूटेंगे और दोस्तो मे बाटांगे हा नारा देणाऱयांच्या विरोधात मी उतरलो आहे. मी त्यांना महाराष्ट्र लुटू देत नव्हतो. त्यामुळे त्यांनी माझे सरकार पाडले. दाढीवाल्याला सगळ्यात आधी मी मंत्रीपद दिले. अन्यथा ते मुख्यमंत्री झाले नसते. गद्दारी करुन मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मुलालाही खासदारकीच्या बोहल्यावर मी चढविले. एवढं देऊनसुद्धा ते गद्दार निघाले. आपल्यावरच वार करत आहेत आणि महाराष्ट्र विकून दिल्लीची चाकरी करताहेत.

मोदी-शहांच्या करंटेपणामुळे आणि मिंधेंच्या बुटचाटेपणामुळे महाराष्ट्राचे नुकसान

महाविकास आघाडी सरकारच्या काळात आणि तेही कोरोनाच्या संकटात टाटा एअरबस, मेडिकल डिव्हाईस पार्क, बल्क ड्रग पार्क, वेदांता फॉक्सकॉन सेमी पंडक्टर प्रकल्पांचे सामंजस्य करार केले. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात पाच लाख तरुणांना रोजगार मिळाला असता. पण मोदी-शहांच्या करंटेपणामुळे आणि मिंधेंच्या बुटचाटेपणामुळे हे प्रकल्प गुजरातमध्ये गेले. महाराष्ट्राचे अतोनात नुकसान करणाऱया भाजप-मिंधेला पुन्हा निवडून देणार का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला तेव्हा गर्दीतून नाही.. नाही.. असा आवाज आला.

टरबूज कधी धर्मयुद्ध करतो का?

डोंबिवलीतील सभेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मतांचे धर्मयुद्ध करण्याच्या घोषणेचा समाचार घेतला. ते म्हणाले, भाजपचं हिंदुत्वच खोटं आहे. घर पेटवणे सोपे असते, घर चालवणे कठीण. देवेंद्र फडणवीस म्हणतात मतांचं धर्मयुद्ध करा. त्यांचं हे वाक्य आयोगाच्या आचारसंहितेत बसतं का? आमच्या मशाल गीतातून जय भवानी, जय शिवाजी काढायला सांगता आणि धर्मयुद्ध करा असे लोकांना सांगता, टरबूज कधी धर्मयुद्ध करू शकतो का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी ह्यांचा कडेलोटच केला असता असे फटकारे उद्धव ठाकरे यांनी लगावले. महाराष्ट्रातील पाणी अदानीला, शाळा अदानीला, जमीन अदानीला. मोदी, शहा, फडणवीस आणि मिंधेंना महाराष्ट्राचे नाव अदानी राष्ट्र करायचे आहे काय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

लुटारुंना खडी पह्डायला पाठवणार

विकासाच्या नावाखाली मिंध्यांनी फक्त स्वतःच्या आणि ठेकेदारांच्या घरात संपत्तीची भर केली. ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकांची लूट केली. आता मुंबई महापालिकेवर डोळा आहे. पण राज्याचा कारभार हाती आला तर यांना खडी पह्डायला पाठविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

यावेळी सौ. रश्मी उद्धव ठाकरे, शिवसेना सचिव विनायक राऊत, उपनेते विजय साळवी, अल्ताफ शेख, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, कल्याण जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, माजी महापौर रमेश जाधव, महिला संघटक वैशाली दरेकर, माजी महापौर पुंडलिक म्हात्रे, संपर्कप्रमुख प्रकाश वाणी, संतोष जाधव, कल्याण शहर प्रमुख शरद पाटील, जयेश वाणी, काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे, जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, संतोष केणे, राष्ट्रवादीचे वंडार पाटील, प्रकाश तरे, ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, महिला संघटक रेखा खोपकर, समीधा मोहिते, माजी नगरसेवक संजय तरे, धर्मराज्य पक्षाचे राजन राजे, काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई, खांदेश सेनेचे सुहास बोंडे, समाजवादी पार्टीचे रामकेवल यादव यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मनसेची झाली ‘गुनसे’…

लोकसभा निवडणुकीत मनसेने नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. त्याचा उल्लेख करून उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, मनसेने गेल्या वेळेस ‘सशर्ट’ पाठिंबा दिला. आता ‘शर्टइन’ पाठिंबा दिला आहे. आधी तुमची भूमिका स्पष्ट करा. मनसेची आता गुनसे म्हणजे ‘गुजरात नवनिर्माण सेना’ झाली असल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.

दाढीवाल्या.. होशील का उपमुख्यमंत्री

अमित शहा यांनी सत्ता आली तर भाजपचा मुख्यमंत्री होईल अशी घोषणा केली. तोच धागा पकडून उद्धव ठाकरे म्हणाले, मग दाढीवाल्याला विचारा की, जसे देवेंद्र फडणवीसने उपमुख्यमंत्री म्हणून काम केले तसे दाढीवाल्या, तू होशील का उपमुख्यमंत्री, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, महाराष्ट्र गद्दारांचा कडेलोट करतो आणि तो या निवडणुकीत होणारच.

मुन्ना महाडिक, माझ्या बहिणींना हात लावून दाखव. तुझे हात छाटून टाकतो

लाडकी बहीण योजनेवरून महिलांना दमदाटी करणाऱया भाजपच्या नेत्यांचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. कोल्हापूरच्या सभेत भाजपचा खासदार मुन्ना महाडिक उघडपणे म्हणाला, या महिलांचे पह्टो काढून ठेवा, आमच्याकडून पैसे घ्यायचे आणि त्यांच्या सभेत जायचे. हे चालणार नाही… अरे मुन्ना, तू आहेस तरी कोण? माझ्या सभेला माता-भगिनींची प्रचंड गर्दी होते. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर मुन्ना तुझा हात जागेवर ठेवणार नाही छाटून टाकेन, असा इशाराच त्यांनी दिला.

मिंध्यांच्या बुडाला मशाल लावली तर महाराष्ट्र गद्दारमुक्त होईल

ठाण्यातील जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी गद्दारांना सोलून काढले. ते म्हणाले की, शिवसेनेचे ठाणे व ठाण्याची शिवसेना हे नाते तुम्ही ठाणेकरांनीच जोडले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे म्हणून सर्वत्र ओळखले जाते. पण मिंध्यांनी ठाण्याला गद्दारीचा कलंक लावला. शिवसेनेची मशाल पेटवून गद्दारांचा हा भ्रष्ट कारभार जाळून भस्म करा आणि ठाण्यावर लागलेला गद्दारीचा कलंक कायमचा पुसून टाका असे आवाहन करतानाच मिंध्यांच्या बुडाला मशाल लावली तर महाराष्ट्र गद्दारमुक्त होईल, असा टोलाही त्यांनी लगावला.

आता चुकलो तर महाराष्ट्र खड्डय़ात गेलाच म्हणून समजा

आताची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्तित्वाची आहे. हा महाराष्ट्र मिंधे-भाजपने खड्डय़ात घातला आहे. आता जर चुकलो तर हा महाराष्ट्र कायमचा खड्डय़ात गेलाच म्हणून समजा अशी धोक्याची घंटा उद्धव ठाकरे यांनी वाजवली.