
समाजपुरुषाला सहस्र डोळे आहेत. तो सगळे पाहतो. त्याला सहस्र पाय आहेत. त्या पायांनी चालतो. मात्र समाजपुरुष बोलू शकत नाही. त्याचे बोलणे शब्दबद्ध करण्याची गरज असते. हे काम साहित्यिक व पत्रकार करतात. लेखणी, वाणी ही साहित्यिक व पत्रकारांची हत्यारे आहेत. याच जोरावर आम्ही समाजाचे अवलोकन करतो आणि ते लिहितो. प्रभाकर पवार यांनी अशाच प्रकारे समाजातील नकारात्मक बाजूवर लिहिण्याचे शिवधनुष्य पेललेय, जिवाची पर्वा न करता गुन्हेगारीवर लिहिण्याचे धाडस केलेय, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक ‘पद्मश्री’ मधु मंगेश कर्णिक यांनी ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार यांचे कौतुक केले.
ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार यांच्या ‘मी पाहिलेला तीन दशकांतील थरार’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याला ज्येष्ठ साहित्यिक ‘पद्मश्री’ मधु मंगेश कर्णिक, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, ज्येष्ठ पत्रकार, ‘पद्मश्री’ कुमार केतकर आदी मान्यवर उपस्थित होते.
गुन्हेविषयक पत्रकारिता करताना तीन दशकांत पाहिलेल्या अंडरवर्ल्डच्या थरारावर आधारित ‘थरार’ पुस्तक प्रभाकर पवार यांनी लिहिले. पप्पू प्राची प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडला. या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ साहित्यिक ‘पद्मश्री’ मधु मंगेश कर्णिक, दै. ‘सामना’चे कार्यकारी संपादक व खासदार संजय राऊत, माजी खासदार-‘पद्मश्री’ कुमार केतकर, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते ‘थरार’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर मधु मंगेश कर्णिक यांनी समाजातील साहित्यिक आणि पत्रकारांच्या योगदानावर मत व्यक्त केले.
प्रभाकर पवार यांनी वेगळ्या तऱ्हेचे, वेगळ्या विषयावरील पुस्तक लिहिले आहे. वाचावे व विचार करावा, असे त्यांचे लेखन आहे. समाजपुरुषाची वेगळी बाजू लिहिली आहे. त्यांनी समाजाच्या ज्या नकारात्मक बाजूबद्दल लिहिले आहे त्या विषयावर लिहिण्याचे धाडस मी कधी केले नाही, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले. सोहळ्याला उपस्थित मान्यवरांनी प्रभाकर पवार यांच्या निर्भीड लेखन प्रवासाचे कौतुक केले. प्रभाकर पवार यांनी पत्रकारितेच्या प्रवासात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्याकडून नवीन ऊर्जा मिळाल्याची तसेच मोलाची साथ लाभल्याची कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासावर आधारित चित्रफीतही दाखवण्यात आली. सोहळ्याचे सूत्रसंचालन संदीप चोणकर यांनी केले.
राजकारण म्हणजे अंडरवर्ल्ड झालेय – संजय राऊत
गेल्या दहा वर्षांत देशात राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालेय. देशाच्या गृहमंत्र्यांवर तडीपारीच्या केसेस आहेत. गुन्हेगारीचा प्रवास दाऊद इब्राहिमपासून बीडपर्यंत म्हणजे राजकारणापर्यंत पोहोचला असून राजकारण म्हणजे अंडरवर्ल्ड झालेय, असे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये तर अंडरवर्ल्डच आहे, अशीही टीका त्यांनी केली. आपण क्राइम रिपोर्टिंग करत होतो त्या काळात अंडरवर्ल्ड होते. माफिया करीमलाला आणि हाजी मस्तान यांची समांतर सरकारे चालायची. सरकारी अधिकारी आणि हायकोर्टाचे जजही त्यांच्याकडे कामे घेऊन जायचे आणि कायद्याने न होणारी कामे त्यांच्याकरवी व्हायची, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पुस्तक लिहिणाऱ्यांबद्दल आपल्या मनात नेहमीच आदराची भावना राहिली आहे. तुरुंगात असताना केलेल्या लेखनावर ‘नरकातला स्वर्ग’ हे आपले पुस्तक लवकरच येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘थरार’ पुस्तक ‘ग्रंथ’ म्हणून वाचले पाहिजे – कुमार केतकर
क्राईमचे बदललेले स्वरूप प्रभाकर पवार यांनी 30-35 वर्षांतील पत्रकारितेच्या काळात जवळून पाहिले. त्यामुळे त्या गुन्हेगारीचे विश्लेषण करताना प्रभाकर पवार त्यांना कोणतीही अडचण वाटत नाही, भीतीही वाटत नाही. एवढा काळ गुन्हेगारी पत्रकारिता करणारा माणूस हयात आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांनी क्राईमबद्दल लिहिताना सभ्यता आवर्जून पाळली आहे. ते आदर्श पत्रकार आहेत. गुन्हे पत्रकारिता कशी करायची याचे धडे देणारे हे पुस्तक आहे. नवोदित पत्रकारांनी ‘थरार’ पुस्तक एक ग्रंथ म्हणून वाचले पाहिजे, असे माजी खासदार ‘पद्मश्री’ कुमार केतकर यांनी पवार यांच्या पुस्तकाची भरभरून प्रशंसा करताना म्हटले. आपल्या देशातील ‘राफेल जेट’ प्रकरणही तितकेच गंभीर आहे. त्याविरोधात मीडियाने निर्भीड वृत्तांकन केले असते तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागला असता. मोदी-शहा अमेरिकेतील शास्त्र वापरताहेत, अशी बोचरी टीका कुमार केतकर यांनी केली.