उद्धव ठाकरे यांची 14 नोव्हेंबरला संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी सभा, अंबादास दानवे यांची माहिती

खोक्याच्या बळावर आम्ही निवडणूक लढवत नाही तर आमच्या संघटनेच्या ताकदीवर आम्ही निवडणूक लढवतो असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केले. तसेच 14 नोव्हेंबरला सांयकाळी सहा वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे अशी माहिती दानवे यांनी दिली.

 

आज संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा दानवे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची सभा संभाजीनगरमध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. 9 उमेदवारांच्या प्रचारासाठी होणाऱ्या ही सभा त्यात महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा समावेश आहे. 14 नोव्हेंबरला सांयकाळी ही सभा होईल. गेल्या वेळी जसे यश मिळाले होते. तसे या वेळी 9 पैकी 9 जागांवर आम्ही यश मिळवू. आमचे सर्व उमेदवार ताकदीचे आहेत. आम्ही पैशांच्या प्रलोभनावर, खोक्याच्या आधारावर निवडणूक लढवत नाही. आम्ही आमच्य संघटनेच्या ताकदीवर आणि बळावर ही निवडणूक लढवत आहोत असे दानवे म्हणाले.

तसेच या निवडणुकीत खोट्या घोषणा आणि खोटी आश्वासनं दिली जातात. देवेंद्र फडणवीस इथे आले होते आणि पाणी देऊ असे आश्वासन त्यांनी दिले. खरंतर हे पाणी मिळू नये असे प्रयत्न या सरकारने केले होते. भाजप फेक नॅरेटिव्ह सांगत आहेत, पण उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना पाणी पुरवठ्यासाठी निधी देण्याचे कबुल केले होते. आता या सरकारने या योजनेला महानगरपालिकेला कुठलेही सहकार्य करायचे नाही अशी भुमिका घेतली आहे. अखेर सॉफ्ट लोन द्वारे ज्याचा हफ्ता 25 कोटी रुपये असणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी हे खोटं मत एका सभेत सांगतलं होतं असेही दानवे म्हणाले.