भांडणे, वाद असतील तर मिटवू; महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यावर राज–उद्धव ठाकरे यांची सहमती

महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी माणसांसाठी आता तरी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असल्याची सडेतोड भूमिका आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली. मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरेंसोबत असलेली किरकोळ भांडणे, वाद बाजूला ठेवून एकत्र काम करण्यास आपण तयार असल्याचे सूतोवाच देताच देशाच्या राजकारणात अक्षरशः उलथापालथच झाली. मुळात आमच्यामध्ये काही भांडणे नव्हतीच, मात्र ती असतील तर चला, आजपासून ही भांडणे मिटवून टाकली, असेही त्यांनी जाहीर केले.

भांडणं मिटवून टाकली. आता सर्वात आधी महाराष्ट्राचे हित कशात आहे हे ठरवा. मराठी माणसांनी ठरवायचे आहे की, आता आपले हित कुणासोबत जाण्यात आहे. मराठी माणसांनी ठरवायचे की भाजपसोबत जायचे की शिवसेनेसोबत. शिवसेना म्हणजे ‘एसंशि’ नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. माझ्याबरोबर यायचं की भाजपबरोबर? काय पाठिंबा द्यायचा आहे किंवा विरोध करायचा आहे तो बिनशर्त करा. माझी काही हरकत नाही. पण महाराष्ट्राचे हित ही एकच शर्त आहे. बाकीच्या चोरांच्या गाठीभेटी आणि कळत नकळत पाठिंबा द्यायचा नाही. त्यांचा प्रचार करायचा नाही, अशी पहिली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्यायची आणि मग टाळी देण्याची हाळी द्यायची ते ठरवावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

सक्ती कराल तर उखडून टाकू

पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करून करायचेय तरी काय, असा प्रश्न विचारताच संपूर्ण सभागृहाने ‘विरोध करायचा’ असा प्रतिसाद दिला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही प्रेमाने सर्व ऐकू; पण सक्ती कराल तर तुमच्यासकट उखडून फेकू, असा इशारा सरकारला दिला.

भीतीपोटी हिंदीची सक्ती

मुंबईतल्या अमराठी लोकांना मराठी शिकवण्याचा उपक्रम शिवसेनेने सुरू केला आहे. ‘चला मराठी शिकूया’ उपक्रमाला प्रतिसाद मिळत असल्याचे समजताच सत्ताधाऱयांच्या पोटात भीतीने गोळा यायला सुरुवात झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला. कशाला हिंदीची सक्ती पाहिजे असेही ते म्हणाले. फडणवीस साहेब, तुम्ही आमच्यातून जे काही गद्दार घेतले आहेत त्यांना हिंदीच काय, पण मराठी सक्तीचे करा. त्यांचे मराठी म्हणजे काय आहे तुम्हाला माहिती आहेच. तुमचे सहकारी चांगले सुशिक्षित आणि तेवढय़ा क्षमतेचे आहेत का, असाही सवाल केला.

‘इस राज्य मे रहेना होगा तो ‘जय महाराष्ट्र’ बोलना होगा’

महाराष्ट्राच्या मारेकऱयांची सुपारी घेणारे हे सरकार आहे का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात आल्यावर ‘मराठी नही आती’, ‘मराठी लोक गंदे है’, ‘नॉनव्हेज खाते है’ असे बोलतात. पण मी आजपासून सांगतो की, ‘इस देश मे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा’ तसेच ‘इस राज्य मे रहेना होगा तो ‘जय महाराष्ट्र’ बोलना होगा’. (सभागृहात टाळय़ांचा एकच कडकडाट झाला आणि ‘शिवसेना झिंदाबाद’चा नारा घुमला.)

घाटकोपरमध्ये मराठीची सक्ती करा

शिवसेनाप्रमुखांना तेव्हाही सवाल विचारला जात होता की, तुम्ही मराठी-मराठी करता मग हिंदुत्व कसे? अरे पण आम्ही अस्सल मराठी धर्म पाळणारे हिंदू आहोत, मग दुसरा हिंदू असतो तरी कसा, असा सवालही त्यांनी केला. संघाचे जोशी ज्या घाटकोपरमध्ये बोलले होते त्या घाटकोपरमध्ये मराठीची सक्ती करून दाखवा. घाटकोपरमध्ये मराठी आलेच पाहिजे. हिंदीचे जे काय असेल ते आम्ही बघून घेतो, पण मुंबईत मराठी यायलाच हवे, असे ते म्हणाले. आम्ही कोणत्या भाषेचा दुस्वास करीत नाही, उलट आम्ही मराठी बोला सांगतो. आमच्याबरोबर बस सांगतो. अनेक जण मराठी बोलतात. काही उत्तर भारतीय आहेत. मुस्लिम तर आपल्यासोबत आलेच आहेत. आम्ही एका बाजूने हे धोरण स्वीकारणार, मग तुम्ही काडय़ा करून आगी कशाला लावत आहात, असा टोलाही त्यांनी लगावला.

तामीळनाडूत हिंदीचा ‘हि’ बोलून दाखवा

बेळगाव-कारवारमध्ये मराठीवर अन्याय करणारे आमच्याकडे हिंदीची सक्ती करीत आहेत. तामीळनाडूत स्टॅलिन बसलेत. तिकडे जाऊन हिंदीतील ‘हि’ बोलून दाखवा, असे आव्हानच त्यांनी दिले.

महाराष्ट्रात मराठी भाषाच

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुभाष देसाई मराठी भाषा मंत्री होते आणि मी मुख्यमंत्री होतो. पहिलीपासून मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय हा माझ्या नेतृत्वाखालील सरकारने घेतला याचा मला अभिमान आहे. जो महाराष्ट्रात राहील त्याला मराठी भाषा आलीच पाहिजे. ही सक्ती असलीच पाहिजे. मात्र तुम्ही हिंदीची सक्ती करीत असाल तर आम्ही होऊ देणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

महाराष्ट्रात ‘जय महाराष्ट्र’ बोलावेच लागेल

सर्व दुकानांच्या पाटय़ा मराठीत लिहिण्याचा आम्ही कायदा केला आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी करायची आहे. पण काही नतद्रष्ट तर याच्या विरोधात कोर्टात गेले. अरे इथे राहता, इथलं मीठ खाता आणि मराठी भाषेला विरोध करता? आपले सरकार असताना कोणाची हिंमत होत नव्हती; पण एसंशिने आपले सरकार गद्दारी करून पाडले. सरकार पाडल्यानंतर गद्दार त्यांच्या पालख्या वाहत आहेत आणि मराठीवर अन्याय करणाऱयांचे पाय चाटत आहेत. हे काय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेणार, असा टोलाही त्यांनी लगावला.

साद

महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यात असलेले वाद, भांडणे ही अत्यंत क्षुल्लक आणि किरकोळ आहेत. त्यामुळे एकत्र येणे आणि एकत्र राहणे यात काही कठीण असल्याचे मला वाटत नाही, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत मांडली. ते पुढे म्हणाले, पण प्रश्न फक्त इच्छाशक्तीचा आहे. कारण हा केवळ माझ्या एकटय़ाच्या इच्छेचा विषय नाही. मला वाटतं की, आता ‘लार्जर पिक्चर’ बघणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील सर्व राजकीय लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा.

राज ठाकरे यांच्या पॉडकास्ट मुलाखतीत अभिनेता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी त्यांना उद्धव ठाकरेंसोबत एकत्र काम करणार का, असा प्रश्न विचारला. शिवाय सध्याची राजकीय स्थिती पाहता, ठाकरे बंधूंना एकत्र येण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. बहुतांशी शिवसैनिक, मनसे कार्यकर्त्यांची भावनाही हीच असल्याकडे तुम्ही कसे पाहता, यावर राज ठाकरे यांनी आपली ठाम भूमिका मांडली.

आपला महाराष्ट्र खूप मोठा आहे. इतक्या मोठय़ा राज्यासमोर आमची भांडणं, वाद अत्यंत क्षुल्लक आणि किरकोळ आहेत. त्यामुळे एकत्र येणे आणि एकत्र राहणं अनिवार्य झालं आहे आणि यात काही कठीण आहे असे आपल्याला वाटत नाही. मात्र याठिकाणी प्रश्न फक्त इच्छाशक्तीचा आहे. कारण हा केवळ माझ्या एकटय़ाच्या इच्छेचा विषय नाही. मला वाटतं की, आता ‘लार्जर पिक्चर’ बघणं गरजेचे आहे. महाराष्ट्रातील सर्व राजकीय लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले.

प्रतिसाद

किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मीदेखील तयार आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे, असा प्रतिसाद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या आवाहनाला दिला. आमच्यात काही भांडणे नव्हतीच. चला, ती असली तरी आता मिटवून टाकली, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले. मात्र सगळे उद्योग गुजरातला नेले जात असल्याचे मी लोकसभा निवडणुकीवेळी वारंवार सांगूनही लक्ष दिले नाही. तेव्हाच त्यांनी भाजपला विरोध केला असता तर आज पेंद्रात आणि राज्यातही महाराष्ट्रहिताचं सरकार बसू शकलं असतं. तेव्हा त्यांना पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा आणि मग तडजोड करायची हे असं चालणार नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

माझी भूमिका महाराष्ट्रहिताची आहे. महाराष्ट्राच्या शत्रूशी हातमिळवणी मला कदापि मान्य नाही. महाराष्ट्राच्या हिताआड येणाऱयाला मी घरात घेणार नाही. त्यांच्या पंगतीला बसणार नाही, त्यांचे आगतस्वागत करणार नाही हा निश्चय करा. या चोरांचा प्रचार करायचा नाही. महाराष्ट्रहितासाठी ही एक एवढीच शर्त आहे. हे असे होणार नाही अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं घ्या शपथ. बोला, महाराष्ट्रहितासाठी करताय हे? मी टाळी द्यायला तयार आहे!