Maharashtra Monsoon Session : हे लिकेज सरकार, उद्या अर्थसंकल्प नव्हे तर ‘गाजर संकल्प’ असेल; उद्धव ठाकरे बरसले

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत शिवालय येथे पत्रकार परिषद घेत राज्यातल्या महायुती सरकारवर तोफ डागली. घटनाबाह्य सरकारचा उद्याचा अर्थसंकल्प हा गाजर संकल्प असेल, असा भीमटोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. यासोबतच शेतकरी कर्जमाफी करावी, लाडकी बहीण योजनेसोबतच लाडका भाऊ योजना आणावी, अशा मागण्या उद्धव ठाकरे यांनी केल्या.

या सरकारचं निरोप घेण्याचं अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र या खोके सरकारला बाय बाय म्हणतोय. निरोपाच्या अधिवेशनात सरकारकडून काही घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्याच कदाचित काही घोषणा होतील, अशी शक्यता आहे. केंद्रात आणि प्रत्येक राज्यात अर्थसंकल्प सादर केला जातो. आणि त्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने ज्या योजना अथवा घोषणा त्यात समाविष्ट असतात त्यासाठी आर्थिक तरतूद केली जाते. अर्थसंकल्पात जो काही घोषणांचा पाऊस पडेल ते पाहता हा गाजर संकल्प असणार आहे. कारण निधी खर्चच होणार नाही. घोषणा आजपर्यंत खूप झाल्या. घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. या सरकारला जराही संवेदना असतील तर ज्या घोषणा केल्या त्याची पूर्तता किती झाली एवढं त्यांनी खरेपणाने उद्या नीट सांगितलं, तरी ते खूप असेल.

हे महायुती सरकार… हे खोके सरकार आहे. हे डबल इंजिन सरकार नव्हे तर महागळती सरकार आहे. हे लिकेज सरकार आहे. कारण राम मंदिराच्या गाभाऱ्यात गळती होत आहे. पेपरफुटी झाली आहे. पेपरही लिक होताहेत आहेत आणि मंदिरही. यांना लाज, लज्जा, शरम काही नाही. आम्ही काही प्रश्न विचारले किंवा विषय मांडले की ते आमच्यावर आरोप करत आहेत. अधिवेशनात आम्ही महाराष्ट्राच्या जनेतेचे प्रश्न उपस्थित करू, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला घेरले.

एकूण आताची जी काही परिस्थिती आहे, ती राज्यातले शेतकरी भोगताहेत. उदाहरण घेतलं तर अमरावती जिल्ह्यात सरासरी रोज एक शेतकरी आत्महत्या होत आहे. हे घटनाबाह्य सरकार अस्तित्वात आलं तेव्हा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होती की यापुढे एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यांची पंचतारांकीत शेती आहे. राज्यात नव्हे तर देशात असा दुसरा कोणी शेतकरी नसेल जो हेलिकॉप्टरने स्वतःच्या शेतात जातो. आणि पंचतारांकी शेती करतो. विशेषतः अमावस्या आणि पौर्णिमेला वेगळं पिक काढतो, असे ऐकलं आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

‘शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा’

शेतकऱ्याची हालत गंभीर आहे. पाऊस म्हणावा तसा सुरू झालेला नाही. महाराष्ट्रात अजूनही अनेक गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्याबद्दल यांना कुठलीही संवेदना नाही. एकंदर पाहिलं तर जवळपास सव्वासहा हजार आत्महत्या या गेल्या दोन वर्षांत झालेल्या आहेत. साधरणतः रोज नऊ शेतकरी आपलं आयुष्य संपवत आहेत. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही. 10 हजार 22 कोटींची नुकसान भरपाई बाकी आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही पैसे आलेले नाहीत. पिक विम्याचे पैसे मिळत नाहीत. एक रुपयात पिक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात सत्तार रुपये जमा झाले आहेत. हे सगळं चित्र विचित्र सुरू आहे. तुमचं आता डबल इंजिन सरकार आलेलं आहे. शेपटावरती निभावलं आणि कसं बसं एनडीए सरकार दुर्दैवाने आपल्या देशात परत आलेलं आहे. त्यांच्या लेखी असलेली महाशक्ती पुन्हा विराजमान झालेली आहे. मी मुख्यमंत्री झाल्यावर नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनात दोन लाखापर्यंतची पीक कर्जाची रक्कम माफ केली होती. कर्जमुक्त केलं होतं. यानुसार एकूण तुमच्या या थापा खूप झाल्या. नुसत्या घोषणा खूप झाल्या. अजूनही तीन साडेतीन महिने निवडणुकीला आहेत. तात्काळ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीच्या आत तुम्ही ती अंमलबजावणी करा, अशी जोरदार मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

आम्ही कर्जमुक्तीची घोषणा पूर्ण केली. दुर्दैवाने त्या काळात कोरोनाचे संकट आले. त्यामुळे 50 हजार रुपये प्रोत्साहन रक्कम म्हणून जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत त्यांना देऊ शकलो नव्हतो. कारण नंतर यांनी गद्दारी करून सरकार पाडलं. पण ती रक्कम यांनी अडवून ठेवली आहे. नुसत्या घोषणा करू नका. अंमलबजावणी करा आणि मग निवडणुकीला सामोरं जा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.

‘लाडकी बहीण योजनेचं स्वागत, लाडका भाऊ योजनाही आणा’

मध्य प्रदेशात लाडली बहना अशी योजना आहे. तशीच महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना हे सरकार आणतंय, असं ऐकलं आहे. लाडकी बहीण योजना आणताय. मग तुम्ही मुली आणि मुलांमध्ये भेदभाव करू नका. लाडका भाऊ म्हणून योजना आणा. मुलींप्रमाणे मुलांनाही मदत करा. कारण एकूणच महाराष्ट्रात इतकी वाईट परिस्थिती कधी आली नव्हती. सध्या पोलीस भरती सुरू आहे. पोलीस भरतीत साडेसतरा हजार जागा असताना सतरा लाखांहून अधिक तरुणांनी अर्ज केलेत. भरतीसाठी गावागावातून जे तरुण येतात त्यांना सोयीसुविधाही दिल्या गेल्या नाहीत. अनेक ठिकाणी तरुण मुंबईत पुलाखाली काही ठिकाणी झाडाखाली झोपत आहेत. कोणतीही सुविधा त्यांना नाहीये. हे सर्व बघितलं तर बेकारी वाढत चालली आहे. त्यांना दिलासा द्यायचा असेल तर तुमचं डबल इंजिन सरकारची म्हणजेच केंद्रातल्या सरकारची मदत घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं. लाडकी बहीण योजनेचं आम्ही स्वागत करतो. मात्र लाडका भाऊ योजनाही आणा. जसं माता भगिनींना लाभ देताय तसं भावांनाही द्या. तुम्ही भेदभाव करू नका. दोघांसाठी योजना तुम्ही आणा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

‘मुलींच्या मोफत शिक्षणाचं चॉकलेट’

मुलींच्या मोफत शिक्षणाचं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं. आज मला भेटून ते चॉकलेट देऊन गेले. तसंच त्या योजनेचं चॉकलेट त्यांनी दिलं होतं. ते पोकळ ठरलं. आता योजनांची चॉकलेटं देऊ नका. कारण लोकांची सहनशक्ती संपलेली आहे. लोकसभेच्या निकालातून हे स्पष्ट झालेलं आहे. जनता भोळी नाही, कोणीही यावं आणि गाजर दाखवून आपलं काम करून घ्यावं, असं राहिलेल नाही. या योजनेची अंमलबजावणी करावी. लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजना आणल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे देऊ नका. त्यांचं चंद्रपूरचं भयानक हिणसक भाषण ऐकलं की अंगावर शहारा येतो, असा भीमटोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.