
मुख्यमंत्री जर पारदर्शी कारभार करत असतील तर, त्यांचं स्वागत आहे. पण पारदर्शी कारभार करताना त्यांचे हात कोणी बांधतंय का? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया देताना त्यांनी हा सवाल उपस्थित केला आहे.
आज माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ”धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल जे बोलायचं आहे ते शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी बोलून झालं आहे. पण सर्वांना प्रश्न पडला आहे की, काल जे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत, हे आधी सरकारकडे आले होते की नव्हते. मुंडे यांच्या राजीनाम्याचा आणि एकूण चर्चेचा पहिलाच दिवस झाला असून हळूहळू आणखी विषय पुढे येत जातील. रोज तसं पाहिलं तर, सरकारच्या भानगडी बाहेर येत आहेत. मला असं वाटतं की, मुख्यमंत्री जर पारदर्शी कारभार करत असतील तर, त्यांचं स्वागत आहे. पण पारदर्शी कारभार करताना त्यांचे हात कोणी बांधतंय का? हा सुद्धा एक प्रश्न आहे. महाराष्ट्रातील जनतेला या सगळ्याचा गोष्टींचा वीट आलाय, कंटाळा आलाय. त्यांना त्यांच्या व्यथा सोडवणारे सरकार हवं आहे. एकमेकांच्या व्यथेला पांघरून घालणारे हे सरकार महाराष्ट्राला नकोय. आमची सुद्धा हीच अपेक्षा आहे की, विरोधी पक्ष म्हणून चांगलं राज्य घडवण्यासाठी सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे फोटो खूप आधी आले होते, मात्र त्यांनी हे दाबून ठेवलं होतं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, ”या प्रश्नाचं उत्तर स्वतः मुख्यमंत्री यांनी द्यायला हवं.” ते म्हणाले, ”डिसेंबरपासून ही घटना गाजत आहे. यातच धनंजय मुंडे यांनी राजीनामा देताना तब्येतीचं कारण दिलं. मी त्यांच्या तब्येतीबद्दल कोणतंही भाष्य करणार नाही. कारण कोणीही कोणाच्याही तब्येतीबद्दल, प्रकृती अस्वास्थाबद्दल चेष्टा, टवाळी करू नये. जशी आमच्यातून जे गेले त्यांनी माझ्या प्रकृतीबद्दल केली होती. पण मी एक संस्कार पाळणार आहे, म्हणून मी कोणाच्याही प्रकृती अस्वास्थाबद्दल चेष्टा करणार नाही. मात्र राजीनाम्याचा खरं कारण काय आहे? धनंजय मुंडे यांनी सांगितलं की, त्यांनी प्रकृती अस्वस्थ असल्याने राजीनामा दिला. त्याच वेळी अजित पवार यांनी असं म्हटलं आहे की, त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे. जर त्यांनी प्रकृती अस्वास्थामुळे राजीनामा दिला असेल तर, इतके फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर सुद्धा त्यांचा राजीनामा का घेण्यात आला नाही. याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे.”
शिवसेनेचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा, उद्धव ठाकरे यांच्याकडून भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस
उद्धव ठाकरे म्हणले की, ”धनंजय मुंडे यांनी राजीनामा काय कारणाने दिलं, याचं उत्तर समोर आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी नेमक्या अधिवेशन काळातच बाहेर कशा आल्या? दोन महिने या गोष्टी होत्या तर, बाहेर का आल्या नव्हत्या. तसेच जर या गोष्टी यांच्यापर्यंत (मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री) पोहोचल्या असतील तर त्याचवेळा यांचा राजीनामा का घेतला गेला नाही?”, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.