
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे पत्र विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांना सुपूर्द केले.
वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी 28 फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना आमदारांची बैठक झाली. त्या बैठकीत यासंदर्भात ठराव संमत करण्यात आला होता. त्या ठरावानुसार सर्व आमदारांनी विरोधी पक्षनेत्याचे नाव ठरवण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांना दिले आणि त्या नावाची शिफारस विधानसभा अध्यक्षांकडे करण्यास सर्वानुमते मान्यता दिली होती. उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची भेट घेऊन तसे पत्र त्यांना दिले.
उद्धव ठाकरे यांनी त्यानंतर विधान भवन आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधून यासंदर्भात माहिती दिली. शिवसेनेच्या वतीने विरोधी पक्षनेतेपदावर आज दावा करण्यात आला असून भास्कर जाधव यांचे नाव त्या पदासाठी सुचवण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्षांना तसे पत्र दिले असून लोकशाही मूल्यांचे पालन करून ते लवकरात लवकर त्यावर निर्णय घेतील, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्चला मांडला जाणार आहे. त्यावेळी जनतेच्या वतीने बोलायला विरोधी पक्षनेता हवा म्हणून अर्थसंकल्पापूर्वी विरोधी पक्षनेत्याबाबत निर्णय व्हावा, असे ते म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच महाविकास आघाडी म्हणून पुढील वाटचाल सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आदित्य ठाकरे यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी चालले असते असे भाजपवाले म्हणतात असे यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले. त्यावर उद्धव ठाकरे मिश्कीलपणे म्हणाले की, आदित्यचे नाव चालले असते आणि घराणेशाहीला भाजपचा विरोध नाही हे मला कळले असते तर बरे झाले असते, असा चिमटाही त्यांनी काढला. विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचा अडीच-अडीच वर्षांचा काहीही फॉर्म्युला नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री स्वच्छ कारभार करताहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढली गेल्याची घटना घडली तेव्हा गुंड कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला दयामाया, क्षमा न दाखवता कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. मग त्याच नीतीला जागून याबाबतीतही लवकरात लवकर निर्णय होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.