मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचेच नाव जाहीर करायला हवे होते! जितेंद्र आव्हाड यांचे ठाम मत

विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच चेहरा मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करायला हवा होता, असे रोखठोक मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांचे नाव जर मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करून निवडणुकीला सामोरे गेलो असतो तर किमान पाच टक्के जास्तीची मते महाविकास आघाडीच्या पारडय़ात पडली असती, असे आव्हाड म्हणाले.

राज्यातील विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत केली होती. कुणाचेही नाव सुचवा, मी आता पाठिंबा जाहीर करतो, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. आज पत्रकार परिषदेत आव्हाड यांनी महाविकास आघाडीला समाधानकारक यश मिळाले नसल्याचे सांगतानाच उद्धव ठाकरे यांचेच नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करायला हवे होते, असे स्पष्टपणे सांगितले.

ठाकरे, पवारांना एकटे पाडण्याची रणनीती

उतरत्या वयात शरद पवार यांना क्लेश होतील अशा पद्धतीने त्यांना एकटे पाडले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्याबाबतीतही तीच रणनीती आखली जात आहे. ईव्हीएमचा झोल उघडपणे समोर आला आहे. याविरोधात आवाज उठवलाच पाहिजे, असेही आव्हाड म्हणाले.