शिवसेनाप्रमुखांची मशाल हाती घ्या, तुमच्या मताने ही बेबंदशाही जाळून भस्म करून टाका; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अवैधरीत्या स्थापन झालेल्या आणि पक्ष, चिन्ह चोरलेल्या मिंध्यांवर तोफ डागली. जनतेने आता हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मशाल हाती घेत हे बेबंदशाहीचे सरकार जाळून उलथवून टाकावे, असे आवाहन त्यांनी केले. या बेबंदशाहीविरोधात आपण लढाईत उतरलो असून जनतेने आपल्याला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

आपण जनतेच्या दरबारात आज न्याय मागण्यासाठी आलो आहोत, हा न्याय व्यक्तीगत आपल्यासाठी नाही. तर आपल्या सर्वांसाठी, लोकशाहीसाठी हवा आहे. जनतेच्या आशिर्वादाने स्थापन झालेले आपले सरकार कोणत्या मार्गाने पाडण्यात आले, आपल्या इच्छेविरोधात नवे सरकार आपल्या माथी बसवण्यात आले. ते आपण सर्व भोगत आहोत. अडीच वर्षांपासून आम्ही न्याय मागत आहोत. मात्र, अद्यापही न्याय मिळत नाही. न्यायाला विलंब करणे म्हणजे न्याय नाकारण्यासारखे आहे. न्यायालयाकडून न्याय मिळत नसेल तर लोकमान्य टिळक यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात म्हणजे जनतेच्या न्यायालयात आम्ही न्याय मागत आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

त्यांनी आपला पक्ष चोरला, पक्षाचे नाव, चिन्ह चोरले, शिवसेनाप्रमुखांची फोटोही चोरला, किती बेगुमानपणे ते वागत आहेत. दिवसाढवळ्या त्यांनी दरोडा घातला आहे. असे असून ते बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी सर्व चोरले असले तरी जनतेच्या आशिर्वादामुळे आपण ठामपणे उभे आहोत. त्यांनी सर्व चोरले असे त्यांना वाटत असेल तर जनतेचे प्रेम, आशिर्वाद आणि विश्वास ते चोरू शकत नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

या बेबंदशाहीविरोधात आपण लोकशाहीची लढाई लढत आहोत. त्यासाठी मला आपले आशिर्वाद आणि साथ हवी आहे. ही लढाई मला काही हवे आहे म्हणून नाही, तर देशातील लोकशाही टिकवण्यासाठी आहे. या लढाईत केवळ माझ्या अस्तित्वाचा नाही तर महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्राला लुटायचे आणि गुलाम बनवण्याचे काम सुरू आहे. आपण हे सर्व बघत राहायचे, हे आपल्याला पटत नाही. त्यामुळे सर्वांना सहकुटुंब या लढाईत उतरा आणि आपल्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा. शिवसेनाप्रमुखांची मशाल हाती घ्या,प्रत्येकजण बाळासाहेबांची मशाल आहे. तुमच्या मताने ही बेबंदशाही जाळून भस्म करून टाका, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला.