35 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या आरीफचा ‘मातोश्री’वर सन्मान, उद्धव ठाकरे यांनी केले धाडसाचे कौतुक

नीलकमल बोट दुर्घटनेत स्वतःचा जीव धोक्यात घालून 35 प्रवाशांचे प्राण वाचवणारा ‘देवदूत’ आरीफ बामणे याचा आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आरीफने दाखवलेले प्रसंगावधान, धाडस आणि शौर्याचे कौतुक केले. यावेळी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार मनोज जामसुतकर उपस्थित होते.

गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल बोटीला नौदलाच्या स्पीडबोटीने धडक दिल्याने भीषण दुर्घटना घडली होती. त्यात दोन्ही बोटींना जलसमाधी मिळाली. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला तर 100 जणांना वाचवण्यात यश आले. यावेळी देवदूत ठरलेल्या आरीफ बामणे याचे सर्वत्र कौतुक होत असून उद्धव ठाकरे यांनी आरिफचा आज खास गौरव केला.

आरीफ हा पूर्वा बोटीवर बोटमास्टर आहे. दुर्घटना घडली तेव्हा तिथून काही अंतरावर ही बोट होती. क्षणाचाही विलंब न लावता आरिफने समुद्रात उडी घेतली. किमान 35 प्रवाशांचे प्राण त्याने व त्याच्या सहकाऱ्यांनी वाचवले. पायलट बोटीचा आधार घेत या सर्वांना वासुदेव फेरीबोटीत सुरक्षितरीत्या नेले. एक साडेतीन वर्षाची चिमुकली बेशुद्ध झाली होती. तिला आरिफने जीवनदान दिले.

शौर्यासाठी शिवसेनेकडून बक्षीस

बोटमास्टर आरिफ आणि बोटीतील त्याचे सहकारी कर्मचारी किफायत मुल्ला, तपस कार, नंदू जाना यांनी धाडस दाखवत बचावकार्य केले. या सर्वांना शिवसेनेच्या वतीने रोख स्वरूपात बक्षीस देऊनही सन्मानित करण्यात आले.