जनतेचे न्यायालय तारीख पे तारीख देत नाही, एकदाचा सोक्षमोक्ष लावून जातात असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला तसेच मी मुख्यमंत्री असताना मोदी शहांची महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंम्मत नव्हती असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
लोहा इथे एकनाथ पवार यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था खरंच नांदत असेल तर ज्यांनी हल्ला केला, त्यांच्यावर कारवाई झाली असेल. जर का कारवाई झाली नसेल तर पोलीस बाजूला ठेवा तर आम्ही बघू कोण आमच्या अंगावर चालून येतं. हा आततायीपणा अजूनतही आम्ही केलेला नाही. याचा अर्थ आम्ही षंढ आहोत असा होत नाही. आम्ही हे केवळ जनतेत अस्थिरता निर्माम होऊ नये म्हणून गप्प बसलो आहोत. या पुढे आमच्या शिवसैनिकाला हात लागला तर तो हात जागेवर राहणार नाही, हे पोलिसांनीही लक्षात ठेवावं. कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे. स्वतःहून कुणावर वार करायचा नाही. पण जर कोणी वार करायला आला तर तो हात जागेवर ठेवायचा नाही. त्यालाच शिवसैनिक म्हणतात. ही शिवसेना प्रमुखांची शिकवण घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत. मिंधे आणि भाजपवाले माझ्यावर आरोप करतात की मी बाळासाहेबांचे विचार सोडले. मी विचार सोडलेले नाहीत. निवडणूक लढायची असेल तर मर्दासारखे लढा. आपली महाविकास आघाडी आहे. सगळे मित्र पक्ष आहेत. त्यांच्या युतीमध्ये ईडी, इन्कम टॅक्स, पोलीस आहेत. मग कसले मर्द तुम्ही. आमच्या शिवसैनिकांना त्रास द्यायचा, माझ्या शिवसैनिकांना छळायचं, शिवसैनिकांना तडीपार करतात. 23 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र या तिनही पक्षांना तडीपार करणार आहे. या तडीपाऱ्या फक्त माझ्या शिवसैनिकांना लावू नका. उद्याचे सरकार आमचे असणार आहे. पोलीस यंत्रणाही आमच्याकडे असणार आहे. जर ही यंत्रणा तुमच्यामागे लावली तर सूरतेलाही तुम्हाला पळता येणार नाही. सूरतेला एकदा जाऊन ढोकळा खाऊन आलेला आहात. यावेळी सुरतेचेच काय सगळे रस्ते बंद करून टाकेन. आम्ही दया दाखवली याचा अर्थ आम्ही नामर्द आहोत असे नाही. निवडणूक लढवायची असेल तर मर्दासारखं मैदानात या. पण सर्व यंत्रणा वापरायची. आताही एकनाथ पवार मला म्हणाले की, मतदारसंघात आणखी एक एकनाथ पवार डमी माणूस उभा केला आहे. यांचं सगळंच डमी आहे. शिवसेनाही चोरली. मला वाटत होतं की माझ्या पक्षाचं नाव चोरलं, माझी निशाणी चोरली, माझ्या वडिलांचा फोटो चोरला, पण एकनाथ पवार नावसुद्धा चोरलं. या चोरांच्या हातात तुमचं आयुष्य या गद्दार आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या हातात देणार आहात का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
आघाडी धर्म
इथले खासदार सांगत होते की लातूर आणि नांदेडमध्ये शिवसैनिकांनी खुप मेहनत केली. आज मला वसंतरावांची खुप आठवण येत आहे, कारण वसंतराव आणि माझी फार भेट नाही झाली. हिंगोलीत आल्यावर त्यांनी मला विचारलं की हिंगोलीत सभा मिळेल का? म्हटलं सभा देणं कठीण आहे, आपण हवं तर पत्रकार परिषद घेऊ. म्हणाले काही हरकत नाही. नांदेडची जागा 100 टक्के जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांचा विश्वास खरा ठरला आणि नांदेडची जागा जिंकलो. दुर्दैव असं की ते आपल्यातून ते गेले. पण त्यांचा वारसदार आपल्याला निवडून द्यायचा आहे. हाच तो आघाडी धर्म. जसं आम्ही लातूर आणि नांदेडमध्ये काँग्रेससाठी काम केलं तसं आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही जिथे जिथे मशाल आहे तिथे आमचे उमेदवार निवडून द्या आम्ही तुमचे उमेदवार निवडून आणू.
पाणी द्या अन्यथा
लोहा कंधारमध्ये अजूनही रस्ते नाही, पाणी नाही. पाणी नाहीच आहेच नुसता चिखलीकर आहे नुसता चिखल होतोय. बिनपाण्याचा चिखल आहे. पाणी नाही दिलं तर तुमच्या आयुष्याचा चिखल करू आम्ही. एकदा त्यांना पाडलं आहे. त्यांची ही पडझड सुरू झाली आहे. लोकसभेला उभे राहिले तेव्हा पाडलं आणि आता विधानसभेला उभे राहिले तर पाडा, ग्रामपंचायतला उभे राहिल्यावरही पाडा. कारण खुर्चीची खाज सुटली आहे त्यांना. खुर्ची नसली की खाज सुटते.
महाराष्ट्राचे उद्योग लुटून गुजरातला नेले
काही दिवस राहिले आहेत. आता मोदी आणि शहाही यायला लागलेत. त्यांना आता आठवलं की महाराष्ट्र नावाचं राज्य आहे आणि तिथे निवडणूक सुरू आहे. तिथली लोकंही मतं देतात हे त्यांना आठवलं. नाहीतर महाराष्ट्र राज्य फक्त लुटण्यासाठी आहे असं मोदी शहांना वाटत होतं. सगळे महाराष्ट्राचे उद्योग तुम्ही लुटून गुजरातला नेता आणि आता निर्लज्जपणे महाराष्ट्राची मतं मागता. तुम्हाला काय वाटतं तुम्ही काहीही केलं तरी चालेल आणि महाराष्ट्र केविलवाणा तुम्हाला मत देईल. ही लढाई केवळ उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची नाही. आपल्याला सत्ता पाहिजे, सरकार आणायचंय. पण सरकार फक्त पवार साहेब आणि राहुल गांधींसाठी नाही आणायचंय हे सरकार तुमच्यासाठी आणायचं आहे.
भाजपमध्ये काळोख
एकनाथ पवार भाजपमध्ये होते आणि दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत आले. त्यांना विचारलं सत्ता सोडून का येत आहात इथे, आमच्याकडे काळोख आहे. एकनाथ पवार म्हणाले हातात मशाल आहे. आणि मी मशालच पकडायला आलोय. कारण खरा काळोख हा भाजपमध्ये आहे. आम्ही जो कष्ट करून जो पक्ष वाढवला त्या पक्षावर उपरे आणून बसवले आहेत.
पंधराशे रुपयांत घर चालतं का?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मला प्रश्न विचारायचा आहे की 100 वर्ष तुमच्या संघटनेला झाली. एवढ्यासाठी हा पक्ष तुम्ही वाढवलात. बरं हे राजकारण ठेवा बाजूला, यांना निवडणुकीच्या तोंडावर कळालं की शेतकरी आहेत आणि त्यांना कर्जमुक्ती करू. इथे माता भगिनी नावाचाही प्रकार आहे, त्यांना आपण बहीण मानुया. दीड हजार रुपये देऊया. इथे सभेला माता भगिनी आल्या आहेत. त्यांना मी जाहीर प्रश्न विचारतोय की पंधराशे रुपयांत तुमचं घर चालतं का मला सांगा. आज तुम्हाला पंधराशे रुपये महत्त्वाचे आहेत की तुमच्या शीलाचे रक्षण करणे जास्त महत्त्वाचे आहे. महिला सुरक्षा महत्त्वाची की 1500 रुपये महत्त्वाचे? आपलं सरकार आल्यानंतर महिलांना तीन हजार रुपये देणार आहोत.
तुमच्या गावात उड्डाणपूल बांधला झाला का विकास? त्या पुलाखाली तिथला भुमीपुत्र भीक मागायला लागला तर तुमचा विकास काय चाटायचा आहे? त्याला रोजगार द्या, त्याला नोकरी द्या. मुलगी शिकली, प्रगती झाली, दीड हजार रुपये देऊन घरी बसवली हा विकास? म्हणून आपण ठरवलं आहे. मुलाला आणि मुलींना मोफत शिक्षण द्यायचं.
सगळं तुम्ही गुजरातला पाठवलं. मी मुख्यमंत्री असताना एकही प्रकल्प गुजरातला गेला होता का? कारण यांची हिंम्मत नव्हती. मोदी शहाची सुद्धा महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंम्मत नव्हती हे मी आज अभिमानाने सांगतोय. कोरोना काळातही साडे सहा लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करून महाराष्ट्रात उद्योग आणले होते. विदर्भात टाटा एअरबस प्रकल्प आणणार होतो. सगळीकडचे प्रकल्प यांनी थांबवले आणि गुजरतला पळवले. तुम्ही माझ्या तरुणांची रोजी रोटी थांबवली. आणि आता त्यांच्याकडे दुसरे मुद्दे नाहीत.
अमित शाह म्हणाले की, आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचंय आणि शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचंय. अमित शहांनी सांगावं की त्यांना पंतप्रधान होण्याची इच्छा नाही म्हणून. आधी जय शहाला क्रिकेट बोर्डातून खाली उतरवा. त्याने काय विराट कोहलीचा विक्रम मोडलाय का? जसा जय शहा तिथे बसलाय एका फोन वरून. त्याचे कर्तृत्व काय. त्यापेक्षा गावातला माझा तरुण जास्त चांगला क्रिकेट खेळतो. माझं आव्हान आहे जय शहाने लोहा कंधारला यावं आणि कुठल्याही तरुणाबरोबर खेळून दाखवावं. हे माझं जाहीर आव्हान आहे. पण स्वतःचं ठेवायचं झाकून आणि आमचं पहायचं वाकून. अमित शहा मुद्द्याचं बोला, कामाचं बोला. गेल्या दहा वर्षात थापांशिवाय तुम्ही दिलं काय?
धुळ्यात काल मोदी आले होते. महाराष्ट्र त्यांना धूळ चारणार आहे म्हणून धुळ्यात त्यांनी चांगली सुरूवात केली. त्यांनी टीका केली की महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाकं आहेत ना ब्रेक. मोदीजी आमचं सोडून द्या. पण तुमच्या गाडीला भ्रष्टाचाऱ्यांची जी चाकं लागली आहेत ती आधी पहा. इक्बाल मिरचीसोबत असल्याचा आरोप केला होता. आता ही मरची गोड झाली. आमच्यासोबत असताना मिरचीचा ठसका लागत होता. आणि प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्याने मिरची गोड झाली. आमच्याकडे सगळे भ्रष्टाचारी आणि गुंड. तुमच्याकडे आले तर साधुसंत झाले.
भाजप असो वा मिंधे. प्रत्येकाच्या बॅनवर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. भाजपच्या बॅनरवर एकवेळ मोदींचा फोटो नसेल पण बाळासाहेबांचा फोटो आहे. कारण महाराष्ट्रामध्ये नासकी गॅरंटी चालत नाही. इकडे फक्त बाळासाहेबांची ठाकरे गॅरंटी चालते. तीच गॅरंटी मी घेऊन आलेलो आहे. ज्याला घर नाही त्याला घर, ज्याच्याकडे रोजगार नाही त्याला रोजगार, ही दशसुत्री आपल्या आयुष्याचा मंत्र आहे. आणि तो पूर्ण करण्यासाठी तुम्हा सर्वांची साथ हवी आहे.
मी आज तुमच्या न्यायालयात न्याय मागायला आलोय. न्यायमूर्ती निवृत्त झाले. लोकशाही मेली तरी चालेल, पण मी निवृत्त झालो, सुटलो. देशाची लोकशाही तुमच्याकडे वाट बघत होती माझा जीव वाचवावा म्हणून. त्या लोकशाहीला वाचवण्याचे धाडस करू शकले नाही. तुमचे संचित तुमच्याकडे.
मी जनतेच्या न्यायालयात आलेलो आहे. मला न्याय पाहिजे. तारीख पे तारीख करत त्यांनी अडीच वर्ष काढली. जनतेचे न्यायालय तारीख देत नाही, एका फटक्यात सर्व सोक्षमोक्ष लावून देतात. मला खात्री आहे अडीच वर्ष यांनी जी गद्दारी केली ती फक्त शिवसेनेशी नाही तरी ती गद्दारी तुमच्यासोबत केली आहे. या गद्दारीचा सूड तुम्ही येत्या 20 तारखेला उगवल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडी म्हणजेच महाराष्ट्राच्या जनतेचे सरकार विधीमंडळात पाठवा असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.