औरंगजेबला मदत करणारे अनाजी पंत याही जमान्यात; राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा! भैय्याजी जोशींच्या विधानाचा उद्धव ठाकरे यांनी घेतला समाचार

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचा खरपूस समचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी विधानभवनमध्ये माध्यमांशी संवाद साधला. औरंगजेबला मदत करणारे अनाजी पंत याही जमान्यात जन्माला आलेत. याच्या सारखं दुसरं दुर्दैवं असू शकत नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे असे नाही, अशी मुक्ताफळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी उधळली. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चांगलीच खरडपट्टी काढली. अशी भाषा त्यांनी अहमदाबादमध्ये करून दाखवावी, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.

महायुतीच्या सर्व आमदारांना खास छावा चित्रपटाचा शो आयोजित केलेला. ही कल्पना ज्यानी मांडली त्यांचं मी काल जाहीर अभिनंदन केलं. दुर्दैवाने सगळी लोकं त्याच्यात गद्दार लोकं गेलेच नव्हते. पण ही सगळी लोकं छावा चित्रपट बघताना या काळातले अनाजी पंत हे इकडे येऊन मराठी-अमराठी असं विष कालवून गेले. दुर्दैवाने असं झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत. छत्रपती संभाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत. पण महाराष्ट्रामध्ये फूट पाडणारे औरंगजेब आणि औरंगजेबला मदत करणारे अनाजी पंत मात्र, याही जमान्यात जन्माला आलेत, येताहेत. याच्या सारखं दुसरं दुर्दैवं असू शकत नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

अशी काही लोकं आपल्या देशात आहेत की जणू काही ब्रह्मदेवाला आम्हीच जन्म दिला. आणि जगभर ब्रह्मज्ञान सांगत फिरतात. त्यातलेच काल अनाजी पंत, आता त्यांची मातृभाषा कोणती याची कल्पना नाही. पण त्यांनी येऊन मुंबईमध्ये घाटकोपरला मुंबईमध्ये राहणाऱ्याला मराठी आलीच पाहिजे, अशी काही गरज नाही, असं एक द्वेषाचं गोमुत्र म्हणायचं की काय? पण शिंपडून गेले. याचा अर्थ असा हा संघाचा छुपा अजेंडा आहे, भाजपचा छुपा अजेंडा आहे. यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला.

बऱ्याच दिवसांत हिंदुस्थान-पाकिस्तान हा विषय त्यांनी काढलेला नाही. मग काय, बटेंगे तो कटेंगे. आता बटेंगे तो कटेंगे म्हणजे केवळ हिंदू-मुसलमान नाही. तर मराठी-अमराठी, मराठीमध्ये पुन्हा मराठा-मराठेतर असं सगळं वाटणी करायची आणि आपण राज्य बळकवायचं. हे जे कोणी अनाजी पंत आले होते, त्यांना आव्हान देतो की, अशी भाषा त्यांनी अहमदाबादमध्ये करून दाखवावी. तामिळनाडूमध्ये करून दाखवावी. कर्नाटकात, केरळमध्ये, पश्चिम बंगालमध्ये ही तिकडे भाषा करून दाखवावी. फक्त भाषा करून दाखवायची नाही तर भाषा करून सुखरूप येऊन दाखवावं. मराठी माणूस हा सहृदयी आहे. दयाशील आहे म्हणून कोणीही यावं टपली मारून जावं, अशी आताही पद्धत आहे. आणि यातून मराठी माणूस हा भाजप किंवा संघ खिजगणतीत धरत नाही. आम्हाला मराठी माणूस मतं देणारच आहे, जातोय कुठे? असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आणि भाजपला सणसणीत टोला लगावला.

मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या औरंगजेबांना तुम्ही काय शिक्षा देणार? भैयाजी जोशींवरून संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

भाषावार प्रांत रचना देशाची झाली. आता ही मुंबईची भाषावार गल्ली रचना करताय की काय? आणि मग तोडा फोडा आणि राज्य करा, ही अत्यंत घाणेरडी आणि विकृत मानसिकता या निमित्ताने सगळ्यांसमोर आली आहे. काल ज्या प्रमाणे मुख्यमंत्री विधानपरिषदेत बोलले की, कोरटकर कोरटकर काय करताहेत, कोरटकर हा चिल्लर माणूस आहे. तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भय्याजी भय्याजी काय करताहेत, भय्याजी जोशी हा चिल्लर माणूस आहे. एकतर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावं नाहीतर त्या चिल्लरचा बंदा रुपया असतो त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची करण्याचा कायदा हे महाविकास आघाडीचं सरकार असताना मी मुख्यमंत्री असताना केलेला आहे. या कायद्याच्या विरोधात इकडे मराठी भाषा आली नाही तरी चालेल असं बोलण्याचं धाडस करणाऱ्या एकावरती जर का कायद्याचा बडगा उगारला तर यापुढे असं कोणाची बोलण्याची हिंमत होणार नाही. आणि नाहीतर मग त्यांनी सांगावं की संघाचा आणि भाजपचा छुपा अजेंडा आहे. एक तर कारवाई करावी नाहीतर हे काय पाप आहे हे त्यांनी मान्य करावं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“तुमचं डोकं ठिकाणावर आहे का?” 

आतापर्यंत जर का आपण बघाल तर ही संघाची आणि भारतीय जनता पक्षाची नीती आहे की आधी एक पिल्लू सोडायचं. आणि ते पिल्लू मोठं झालं की खांद्यावर घ्यायचं. आणि जर का वाटलं की अंगलट येतंय तर ते झिडकारायचं. त्याप्रमाणे आता दोन्ही सभागृहात गोलमाल उत्तरं दिली गेली आहेत. काही ठामपणे काहीही बोलले नाहीत. बावनकुळे आता बोलले की अशी भाषा आहे, तशी भाषा आहे. अभिजात भाषेचा दर्जा तुम्ही दिला म्हणजे काही उपकार नाही केलेलेत. कारण मराठी भाषेचं महत्त्व संघाला कळलं नसेल, भाजपला कळलं नसलं तरीसुद्धा तेव्हा इंग्रजांना कळलं होतं. कारण सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हा जो लेख लिहिला होता लोकमान्यांनी तो मराठी भाषेत होता. तसंच आम्ही आमच्याच राज्य सरकारला विचारतोय की, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? कारण आपल्या राज्यात आपल्या राजधानीमध्ये जी राजधानी मुंबई 105 च नव्हे तर त्यावेळी परदेशी पत्रकार आल्या होत्या ताया झिंकीन त्यांनी एक पुस्तक लिहिलं रिपोर्टिंग इंडिया. त्याच्यात त्यांनी म्हटलंय की त्यांनी जेव्हा हॉस्पिटलची पाहणी केली तेव्हा दोनशे अडीचशेच्या वरती मृतदेह असेच पडलेले होते. त्याची नोंदच झालेली नाही. रक्त सांडून आणि बलिदान करून ही मुंबई मराठी माणसाने मिळवलेली आहे. मला संघाला आणि भाजपला सांगायचं आहे की ज्या-ज्या वेळेला मुंबईवरती संकट येतं तेव्हा आम्ही सगळे मुंबईकर म्हणून महाराष्ट्रातले सगळे नागरिक म्हणून एकमेकाला वाचवण्यासाठी पुढे जातो. मग ती नैसर्गिक आपत्ती असेल, अतिरेक्यांचा हल्ला असेल, 1992-93 च्या दंगलीमध्ये सुद्धा गुजराती मणसांना सुद्धा हिंदू म्हणून वाचवणारी शिवसेना होती. हे वात लावून पळतात. वात लावून पळून जातात. कोरोनाच्या काळात सुद्धा सगळेजण आम्ही एकत्रित सगळ्यांना माणूस म्हणून आणि आपल्या देशाचे, महाराष्ट्राचे मराठी माणसचं काय सगळे इतर भाषिकांना सुद्धा आपलेपणाने जपलं होतं. त्या आपलेपणामध्ये तुम्ही साखर टाकू शकत नसला तरी मीठाचा आणि विषाचा खडा टाकू नका. मुंबई एक चांगली महानगरी आहे. ती जिंकायची असेल तर चांगलं काम करून जिंका, विष कालवून जिंकू नका, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

“भारतीय जनता पक्षाने या जोशींचा निषेध केलाच पाहिजे, ही आमची जाहीर मागणी”

जर का तुम्हाला स्पर्धा करायची असेल तर चांगल्या कामाशी स्पर्धा करा. याच मुंबईमध्ये शिवसेनेने रक्तदानाचा जागतिक विक्रम केलेला आहे. तसं काहीतरी काम आरएसएसने करून दाखवावं. नाहीतर काय होतं, लढायला तुम्ही आणि मिरवायला आम्ही अशा पद्धतीने यांचं काम सुरू आहे. आम्ही याचा निषेध करतो. ही अशी विषवल्ली या सरकारने वेळीच ठेचली पाहिजे. या जोशीनी तामिळनाडूमध्ये आजच स्टॅलीन यांचं आलेलं आहे. त्यांनी भाषिक वाद सुरू केलेला आहे. म्हणजे भाजप आता उत्तर विरुद्ध दक्षिण असा आपला देश तोडायला निघालेलं आहे. सगळे दक्षिणेतले राज्य आणि तामिळनाडूतील सगळे पक्ष हे एकत्र झालेले आहेत. कमल हसन आज बोलले आहेत, यांना इंडिया नाहीतर यांना हिंदिया करायचं आहे. अशा सगळ्या वादाच्या ठिणग्या टाकून तुम्ही भारत माता की जय बोलू शकत नाही. भारत माता ही सगळ्यांची आहे. महाराष्ट्र हा आमच्या सगळ्यांचा आहे. आणि महाराष्ट्रात येऊन कायद्याच्या विरुद्ध जर बोलत असतील तर त्यांच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतोय. पण भारतीय जनता पक्षाने आणि विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षातले मूळ जे हाताच्या बोटावरती राहिले असतील ती लोकं, त्याच्यात आलेले सगळे गद्दर यांनी सगळ्यांनी या जोशींचा निषेध केलाच पाहिजे, ही आमची जाहीर मागणी आहे. आम्ही तर करत आहोत. आता तुमच्या बोलल्यानंतर आम्ही सगळेजण हुतात्मा स्मारकात जाऊन हुतात्म्यांना आम्ही अभिवादन करणार आहोत. आणि आम्ही सांगणार आहोत की, कोणी कितीही विष कालवलं तरी आम्ही मराठी माणूस मुंबई आमच्या हातातनं कोणालाही हिसकावून घेऊ देणार नाही म्हणजे नाही. ज्या प्रमाणे तुम्ही बलिदान केलंत, त्या बलिदानाची शपथ घेऊन आम्ही मुंबई ही महाराष्ट्रापासून आणि मुंबईची वाटणी आम्ही व्हायला देणार नाही, असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.