
निवडणुकीआधी बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है… असे नारे देत धर्मा–धर्मात विष कालवायचे. हिंदूंचा वापर फक्त दंगलींसाठी करायचा आणि निवडणूक आली की सत्ता मिळवण्यासाठी ज्यांच्या धर्मात विष पेरले त्यांच्या घरात ‘सौगात-ए-मोदी’ म्हणत शेवई, खजूर, ड्रायप्रूट वाटायचे आणि गळाभेटी घ्यायच्या हा निर्लज्जपणा असल्याचा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर केला. ईदच्या निमित्ताने भाजपचे 32 हजार कार्यकर्ते मुस्लिम कुटुंबियांच्या घरोघरी जाऊन त्यांना ‘सौगात-ए-मोदी’ ही भेट देणार आहेत. हे ‘सौगात-ए-मोदी’ नाही हे ‘सौगात-ए-सत्ता’ आहे. सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या बेगडी हिंदुत्वाची सालटीच काढली. हिंमत असेल तर भाजपने आता हिंदुत्व सोडल्याचे जाहीर करावे, असे आव्हानच त्यांनी दिले.
उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून जनतेच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवाय बिहार निवडणूक तोंडावर आल्यामुळेच भाजपचे मुस्लिमांवर प्रेम उफाळून आल्याचा टोला त्यांनी लगावत भाजपचा 100 दिवसांचा संकल्प, ईदनिमित्त भाजपचे मुस्लिम समाजाला सौगात-ए-मोदी किटचे वाटप, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक अशा विविध मुद्द्यांवरून भाजप आणि मोदी सरकारवर तुफान हल्ला चढवला. हे अधिवेशन म्हणजे काय तर कबरीपासून कामरापर्यंत, असे वर्णन राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी केलेच आहे. असे हे अधिवेशन का घेतले गेले? यातून आपण जनतेला काय दिले? याचा विचार सत्ताधाऱयांनी केला पाहिजे, असेही ते म्हणाले. ‘खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा’ अशी या अर्थसंकल्पाची गत आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
पाशवी बहुमताच्या सरकारचा निरर्थक अर्थसंकल्प
राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे पाशवी बहुमत मिळवलेल्या सरकारचा निरर्थक अर्थसंकल्प असल्याचा टोला त्यांनी लगावला. हा हताश व निराशावादी अर्थसंकल्प होता. सरकारचे अपयश लपवणारे अधिवेशन होते. पुढील 100 दिवसांत काय करणार असा या सरकारने संकल्प केला होता. त्यामध्ये शेतकरी केंद्रबिंदू ठेवला होता. पण शेतकऱयांच्या आत्महत्या तशाच सुरू आहेत. शंभर दिवसाच्या आराखडय़ावर अर्थसंकल्पात कोणत्याही ठोस उपाययोजना केली नसल्याचे सांगत त्यांनी सरकारच्या घोषणांची पोलखोल केली.
अधिवेशनात सत्ताधाऱ्यांचा माज दिसला
या अधिवेशनाच्या निमित्ताने पाशवी बहुमत मिळवलेल्या सत्ताधाऱयांचा माज दिसला असे सांगून ते म्हणाले की, विरोधकांना सभागृहात बोलू दिले जात नाही. लक्षवेधी सूचनांवर भास्कर जाधव यांनी तर सरळसरळ आरोपच केला आहे. विधान परिषदेत सभापतींच्या विरोधात अविश्वास ठराव पहिल्याच दिवशी आणला गेला. असे अधिवेशन यापूर्वी नजीकच्या काळात झाले नसेल. या गोष्टी अधिवेशन काळात बोलू दिल्या असत्या आणि यावर नीटनेटकेपणाने उत्तरे दिली गेली असती तर जनतेसमोर मला बोलण्याची वेळ आली नसती, असे त्यांनी स्पष्ट केले.
तुमच्या झेंडय़ावरचा हिरवा रंग काढा
मुस्लिमांच्या नावाने शिमगा करायचा आणि होळी आल्यावर त्यांना पुरणपोळी द्यायची असा हा प्रकार आहे. आता पण तुमच्यात जे उडाणटप्पू आहेत तेसुद्धा आता टोपी घालून सौगात घेऊन जातात का हे मला बघायचे आहे. तुम्ही आमच्यावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप करता, मग तो आरोप करण्यापूर्वी तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढणार का? असा सवाल त्यांनी केला. मुस्लिमप्रेमाची तुमची भूमिका बिहार निवडणुकीपुरती राहणार आहे का, असा सवालही त्यांनी केली.
थापा मारून मते मिळवलीत
महाराष्ट्रातील जनतेला निवडणुकीपूर्वी विविध आश्वासने दिली. ज्यामध्ये लाडकी बहीण योजना, शेतकरी वीज बिल माफी, शेतकऱयांना कर्जमुक्त करणार होते. अशा थापा मारल्यानंतर मते मिळवली आणि सत्ता मिळवल्यानंतर आम्हीत त्या गावचेच नाही असे दाखवत आहेत. कारण मी कोणत्या कर्जमाफीबद्दल बोललो होतो असे वक्तव्य खुद्द अजित पवार यांनीच केलेय. आता अशा पद्धतीची ही वक्तव्ये येत आहेत, तशीच आता ‘सौगात ए सत्ता’ आहे. ती बिहार निवडणुकीपुरतीच राहणार की नंतरही राहणार हे भाजपने एकदा जाहीर करावे आणि आता त्यांनी हिंदुत्व सोडलेले आहे हे अधिकृतपणे जाहीर करावे, असे आव्हानच त्यांनी भाजपला दिले.
राज्यपालांकडून अपेक्षा
सरकार विरोधकांचा आवाज दाबत असल्यामुळे आमचे विरोधी पक्षाचे सदस्य राज्यपालांना भेटून आले. आता राज्यपाल काय भूमिका घेतात ते पावे लागेल. कारण यापूर्वीचे राज्यपाल असते तर आम्ही काही अपेक्षाच ठेवली नसती, पण नवीन राज्यपालांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. हे राज्यपाल एक सुसंस्कृत माणूस आहे. त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. विरोधी पक्षनेता हे संविधानात पद आहेच याकडे त्यांनी लक्ष वेधले. विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी अटी-शर्ती कायदा नाही. मग त्यांच्या म्हणण्यानुसार विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी संख्याबळाची काही अट भाजपच्या संविधानात असेल तर त्यांनी ते लिहून द्यावे, असेही ते म्हणाले.
बिहारमध्ये मुस्लिमांना रस्त्यावर नमाज पढू देणार नाही असे आता म्हटले जात आहे याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की. म्हणूनच मी म्हणतो सौगात ए मोदी ही नौटंकी आहे. सत्ता हस्तगत करण्यासाठी ही नौटंकी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
तुमचा आदर्श खंडोजी खोपडे
छत्रपती शिवरायांबद्दल अवमानकारक भाष्य करणाऱया प्रशांत कोरटकरकडून एक निबंध लिहून घेतील आणि त्याला सोडतील, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवरायांची बदनामी करणारा सोलापूरकर कुठे आहे? गद्दाराचा अपमान तुम्हाला सहन होत नाही. त्याचा स्टुडिओ तोडता, दोन समन्स पाठवता. मग सोलापूरकरला तुम्ही एकही समन्स नाही पाठवले? तुम्हाला कामरावर कारवाई करण्याचा अधिकार काय? तुम्ही नक्की कोणाचा आदर्श घेऊन चालला आहात? तुम्ही शिवाजी महाराजांचा की खंडोजी खोपडेचा आदर्श घेऊन चालला आहात? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, अॅड. अनिल परब, उपनेत्या किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
हिंदूंनी नुसती घंटा वाजवायची का?
इतकी वर्षे त्यांनी हिंदू-मुस्लिम लढाई लावली. ज्यामध्ये काही लोकांचा जीव गेला. घरावर बुलडोझर लावला. त्यांच्या घरी सौगात घेऊन कोण जाणार आहे, तेही त्यांनी जाहीर करावे. भाजपकडे जो पैसा आहे त्या पैशातून ही भेट जात आहे ती बैसाखीला, ईस्टरला वाटणार आहेत का? असा सवालही त्यांनी केला. ही चांगली गोष्ट आहे, पण हिंदूंना नुसती घंटा वाजवायला द्यायची, दंगलीसाठी वापरायचे आणि ज्यांचे जीव जातात घरे जाळली जातात त्यांच्यावर कारवाई-पोलीस केसेस करायच्या? आणि मग हे सत्तेसाठी सगळय़ांच्या गळाभेटी घेत बसणार, असा टोलाही त्यांनी लगावला. मध्यंतरी दिल्लीची निवडणूक झाली. आणि बऱ्याच वर्षांनंतर दिल्लीत भाजपची सत्ता आली. त्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनीही इफ्तार पार्टी केल्याचा दावाही त्यांनी केला.
शंभर दिवसांत काय काय झाले सांगा…
- महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून बीडच्या सरपंचाची हत्या झाली. सोमनाथ सूर्यवंशी यांचा संशयास्पद मृत्यू झाला.
- बलात्काराच्या घटना घडल्या, रोज भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत, मुंबईत रस्ते घोटाळा झाला.
- अधिवेशनाच्या काळात मुंबईच्या रस्त्यांबाबत अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली, पण काय निष्पन्न झाले?
- घोटाळय़ांची आर्थिक गुन्हे विभागामार्फत चौकशी करणार आहात का? भ्रष्टाचाराचा पैसा गेला ? कुणाला कंत्राट मिळाले?
- शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार होते, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार होते त्याचे काय झाले?
- योजनेच्या नावाखाली आता लाडक्या बहिणींनाही कागदपत्रांच्या नावाखाली त्रास दिला जात आहे.
…‘ती’ गद्दार एसंशिं सेना
कुणाल कामराच्या प्रश्नाच्या निमित्ताने ‘शिवसेना यूबीटी’ असा उल्लेख एका पत्रकाराने केल्यावर क्षणाचाही विलंब न लावता उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना एकच आहे. दुसरी ती गद्दारांची सेना आहे. कुणाल कामराच्या गाण्यानंतर जी काही तोडफोड झाली त्याचा शिवसेनेशी काडीचाही संबंध नाही. ती गद्दार एसंशिं (एकनाथ संभाजी शिंदे) सेना आहे. या ‘एसंशिं’ गद्दारांच्या गटाने या सर्व गोष्टी केल्या आहेत. ‘एसंशिं’ची बदनामी झाली असे तुम्हाला वाटत असेल तर याचा अर्थ ‘एसंशिं’ शिंदे गद्दार आहे. सत्य हे सत्यच असते. गावागावात गावकऱयांनी बैलपोळ्याच्या निमित्ताने ‘पन्नास खोके, एकदम ओके’ हे बैलावरही लिहिले होते याकडे त्यांनी लक्ष वेधले.
काहींना अजूनही नको त्या जागी मुख्यमंत्रीपदाचे कोंब फुटताहेत!
मुख्यमंत्री फडणवीसांना आता तारेवरची कसरत करावी लागत आहे. मुख्यमंत्री मात्र सर्वांना सांभाळण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण काहींच्या मनात अजूनही मुख्यमंत्रीपदाचे नको त्या जागी काsंब फुटत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. या लोकांना सर्व काही देऊनही हे लोक असे का वागत आहेत, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना पडला असेल, असेही ते म्हणाले.
शिवसेनाप्रमुखांशिवाय पर्याय नाही
गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या निमित्ताने ‘मनसे’ने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो पोस्टरवर लावल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, कोणालाही बाळासाहेबांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही हेच त्यातून दिसतेय. गेल्या वेळेलाही गद्दारांनी बाळासाहेबांचा फोटो वापरला तसाच सर्वांनाच बाळासाहेबांचा फोटो वापरल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
मुंबईतील रस्ते घोटाळा जनतेसमोर आला आहे. संपूर्ण मुंबईत खोदकाम करून ठेवलेले आहे. मोबिलिटी अॅडव्हान्स दिलं गेलंय. ते कुणाला दिलं, किती दिलं, त्याचं पुढे काय झालं, याच्याबद्दल काहीच पत्ता नाही. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक जरूर झाली; पण त्यातून निष्पन्न काय झालं… नेमकं पुढे काय होणार… त्याच्यावर तुम्ही आर्थिक गुन्हे शाखेची चौकशी लावणार आहात का, हा भ्रष्टाचाराचा पैसा गेला कुठे, कोणाच्या खिशात गेला, कोणत्या कंत्राटदाराला कंत्राटं मिळाली, या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत.
अधिवेशन काळाने देशाला उत्तम गाणे दिले!
अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिले यापेक्षा अधिवेशन काळाने संपूर्ण देशाला एक उत्तम गाणं दिलं हे आपल्याला मान्य करावं लागेल. हे गाणं देशाच्या कानाकोपऱ्यात वाजत आहे. प्रत्येकाच्या मुखात गुणगुणलं जात आहे. हे या अधिवेशनाचे फलित मानायला हवे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी गद्दार गीताचा उल्लेख न करता हाणला.
अरबी समुद्रातील शिवरायांच्या स्मारकाचे काय झाले?
अरबी समुद्रात नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे जलपूजन झाले. त्याचे पुढे काय झाले. त्यावर पाणी सोडले का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. याबाबत स्मरणपत्र पाठवणार का, असा प्रश्न पत्रकारांनी केला तेव्हा, शिवरायांच्या स्मारकासाठी स्मरण करावे लागत असेल तर ते दुर्दैव आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.