जनमताच्या पुरात भाजपचं ओंडकं वाहून जाणार; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

जळगावमधील खासदार उन्मेश पाटील यांनी भाजपला रामराम करत शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) धगधगती मशाल हाती घेतली आहे. उन्मेश पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ येथे शिवसेनेत प्रवेश केला. उन्मेश पाटील यांच्या प्रवेशानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी उन्मेश पाटील आणि त्यांच्यासोबत आलेले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं शिवसेना परिवारात स्वागत केलं.

मला तुमचा अभिमान आहे. तुमच्या आणि माझ्या भावना सारख्या आहेत. तुम्ही तुमच्या व्यथा बोलत होता, तेव्हा असं वाटलं माझ्याच वेदना तुम्ही बोलत आहात. तुम्ही भाजप वाढवण्यासाठी जशी अतोनात मेहनत केली, तशीच महाराष्ट्रातल्या काना-कोपऱ्यातल्या शिवसैनिकांनीही मेहनत केली. वापरा आणि फेकून द्या. काम झालं की फेकून द्या. ही भाजपची वृत्ती आहे. तुम्ही धाडस केलं. प्रवाहाविरुद्ध एका मोठ्या पुरात उडी घेतली. काळजी करू नका. हा प्रवाह संपूर्ण जनमताचा आहे. प्रवाह एकदा फिरला की मोठ-मोठे ओंडकेही वाहून जातात. तशी भाजपची अवस्था होणार आहे, असा घणाघात Uddhav Thackeray यांनी यावेळी केला.

आज माझ्याकडे काही नाहीये. जे काही तिकडे गेलेत त्यांची ओळख खोकेबाज म्हणून झाली आहे. 50 खोके एकदम ओके. जळगावमध्येही गद्दारी झाली आहे. अशा वेळेला तुम्ही काम करण्याच्या जिद्दीने आणि बदल हवा म्हणून आलात. सत्ता जिथे असते तिथे लोक गेली. मात्र तुम्ही जनतेची सत्ता आणण्यासाठी म्हणून शिवसेनेसोबत आलात. आपलं ध्येय एक आहे आणि आपला भगवा एक आहे. पण मध्ये जी तुमची आणि आमची फसगत झाली. त्या फसगत करणाऱ्यांना आता यापुढे निवडून द्यायचं नाही, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

मला नक्कीच अभिमान आणि विश्वास आहे, आजपर्यंत हा लोकसभा मतदारसंघ आम्ही भाजपला सोडत आलो. गेल्याही वेळेला तुम्ही होतात, आम्हाला काही चिंता नव्हती. आता मात्र पहिल्या प्रथम शिव छत्रपतींचा अस्सल भगवा हा जळगावमधून लोकसभेवर जाणार आहे. तुमच्यासारखे अनेकजण ज्यांचा वापर करून आज भाजपने फेकलं आहे. अशी लोक आपल्याला येऊन मिळतायेत. हा जो प्रचंड रेटा आहे. महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो. ती दिशा आज तुम्ही दाखवलेली आहे. यांच्या विरुद्ध कोणीतरी आवाज उठवणारं आहे. सगळी शेपट्या घालणारी नाहीत, हे तुम्ही दाखवलं आहे. याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो. यापुढे आपण एकत्रित वाटचाल करू आणि विकासाच्या आड येतील त्यांची वाट लावून दिल्लीत पोहोचू, असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.