
गद्दारांचे उदातीकरण करणारा, शिवरायांचा अपमान होत असताना गप्प बसणारा हा शिवसैनिक असू शकत नाही असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन चालायचा की गद्दारांचा? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला.
आज विधीमंडळ परिसरात उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, कुणाल कामराने व्यंगात्मक नव्हे तर सत्यात्मक गाणं केलं आहे. जे सत्य आहे ते त्यांनी जनभावना त्यांनी मांडलेल्या आहेत. आम्ही आज सुद्धा बोलतोय जे चोरी करतात ते गद्दार आहेत. पहिल्याप्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट करू इच्छितो की काल कामराच्या इथे जी काही तोडफोड केली ती शिवसैनिकांनी केलेली नाही त्याचा शिवसेनेशी संबंध नाही. गद्दार सेनेच्या एसएनशी गटाने केलेली. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने सुरु आहे की, की गद्दारांच्या आदर्शाने सुरू आहे
याचा सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आलेली आहे. एका गाण्यावरून त्यांच्या तथाकथित गद्दार नेत्यांचा अपमान झाला म्हणून काही भेकड लोकांनी तोडफोड केली.
तसेच यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर दिसत नाही, राहुल सोलापूरकर दिसत नाही, कोश्यारींनी अपमान केला होता, तेव्हा त्याचा निषेध करण्याचे धाडसही यांच्यात नव्हते. हे भेकड लोक आहेत आणि गद्दारच आहेत. त्यामुळे कुणाल कामराने काही अयोग्य केले असं माझं मत नाही. कुणाल कामराने जनभावना व्यक्त केल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो की न्याय सगळ्यांना सारखा पाहिजे. नागपूरच्या दंगलीमध्ये ज्यांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई तुम्ही देणार आहात. त्याचप्रमाणे कुणाल कामराच्या स्टुडिओची किंवा जिथे त्यांनी जो कार्यक्रम केला त्या जागेचं ज्यांनी नुकसान केलं, त्याची नुकसानभरपाई त्यांना दिली पाहिजे. भामट्या, भेकड, गद्दार लोकांनी तोडफोड केली. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला चालतो, मात्र गद्दाराचा अपमान चालत नाही. ज्यांनी तोडफोड केली, त्यांच्याकडून दाम दुपटीने वसूली करावी असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सत्य बोलणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला होऊ शकत नाही, हे सत्य आहे. आणि आम्ही तर उघड बोलतोय की हे गद्दार आहेत. त्यामुळे यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आला कुठे? आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे गद्दारांच्या बाबतीत कसं काय तुम्ही म्हणता? गद्दारांनी जिथे त्यांनी उघड उघड चोरी केली आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री आणि पोलिसांचा दरारा कमी करण्याचं काम सुरू आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचं या राज्यात चालत नाही, आम्ही वाटेल ते करू शकतो असं दाखवण्याचा हा जो प्रयत्न आहे तो वेळेच चिरडून टाकला पाहिजे. पोलिसांचं काम वाढेल, कायदा सुव्यवस्था बिघडेल अशी कुठलीही कृती करू नये असा सल्ला अजित पवारांनी दिला आहे. याबाबात मी अजित पवारांना धन्यवाद देतो. पण मुळात त्यांच्या आजूबाजूला बसणारी लोकंच जर असं काम करत असतील तर प्रथम त्यांना आवरलं पाहिजे.
मी कुणाल कामराचं समर्थन केलेलं आहे. सुपारीचा प्रश्न उपस्थित होतोय, मग नागपूर दंगलीची सुपारी कोणी दिली? औरंगजेबाच्या थडग्याची सुपारी कोणी दिली होती? नुसत्या सुपाऱ्या सुपाऱ्या करू नका. राज्याची वाट लागत आहे आणि गद्दारांचं उदात्तीकरण जर फडणवीसांना मान्य असेल तर देव सुद्धा त्यांचं पद वाचवू शकेल की नाही असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन चालायचा की गद्दारांचा? संभाजी महाराजांचा वारसा पुढे चालवायचा की अनाजी पंताचा? या सरकारला हा माझा प्रश्न आहे. जर अनाजी पंत त्यांच्यासाठी आदर्श असतील तर त्यांचं वक्तव्य मी समजू शकतो.कुणाल कामरा सत्य बोलला आहे. आणि असं जर असेल तर जो कोणी सत्य बोलेल, सत्यमेव जयते खोडून टाका आणि गद्दारमेव जयते लावून टाका असे उद्धव ठाकरे म्हणाले.
गद्दारांचा उदातीकरण करणारा आणि शिवरायांचा अपमान झालेला झाला असताना गप्प बसेल हा शिवसैनिक असू शकत नाही. जर वाघ्या कुत्र्याची समाधी हा एक वेगळा भाग आहे पण या राज्यातल ईमान हे उखडून टाकलेलं दिसतंय असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.