न्यायाला विलंब लागत असेल तर ते न्याय नाकारण्यासारखं, असा घणाघात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरें यांनी केला. तसेच माझ्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन या मिंध्यांनी आणि गद्दारांनी शिवसेना या आईच्या कुशीवर वार केला असेही ठाकरे म्हणाले.
पैठणमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की, पैठण ही संताची भुमी आहे. एकनाथांच्या नावाला कलंक लावणारा दुसरा गद्दारनाथ जन्माला आला आहे. त्याचा दुसरा चेला चपाटा ज्या आपण सतत पाच वेळा निवडून दिला. पण निष्ठेचं पाणी त्याला कळालं नाही. म्हणून गद्दारीची दारू प्यायला गेला. आता गद्दारीला गाडण्याची वेळ आली आहे. कारण ही गद्दारी फक्त शिवसेनेशी नाही, गद्दारी फक्त उद्धव ठाकरेंशी नाही तर पैठण आणि पैठणकरांशी आहे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राशी गद्दारी केलेली आहे. गेल्या लोकसभेत तुम्ही त्यांना पाणी पाजलेलं आहे. तिथला गद्दार इथे उभा राहिला असता तर त्याला इथल्या इथे आडवा केला असता. पण पलीकडे जाऊन उभा राहिला, कुणी मदत केली. हे दुर्दैव आहे. वैजापुरकरांनाही मी प्रश्न विचारला की एक गद्दार कसा काय निवडून येऊ शकतो? ही एक महाराष्ट्राची शान आहे, पण शिवरायाच्या संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी कलंक लावला आहे. आणि तो कुणी लावला दिल्लीत बसलेले त्यांचे बाप. कारण मिंध्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी सांगितले की, मोदी आणि शहांना धन्यवाद देतो की त्यांनी मला शिवसेना आणि निशाणी दिली. हे काम त्यांनी केलेले आहे. म्हणून मला असं वाटत आहे की गेली दोन अडीच वर्ष आपली केस तारीख पे तारीख कशी काय चालली आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तसेच आपले पंतप्रधान सरन्यायाधीशाच्या घरी गेले, गणपतीच्या पाया पडले, आरती केली. काँग्रसेने जेव्हा यावर फोटो पोस्ट केले तेव्हा भाजपने फोटो पोस्ट केले की मनमोहन सिंह पंतप्रधान असताना सरन्यायाधीश इफ्तार पार्टीमध्ये आले होते. हो आले होते, पण काँग्रेसने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये आडवाणीसुद्धा होते. पण सगळ्यांच्या समोर पार्टी देणे वेगळे आणि सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन आरती करून आले. मग म्हणून आम्हाला वाटतंय की म्हणून आम्हाला तारीख पे तारीख मिळत आहेत की काय. ज्या पद्धतीने शिवसेनेची केस आतापर्यंत निकालात निघायला पाहिजे होती, पण तारीख पे तारीख सुरू आहे. आता 21 ऑक्टोबरला तारीख दिली आहे. मी सरन्यायाधीशांना विनंती करतो की माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. पण अशी तारीख देण्यापूर्वी तुमच्या निवृत्तीनंतरची तारीख द्या म्हणजे तुम्हीही मोकळे आणि आम्हीही मोकळे. एका बाबतीत सरन्याधीशांनी मी धन्यवाद देतो की त्यांनी मोदी घरी येत आहेत म्हणून त्यांनी गणपती बाप्पााला पुढची तारीख दिलेली नाही. न्यायदेवतेवर विश्वास आहेच पण लोकमान्य टिळक ब्रिटिश कोर्टात म्हणाले होते की तुमच्यापेक्षाही मोठे न्यायालय आहे जनतेचे न्यायालय. पैठण तालुक्यात गद्दारी झाली आहे. तुमच्याकडे मी न्याय मागायला आलोय तारीख मागायला आलेलो नाही. सर्वोच्च न्यायलाबद्दल आम्हाला आदर आहेच, पण त्या न्यायाला विलंब लागत असेल तर ते न्याय नाकारण्यासारखे आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेना या आईच्या कुशीवर वार
साधा स्लीपबॉय होता संधी दिली तर आमदार झाला. पाच वेळा आमदार झाला तर माला वाटला की निष्ठावान आहे आता तरी मंत्री करावा त्यामुळे मी मंत्री केला. पण माझ्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन या मिंध्यांनी आणि गद्दारांनी शिवसेना या आईच्या कुशीवर वार केला. आईच्या कुशीवर वार करणारे आता लाडकी बहीण योजना घेऊन जनतेमध्ये फिरत आहेत. लाडकी बहीण ठीक आहे पण सुरक्षित बहीणीचे काय? तिकडे बंगाल पेटले आहे आणि आम्हाला सांगतात राजकारण करू नका. ही दुर्दैवी घटना आहे. राजकारण नाही पण निषेध सुद्धा करायचा नाही. मुलगी शिकली प्रगती झाली. जेव्हा मुलगी शाळेत शिकायला जाते तेव्हा तिच्यावर अत्याचार होतो. तो अत्याचार झाकणारे गद्दार सरकार त्यांना जोडे नाही मारायचे मग काय फुलं फेकायची? मुलीवर अत्याचार झाला तर पोलीस तक्रार घेत नव्हते, कुणाचे सरकार आहे? काय करतात तुमच्या योजना? तक्रार घेत नव्हते पण त्याचा निषेध करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली तेव्हा मला शरम वाटते की आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. एकतर तुम्ही न्याय देऊ शकत नाही, आमच्या मुलींची सुरक्षा करू शकत नाही. आणि या घटनेविरोधात कुणी निषेध केला तर तुम्ही आरोपींना मोकाट सोडता आणि आंदोलन करणाऱ्यांना गुन्हे टाकता. बंगाल अजूनही पेटलेले आहे. न्याय मागण्याचा हक्क आम्हालाही आहे.
मनाने सडला आहे, मनाने विकला
ज्या दिवशी गद्दारी झाली तेव्हा मी त्यांना पकडून ठेवू शकलो असतो. मी मुख्यमंत्री होतो, या भामट्याला सहज पकडून ठेवलं असतं. पण जो मनाने सडला आहे, मनाने विकला आहे असा एकही साथीदार मला नकोय. मी त्यांना दारं मोकळी केली आणि म्हटलं गेट आऊट, सूरत गुवाहाटीला जिथे जायचं आहे तिथं जा. आता माझ्याकडे काही नसताना तुम्ही माझ्यासोबत आहात. हीच तर माझ्या आयुष्याची कमाई, शिवसेना प्रमुखांचे माँसाहेबांचे आशीर्वाद आहेत.
ठाकरे ब्रॅण्ड
सत्ता असली काय नसली काय मला पर्वा नाही. शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलंय की उद्धव एक लक्षात ठेव सत्ता येते जाते परत येते. पण एकदा का शब्द दिला तर जीव गेला तरी बेहत्तर शब्द खाली पडू देता कामा नये. हा ठाकरे ब्रॅण्ड असाच झालेला नाही. आमच्याकडे सत्ता नसली तरी शब्दाला जागे राहण्याची आमची घराणेशाही आहे, हे मला मोदींना मुद्दामहून सांगायचे आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनाप्रमुखांचे फोटो लावले, आपली पहिली निशाणी घेऊन खोटा प्रचार केला. आता घराघरामध्ये शिवसेनेची मशाल पोहोचवणं हे तुमचं काम आहे. घराघरात मशाल गेल्यानंतर गद्दारांना घाम फुटला असणार. घरात मशाल गेल्यानंतर त्यांच्या बुडाला आग लागणारच आणि ती लावायलाच मी आलेलो आहे. असे गद्दार पैठणच्या राजकारणात वळवळ करता कामा नये. पैठणच्या या गद्दाराला मी गाडायला आलोय.