आपण सर्व जाती-धर्म-समाज म्हणून एक राहिलो तर भाजपपासून दोन हात ‘सेफ’ राहू – आदित्य ठाकरे

भाजपचे पेंद्रात बहुमताचे सरकार आहे, पण तरीही कटेंगे तो बटेंगे…एक है तो सेफ है असे सांगतात. पण मी या दोन वाक्यांशी सहमत आहे. कारण आपण बटेंगे तो कटेंगे झालो म्हणजेच आपण विखुरलो गेलो तर भाजप आपला खिसा कापेल. आणि एक रहेंगे तो सेफ रहेंगे म्हणजे सर्व जात धर्म समाज म्हणून एक राहिलो तर भाजपपासून दोन हात दूर सेफ राहू असा त्याचा अर्थ आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या दोन्ही घोषणांचा सडेतोड समाचार घेतला.

शिवसेनेचे दहिसरमधील उमेदवार विनोद घोसाळकर आणि बोरिवलीतील शिवसेनेचे उमेदवार संजय भोसले यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या दोन्ही घोषणांचा यथेच्छ शब्दांत समाचार घेतला. देशात बहुमताचे भाजपचे सरकार आहे. बहुमताच्या तुमच्या केंद्रातील सरकारमध्ये आज तुम्ही बोलत आहात की, हिंदू खतरे मे है तर मग भाजप नसलेली बरी असा टोला त्यांनी मारला.

कटेंगे बटेंगेच्या पुढे काय

कटेंगे तो बटेंगे याच्या पुढे काय तुम्ही या देशाला दिलेत. दहा वर्षांत तुम्ही नोट बंदी केलीत. जीएसटीसारख्य योजना आणल्या,पण महाराष्ट्राला जीएसटीचा परतावा येत नाही. दुकानदार त्रस्त आहेत. पीएमएलएल जीएसटीमध्ये आणून ठेवला आहे. दुकानदार हैराण आहेत. दहा वर्षे तुमचे सरकार असल्यावरही नेहरू-गांधींनी काय चूक केली ते सांगता आणि कटेंगे तो बटेंगे… एक है तो सेफ है सांगता, याचा आज भाजपने विचार केला पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

कटेंगे-बटेंगे लुटेंगे हेच भाजपचे काम

आता भाजपवाले प्रचारासाठी येथे येतील. सभा सुरू केली की सांगतील कटेंगे.. बटेंगे.. छटेंगे.. लुटेंगे…पण हेच त्यांचे चालते. म्हणजे गल्लीबोळात त्यांना टाकले की भाजपवाल्यांचा रॅप चांगला होईल. भाजपवाल्यांना पुढे त्यांना भूमिका नसते. हरायला आले की हिंदू-मुस्लिम बोलतात, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करतात. काही नसेल तर इंडिया पाकिस्तान बोलून टाकतात. काही नसले तर बांगलादेशवर बोलून टाकतात याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

आम्हाला विकास आणि हिंदुत्व शिकवू नका

गुजरात आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुंबईत येऊन विकासाचे मॉडेल आम्हाला शिकवतात. पण योगी साहेब, जर बघा तुमच्या राज्यात आज दहा लहान मुले गेली आहेत. यामध्ये मला राजकारण करायचे नाही, पण तिथे जास्त लक्ष द्या. तुम्ही राजकारण करता. कोविड काळात गंगेत मृतदेह वाहत होते तसे आम्ही या महाराष्ट्रात होऊ दिले नाही. आम्हाला विकास आणि हिंदुत्व शिकवू नका. सुरत-अहमदाबादमध्ये कोविड काळात ऑक्सिजनसाठी लोक रस्त्यावर आले होते. कोणताही जात धर्म असो, आम्ही कोविड काळात मुंबईत सेवा दिली. तुम्ही आम्हाला विकास आणि हिंदुत्व शिकवू नका, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला.