मोदी महाकुंभात डुबकी मारतात, पण आमच्या गणेशमूर्तींचे विसर्जन रोखतात, हे कसे? उद्धव ठाकरे यांचा संताप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभात केलेले गंगास्नान आणि दुसरीकडे महायुती सरकारने मुंबईत पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनावर घातलेली बंदी यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाष्य केले. लाखो-करोडो लोक कुंभात डुबकी मारून येत आहेत. प्रत्येकाच्या भावनांचा शिवसेनेला आदर आहे. ज्याला वाटते तिकडे जाऊन डुबक्या माराव्यात आणि पवित्र व्हावे. पंतप्रधान मोदींनीही गंगेत डुबकी मारली, पण महायुती सरकार आणि मुंबई महानगरपालिका मुंबईत माघी गणपतींचे विसर्जन होऊ देत नाहीत. हा काय प्रकार आहे? हे कोणते हिंदुत्व आहे? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. बौद्धिकदृष्ट्या ठेंगू असलेल्या माणसांच्या सावल्या लांब पडू लागल्या की सूर्यास्त जवळ आलाय असे समजायचे. आज आपला देश सूर्यास्ताच्या दिशेने चाललाय की काय, अशी भीती वाटायला लागलीय. कारण नेमका कोणता धर्म आपल्याला अपेक्षित आहे, कोणता देश अपेक्षित आहे, कोणती संस्कृती अपेक्षित आहे, कुणाचा कुणाला पत्ता नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन आज मुलुंड येथे पार पडले. उद्धव ठाकरे यांनी त्या अधिवेशनाला प्रमुख अतिथी म्हणून संबोधित केले. माघी गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी मुंबईतील गणेश मंडळांना महापालिकेने नोटिसा बजावल्या. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन करायचे नाही असे महापालिकेकडून सांगण्यात आले. त्यावरून गणेश मंडळांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता. शिवसेना गणेश मंडळांच्या पाठीशी उभी राहिली आणि विसर्जन पार पडले. तरीही अनेक गणेशमूर्ती महापालिकेने अडवून ठेवल्या आहेत. त्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकार आणि महापालिकेसह भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादावरही प्रहार केला.

मराठी शाळा बंद पडताहेत हे दुर्दैव

मराठी शाळा बंद पडत आहेत हे दुर्दैव आहे, अशी खंतही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले की, शाळेची फी भरायला पैसे नव्हते म्हणून प्रबोधनकार ठाकरे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना सातवीत शाळा सोडावी लागली होती. पण शिक्षण पूर्ण करू शकले नाही म्हणून ते कुठेही अडले नाहीत. शाळेवाचून त्यांना कुठे अडचण आली नाही. शाळेत जाऊ नका असा त्याचा अर्थ नाही, असेही ते म्हणाले.

केजरीवालांना लोक विसरणार नाहीत

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल हरले त्याचा काहींना आनंद झाला. काही जण झोपेतून उठले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली. काहीजण कुंभकर्णासारखे झोपलेले असतात. काही घडल्यानंतर ते कुंभकर्ण उठतात आणि प्रतिक्रिया देतात. तशा काहींनी उठून प्रतिक्रिया दिल्या. केजरीवालांनी दिल्लीत शाळांसाठी, विजेसाठी, पाण्यासाठी काम केले आहे. त्याचप्रमाणे मुंबईत शिवसैनिकांनी रक्तदान, अॅम्ब्युलन्स सेवा अशा माध्यमातून कामे केली आहेत. लोक ती विसरणार नाहीत, असा विश्वास व्यक्त करत निकालात नक्कीच घोटाळा आहे, असा दाट संशय उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

आरएसएस वाळवीसारखा देश पोखरतोय… तुम्ही प्रखर राष्ट्राभिमानी हिंदू तयार करा

शिवसेनेचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. शिवसेनेची मशाल हाती घेऊन तसे प्रखर राष्ट्राभिमानी हिंदू अगदी गाव-वाड्यावस्त्या-पाड्य़ांमध्येही तयार करण्याचे काम करा, असे आवाहनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) जिथे जातो तिथे वाळवीसारखा पोखरायला लागतो. आधी दिसत नाही, पण नंतर कळते वाळवी लागली आहे. तसे वाळवीसारखे काम करू नका, असाही सल्ला त्यांनी दिला.

मला मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटतेय

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष, आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी शिक्षकांच्या व्यथा, वेदना, मागण्या मांडल्या. उत्तरपत्रिकेत पुरवण्या असतात, अर्थसंकल्पात पुरवणी मागण्या असतात तशा या शिक्षकांच्या पुरवण्या आहेत. पण अभ्यंकर यांनी ज्या पद्धतीने मांडल्या ते पाहून आमदार झाल्यासारखे वाटतेय या गाण्याप्रमाणे मलाही मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटले अशी मिश्किली यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली, त्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

शिक्षकांना धनाची चिंता करावी लागू नये

एखादी गोष्ट आपल्याला पटली असेल तरच ती दुसऱ्याला सांगू शकतो. एखाद्या विषयाची आवड नसेल तर विद्यार्थ्यांना शिकवणार काय? कंत्राटी कामे बंद होतील तेव्हाच ते शक्य आहे. चित्रकाराची, वक्त्याची, गायकाची शैली असते तशी शिक्षकाचीही शिकवण्याची शैली असते. शिक्षक तन, मन, धनाने काम करेल तर ती विकसित होईल. घर चालवायला धनही लागते. त्याची चिंता करण्याची वेळ शिक्षकांवर येऊ न देणारे सरकार पाहिजे असेल तर हाती शिवसेनेची मशाल घेऊनच पुढे जावे लागेल आणि शिक्षक सेना नक्कीच तसे करेल, असा आत्मविश्वासही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

 

शिवसेनेचा प्रचार बेधडकपणे करा

प्रत्येक शिक्षकाला मतदानाचा अधिकार आहे. निवडणूक यंत्रणेचे काम त्यांना दिले जाते, पण निवडणूक प्रचाराचे काम करण्यास मनाई केली जाते. शिक्षक त्याच्या मनाने मतदान करू शकतो तर तो एखाद्या पक्षाचा प्रचार का करू शकत नाही? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राच्या विधिमंडळात शिक्षकांसाठी वेगळा मतदारसंघ ठेवला आहात तर शिक्षकाला त्याच्या मनाप्रमाणे राजकीय पक्षाचे काम करायला अडवणारे सरकार कोण? अशीही विचारणा त्यांनी केली.

शिवसेनेची सदस्य नोंदणी सुरू झाली आहे. शिक्षकांनीही शिवसेनेचे सदस्य व्हायला हवे. फावल्या वेळेत शिक्षकांना सरकार बाकीची कामे सांगते तर फावल्या वेळेत शिक्षकांनीही शिवसेनेची सदस्य संख्या वाढवावी. आता निवडणुका नाहीत, मग फावल्या वेळेत शिवसेनेचा प्रचार बेधडक करा, नाहीतर तुमच्या मागण्या नुसत्या कागदावर राहतील, असा सावधगिरीचा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. शिक्षक सेनेचे अध्यक्ष, आमदार ज. मो. अभ्यंकर विधान परिषदेत घसा कोरडा होईपर्यंत बोलतील, पण समोर बहिरे किंवा कान बंद करून बसलेले सत्ताधारी असतील तर उपयोग काय तुमच्या बोलण्याचा? तुमच्या ताकदीचा तरी काय उपयोग आहे? ही ताकद आता एकवटली आहे. या ताकदीची शक्ती आपण सरकारला दाखवलीच पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले

 

प्रत्येक कार्यक्रमावेळी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या सर्व तसबिरींना आपण हार घालतो. कारण या महापुरुषांनी तत्कालीन समाजाला अंधारातून बाहेर काढले. आज आपण आहोत ते त्यांच्यामुळेच. आता समाजाला पुन्हा त्यांची गरज आहे. महापुरुष गेले कुठे? महापुरुषांचे युग संपले की काय?

 

आज आपल्यात तसा कुणीच दिसत नाही. पु. ल. देशपांडे यांच्या भाषेत सांगायचे झाले तर धरावे असे पाय आणि हार घालावे असे गळे कुठेच दिसत नाहीत. धरावे असे गळे खूप दिसतात, पण ते धरताच येत नाहीत अशी पंचाईत आहे.

एकजूट कायम ठेवा,तिची वज्रमूठ होईल

शिक्षक हा समाजातला महत्त्वाचा घटक आहे. त्याचे समाधान होईल असे निर्णय घेण्याची जबाबदारी सर्वस्वी सरकारची आहे. परंतु सरकारकडून त्याबाबतीत चालढकल सुरू आहे. ही चालढकल सहन करता कामा नये, असे सांगतानाच, शिवसेना शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी खांद्याला खांदा लावून सोबत राहील, असे याप्रसंगी शिवसेना नेते, माजी मंत्री सुभाष देसाई म्हणाले. शिक्षकांची ही एकजूट अशीच कायम ठेवलीत तर तिची वज्रमूठ झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. अधिवेशनातले ठराव हा कृती आराखडा असून त्यानुसार आपल्याला काम करायचे आहे, असे ते म्हणाले.

या अधिवेशनानिमित्त शैक्षणिक परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले होते. त्यात शिक्षक सेनेचे पदाधिकारी भाऊसाहेब घाडगे, ठाण्याचे जिल्हाध्यक्ष पाटोळे, मंगेश पाटील, किरण अगरवाल, आलम खान, वैशाली शिंदे, बाळासाहेब पाटील, मुश्ताक पटेल आदी पदाधिकाऱ्यांनी विविध विषयांवर आपले विचार मांडले. याप्रसंगी शिवसेना नेते व सचिव विनायक राऊत, खासदार संजय दिना पाटील आदी उपस्थित होते.

 

तू डुबलास तरी चालेल, डुबकी मार… हे हिंदुत्व बिलकूल मान्य नाही

उद्धव ठाकरे यांनी यावेळी महायुती सरकारच्या फसव्या योजनांवरही शरसंधान केले. ते म्हणाले की, महायुतीने निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली. आतापर्यंत पाच लाख महिलांना अपात्र ठरवले. लाडका भाऊ योजना बंद केली. एक रुपयात पीक विमा योजनेचेही बारा वाजले आहेत. त्यानंतर योजनादूत केले होते तेसुद्धा बंद केले. महाविकास आघाडी सरकारने गोरगरीबांसाठी दहा रुपयांत शिव भोजन थाळी सुरू केली होती ती योजनाही बंद करण्याचा घातक व नतद्रष्ट विचार दळभद्री महायुती सरकार करतेय. गरीबांसाठी काहीच नाही. नुसते जायचे आणि डुबक्या मारायच्या. तू डुबलास तरी चालेल, पण डुबकी मार. हे हिंदुत्व नाही, हे हिंदुत्व शिवसेनेला बिलकूल मान्य नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. गोरगरीबांना उपाशी ठेवून काहीतरी मोफत देतोय अशा उपकार केल्याच्या आविर्भावात सत्ताधारी असतील तर ते बदललेच पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढत राहू -ज. मो. अभ्यंकर

शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना सदैव लढत राहील, असे आश्वासन यावेळी शिक्षक सेनेचे अध्यक्ष, आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी दिले. शिवसेनेच्या प्रत्येक निवडणुकीत प्रचारकामी शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे सांगतानाच, मिंधे आणि महायुती सरकारच्या काळात शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राच्या झालेल्या अधोगतीवरही अभ्यंकर यांनी बोट ठेवले. 2006 पर्यंत महाराष्ट्र गुणवत्तेच्या परिभाषेत पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहणारा महाराष्ट्र आता सातव्या क्रमांकावर फेकला गेला याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.  सरकारने प्राथमिक शाळांचे अनुदान रोखल्याने 65 हजार शिक्षक विनावेतन काम करत आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे हजारो शिक्षक दरवर्षी अतिरिक्त  होतात आदी समस्याही अभ्यंकर यांनी यावेळी मांडल्या.  

शिक्षक कंत्राटी नकोत

शैक्षणिक अभ्यासक्रम ठरवायला तसे तज्ञ असायला हवेत आणि तो ठरल्यानंतर शिकवणारे शिक्षकही तसेच तज्ञ हवेत. शिकवणारा माणूस जर शाळेत तांदूळ निवडत असेल, निवडणुकीच्या डय़ूटीवर त्याला लावले जात असेल आणि फावल्या वेळेत शिक्षक म्हणून जात असेल तर अभ्यासक्रम बदलूनही फायदा होणार नाही. शिक्षकांबद्दलची सरकारची वागणूक बदलणार नसेल तर काहीही बदलणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिक्षक म्हणजे कंत्राटी कामगार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

विधानसभेचा निकाल मान्य नाही

निवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेला पराभव खोटा होता, काहीतरी गडबड घोटाळा नक्कीच आहे असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामांचाही दाखला दिला. मुलांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करणे हे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न होते आणि 2014 मध्ये आपण ते प्रत्यक्षात आणले, पण सरकारने स्वीकारायला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.  संपूर्ण देशात मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आपण व्हर्च्युअल शिक्षण सुरू केले. ई लर्निंग सुरू केले, असे ते म्हणाले.