अमित शहा, बंद दाराआडचे धंदे बंद करा! हिंमत असेल तर मैदानात या आणि शिवसेना संपवून दाखवा! उद्धव ठाकरे यांचा नागपुरातून जोरदार हल्ला 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुटील कारस्थानाचा बुरखा टराटरा फाडला. चार दिवसांपूर्वी अमित शहा नागपुरात येऊन गेले. बंद दाराआड बोलले… उद्धव ठाकरेंना संपवा, शरद पवारांना संपवा. अहो अमित शहा, हे बंद दाराआडचे धंदे बंद करा आणि हिंमत असेल तर मैदानात या. शिवरायांच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवा, असे जाहीर आव्हान देत उद्धव ठाकरे यांनी अमित शहांवर घणाघाती हल्ला केला.

नागपूरच्या कळमेश्वर येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी अमित शहा तसेच भाजपच्या राजकारणावर जोरदार निशाणा साधला. अमित शाह आम्हाला संपवण्यासाठी येणार आहेत. आम्हाला केवळ जनता संपवू शकते. जनतेनं सांगितलं की, उद्धव ठाकरे घरी बस, तर मी घरी बसेन. मात्र हे मला दिल्लीवरून घरी बसायला सांगत असतील तर जनताच त्यांना घरी बसवेल. हा लढा माझा नाही किंवा शरद पवार यांचा नाही तर आपणा सर्वांचा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेला कोणीही संपवू शकत नाही. तुमच्या कित्येक पिढ्या उतरल्या तरी तुम्हाला ते शक्य होणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी शहांना ठणकावले. आमच्यावर जेव्हा घराणेशाहीची टीका करता तेव्हा तुम्हाला सांगू इच्छितो की मी कुटुंबवत्सल आहेच. म्हणून कोरोना काळात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही घोषणा केली होती. महाराष्ट्र माझं कुटुंब आहे. त्या कुटुंबाचा सांभाळ करण्याच्या हेतूने मी ती योजना आणली पण मधे पेव फुटलं होतं मोदी परिवारचं. ते तर इकडे तिकडे फिरत आहेत. त्यांना परिवार आहेच कुठे?, असा बोचरा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खिशातले नाहीत

गद्दारांना 50 खोके आणि आम्हाला 1500 रुपये असं महिला सांगतात. 2014 ला मोदी यांचा आम्ही प्रचार करत होतो. 15 लाख देणार होते. त्याचे 1500 का झाले? 1500 रुपयांत काय होतं. महिलांच्या मुलांचं शाळेतील अॅडमिशन तरी होतं का? लाडकी बहीण योजनेचे पैसे काय तुमच्या खिशातले नाहीत. जनतेचेच पैसे तुम्ही देत आहात, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.  मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली पण त्याचा डंका पिटवण्यासाठी स्टेज उभारून कार्यक्रम घेतले नाहीत. माझे पैसे मी तुम्हाला देत आहे, असे कधी सांगितले नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्हाला गद्दारांची कमाई नको आहे, असे जनतेने ठणकावून सांगायला हवे. मी म्हणजे कुणीतरी आहे असं त्यांना वाटतं आहे. दिल्लीत जाऊन मोदी-शाह यांच्यासमोर  महाराष्ट्र कटोरा पसरणार नाही. मिंधे म्हणजे महाराष्ट्र नाही, गुलाबी जॅकेट म्हणजे महाराष्ट्र नाही. महाराष्ट्राची जनता माझ्या समोर बसली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले

सत्तेची नाही, महाराष्ट्राची लूट थांबवण्याची लढाई

राज्यातील हे सरकार कोणत्याही परिस्थितीत उलथून टाकायचंच, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला. मला विजय नको आहे तर दणदणीत विजय हवा आहे. सरकार आल्यानंतर मी महाराष्ट्राची लूट थांबवून दाखवेन. मी मुख्यमंत्री असताना उद्योग गुजरातला गेल्याची एकही बातमी येत नव्हती. विधानसभेची निवडणूक ही सत्तेची लढाई नाही तर महाराष्ट्राची लूट थांबवण्याची लढाई आहे. जो महाराष्ट्र प्रेमी असेल तोर महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहील, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं.

मालवणची दुर्घटना देशाला लाजिरवाणी

मालवणच्या किनाऱ्यावर घडलेली दुर्घटना संपूर्ण महाराष्ट्र, देशाला लाजिरवाणी असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. पुतळा उभारून एक वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच पुतळा कोसळला. केवळ लोकसभा जिंकायची, शिवसेनेच्या ताब्यातील कोकण जिंकून घ्यायचे. म्हणून पंतप्रधान तिकडे किनाऱ्यावर आले. नौदल दिन साजरा केला. देशाच्या नौदलाचे सामर्थ्य जगाला दाखवण्यासाठी तुम्ही माझ्या शिवरायांच्या भूमीत आलात. याचा आम्हाला अभिमान आहे. पण नौदलाचे संपूर्ण सामर्थ्य दाखवताना ज्यांनी आपल्या देशात पहिल्यांदा आरमार सुरु केले, त्या छत्रपती शिवरायांचा पुतळा ज्या पद्धतीने उभारला, त्याची तुम्हाला लाज लज्जा शरम काहीतरी पाहिजे होती. त्यातही तुम्ही पैसे खाल्ले, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली. काल त्या समितीचा रिपोर्ट आला. साचा नीट नव्हता. त्याच्यात जे काही वेल्डिंग होते, ते बरोबर नव्हते. जो धातू वापरला तो बरोबर नव्हता. समुद्रकिनारा आणि वारे लक्षात घेऊन स्टेनलेस स्टीलसारखा धातू वापरायला पाहिजे होता. तुम्ही लोखंड वापरले ते गंजून गेले, त्याचे खिळे गंजून गेले, त्याचे जॉईन्ड गंजून गेले आणि पुतळा पडला आणि मिंधे दाढी खाजवत म्हणताहेत, वाऱ्याने पुतळा पडला. अहो, वाऱ्याने तुमची दाढी नाही ती उडत आणि महाराजांचा पुतळा पडतो. बेशरमपणाने सांगता, वाऱ्याने पडला. मग ह्यांना आपण जोडे मारले तर म्हणतात. जोडे का मारता? मग दुसरे काय मारायचे तुम्हाला? एखादी गोष्ट करताना तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे, जे काही मी करतोय, ते माझ्या या दैवताला साजेसे करतोय. नुसतंच आम्ही काही शतकानुशतके झालीत, 300 वर्षे…. 400 वर्षे झालीत. दुसरे पुणी मिळत नाही म्हणून घेतला शिवाजी महाराजांचा पुतळा आणि लावला तिकडे. असे नाही ते. ते दैवत आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

भूखंडाचा श्रीखंड बावनपुळे सारखे भाजपवाले खाताहेत!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनपुळे यांच्या संस्थेला पाच हेक्टरचा शासकीय भूखंड देण्याच्या मिंधे सरकारच्या निर्णयावरही उद्धव ठाकरे यांनी तोफ डागली. करोडो रुपयांची जागा जवळपास फुकटात दिली आहे. मी नागपूरला आल्यावर मला आपले काही पदाधिकारी म्हणाले, आपले सरकार आले कि याची चौकशी लावायची. मी म्हणालो, चौकशी अजिबात नाही लावायची. आपण सरकारकडे जाऊ आणि बावनकुळेंना जिथे जमीन दिलीय, तिकडेच आजूबाजूला दुसरी जमीन त्याच दराने आमच्या माणसाला देण्यास सांगू. मगच बावनकुळेंच्या भूखंड वाटपात भ्रष्टाचार झाला नाही असे आम्ही मानू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रात जो जन्माला येतो, तो शिवप्रेम आपल्या हृदयात, रक्तामध्ये, धमन्यांमध्ये घेऊनच जन्माला येतो. शिवप्रेम शिकवावे लागत नाही. म्हणून तर इतकी वर्षे झाल्यानंतरसुद्धा ’छत्रपती शिवाजी महाराज कि जय’ बोलल्यानंतर असे म्हणतात कि एखादा मृत झालेला माणूस सुद्धा ताडकन उठून उभा राहील. एवढी ताकद आणि एवढे तेज, ह्या दैवताच्या घोषणेमध्ये आहे. हे सगळे दैवत आहे. मध्ये आठ-दहा दिवसांपूर्वी येऊन गेले, ज्याला मी बाजारबुणगा म्हटले. नागपूरमध्ये येऊन गेले. काय त्यांचे दुर्दैव असे आहे. दोन महिन्यांपूर्वी पुण्यात येऊन गेले होते, थोड्या दिवसांनी माझा नेमका पुण्यात कार्यक्रम. ठोकला तिकडे. तिकडे मला म्हणाले होते, औरंगजेब फॅन क्लबचे संस्थापक उद्धव ठाकरे. म्हटले मी औरंगजेब फॅन क्लबचा संस्थापक असेन तर तुम्ही अमित शहा नाही अब्दाली आहात, अहमदशहा अब्दाली, असा जबरदस्त टोला उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना लगावला.

यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते संपर्कप्रमुख भास्कर जाधव, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख, खासदार श्यामपुमार बर्वे, काँग्रेस नेते सुनील केदार, माजी खासदार प्रकाश जाधव, जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले, उत्तम कापसे, दुष्यंत चतुर्वेदी आदी मान्यवर उपस्थित होते.

भाजपला दाढीवाला डिंक्या, गुलाबी अळी लागलीय!

विदर्भात संत्री आणि कापूस शेतकऱ्यांची हालत बेक्कार झाली आहे. आता भाजपची हालत कशी झालीय, माहीत्येय का? कारण संत्र्याला डिंक्या रोग येतो. पुठे पोखरतो, खोडाला. तसाच भाजपला आता दाढीवाला डिंक्या रोग झाला आहे. तो त्याचे खोड पोखरतोय. कापसावर गुलाबी अळी पडते. जॅकेट असते कि माहित नाही. पण गुलाबी असते. ह्या भाजपचे रोपटे ज्या संघाने जोपासले, त्या भाजपच्या रोपटय़ाला आता वरून गुलाबी अळी आणि दाढीवाला खोड किडा लागलाय. मोहनजी, हा भाजप तुम्हाला मान्य आहे का? असा खरमरीत सवालही उद्धव ठाकरे यांनी भाषणातून केला.

सिनेटचा जो निकाल तेच चित्र महाराष्ट्रात

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले कि, काल शिवरायांच्या आशीर्वादाने मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या दहाच्या दहा जागा आपल्या युवासेनेने जिंकल्या आहेत. सगळे पदवीधर आणि सुशिक्षित मतदार. त्याच्यामध्ये सुद्धा आडकाठी घातली होती. दोन वर्षे निवडणूक पुढे ढकलत होते. आता आपण विजयोत्सव साजरा केल्यानंतर ताई म्हणतात. जणू काही ही निवडणूक देशाचा पंतप्रधान ठरवणारी होती. होय, होतीच. कारण ज्यांनी मतदान केले ते सुशिक्षित, समजदार. ह्या देशाची लोकशाही मानणारे नागरिक आहेत. संजय राऊत तुम्ही जे काल सांगितले ते त्या निवडणुकीत ईव्हीएम नव्हते म्हणून सगळेच्या सगळे निवडून आले. यांचे अभाविप वगैरे काही आहेत ना. त्या सगळ्यांचे डिपॉझिट जप्त झाली असती एवढी कमी मते त्यांना पडली. त्यांची सगळ्यांची मते जरी एकत्र केली, तरी आपल्या एका उमेदवाराच्या बरोबरीने ती मते येऊ शकत नाहीत. एवढा प्रचंड प्रचंड आणि प्रचंड आशीर्वाद मुंबईकरांनी आणि जो संपूर्ण कोकणपट्टा आहे. अगदी मुंबई, पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत सगळ्यांनी आपल्याला भरघोस यश दिलेले आहे. पण निवडणूक रविवारी होणार होती. ह्या पेद्रेनी निवडणूक केली रद्द. मग आपण गेलो कोर्टात. आणि कोर्टाने मारला हातोडा. चालणार नाही… निवडणूक घेतलीच पाहिजे. रविवारची निवडणूक बुधवारी झाली. सुट्टीच्या दिवशी घेणार होते, ती बुधवारी घेतली, तरीसुद्धा आपण जिंकलो. हेच चित्र मला राज्यभर दिसतेय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पुतळ्याच्या कामातही भाजपचा भ्रष्टाचार :  अनिल देशमुख

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी आपल्या भाषणात मालवणच्या पुतळा दुर्घटनेचा उल्लेख केला. मालवणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांत कोसळला. या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करण्यात भाजपच्या लोकांनी मागेपुढे पाहिले नाही. देशात, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी 100-100 वर्षांचे पुतळे समुद्रकिनारी उभे आहेत. त्या पुतळ्यांना काही झाले नाही. मात्र आठ महिन्यांत मालवणातील पुतळा पडला. ही महाराष्ट्रातील आणि देशातील लोकांसाठी अतिशय दु:खाची गोष्ट आहे, असे ते म्हणाले.

वन नेशन वन इलेक्शन नाही मोदींचे वन नेशन वन कॉन्ट्रक्टर

अदानीला सगळं द्यायचं हे फक्त मुंबईत चाललं आहे असं मला वाटलं होतं; पण आज बातमी वाचली की चंद्रपूरची एक शाळा ती पण अदानींना देऊन टाकली आहे. अदानी म्हणजे राष्ट्रसंत आहेत का? जय देव जय देव जय अदानी बाबा अशी आरती वगैरे गाणार आहेत की काय? बाकीचे लोक नाहीत का, अशी प्रश्नांची सरबत्ती उद्धव ठाकरे यांनी केली. वन नेशन वन इलेक्शन नाही, वन नेशन वन कॉन्ट्रक्टर ही या मोदींची धारणा आहे. एकच कंत्राटदार त्यालाच सगळी कामं देत आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

भाजप सध्या हिंदुत्वाच्या नावाखाली गुंड, भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेत आहे. इतर पक्ष फोडत आहे. आमच्यासोबत असाल तर संत, दुसऱ्यांसोबत गेला तर चोर ही सध्या भाजपाची हिंदुत्वाची संकल्पना आहे. भाजपचे हे हिंदुत्व संघाला मान्य आहे का हे एकदा मोहन भागवतांनी सांगून टाकावे.

मिंधे सरकारने मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात पैसे खाल्ले आणि वर बेशरमपणे दाढी खाजवत सांगत आहेत की, पुतळा वाऱ्याने पडला. वाऱ्याने तुमची दाढी नाही का उडत?

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

कळमेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा 25 फुटी भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. विशेष म्हणजे लोकवर्गणीतून हा तेजस्वी पुतळा साकारण्यात आला आहे. हा पुतळा अश्वारूढ असून पुतळ्याचा शिलालेखही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या पुतळ्याचे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सोहळ्यात शिल्पकार सागर देशमुख, प्रज्वल राऊत, अभियंते पुणाल शिरजे यांना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य मला लाभले. मी पहिल्यांदा पाहिले, पुतळा कसा आहे? पुतळा दिमाखदार आहे. पाहत राहावे असा पुतळा आहे. त्याच्यासाठी शिल्पकाराचा मी सत्कार तर केला आहे, पण खास धन्यवाद देतोय की अप्रतिम असा पुतळा तुम्ही केलेला आहे, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर बोलताना व्यक्त केली. दरम्यान, या पुतळ्याची देखरेख सावित्रीबाई फुले ज्ञानवर्धन ग्रंथालय व समाज शिक्षणसंस्था करणार आहे.