
शिवसेनेसह मुंबई-महाराष्ट्रावर आणि मराठी अस्मितेवर घोंगावणारे संकट परतवून लावण्यासाठी एकजुटीची पोलादी वज्रमूठ बनवा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज तमाम शिवसैनिकांना केले.
दक्षिण मुंबईचे लोकसभा संघटक सुधीर साळवी यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आज साळवी यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत लालबाग, परळ, वरळी परिसरातील शेकडो शिवसैनिक होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
लालबाग, परळ, वरळी म्हणजे कट्टर शिवसैनिक आलाच. सुधीर साळवी हेसुद्धा लालबागचेच आहेत. त्यांच्यावर शिवसेनेच्या सचिवपदाची जबाबदारी दिली आहे. साळवी यांची सचिवपदी नियुक्ती करताच, ‘उद्धव ठाकरे यांची मोठी खेळी’ अशा बातम्या आल्या. पण शिवसेनेचे लक्ष्य आता मुंबई महानगरपालिका निवडणूक आहे आणि त्यासाठीच साळवी यांना सचिव पद दिले आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. सुधीर साळवी यांना आता मी पक्षकार्यासाठी मुंबईत पळवणार आहे, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, आमदार अजय चौधरी, वरुण सरदेसाई, माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी नगरसेवक आशीष चेंबूरकर, सचिन पडवळ आदी उपस्थित होते.