राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली.
‘सगळ्यांचे आशीर्वाद, प्रेम आणि शुभेच्छांमुळे कालच्यापेक्षा आज पवारसाहेबांची तब्येत खूप बरी आहे. डॉक्टरांनी त्यांना तीन-चार दिवस आराम करायला सांगितला आहे’, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.
आता पवारसाहेबांची प्रकृती चांगली आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांना चेस्ट कन्जेशन आणि खोकला झाला आहे. तरीही ते दौरे करत होते. ते मुंबईत आहेत. काल त्यांच्या चाचण्याही केल्या. सर्वांच्या शुभेच्छांमुळे त्यांची प्रकृती आता उत्तम आहे. खूप लोकांनी शुभेच्छांसाठी फोन केले. आम्ही कोणाला सांगितलं नव्हतं. पण दौरे रद्द झाल्याने बाहेर सगळ्यांना कळलं. लोकांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचे आभार, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
उद्धव ठाकरे यांचा फोन, शरद पवारांच्या तब्येतीची केली विचारपूस
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी काल फोन केला होता, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.