विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या झंझावाती आणि विराट प्रचार सभा होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद आणि होणारी गर्दी पाहून सत्ताधाऱ्यांना धडकी भरली आहे. हे अधोरेखित करणारा प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे घडला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगा निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
हेलिकॉप्टर उतरल्यानंतर निवडणूक अधिकारी हेलिपॅडच्या ठिकाणी आले आणि बॅगा तपासण्यासाठी अडवलं. स्वतः उद्धव ठाकरे या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला. आतापर्यंत माझ्या आधी कोणत्या राजकीय नेत्यांच्या बॅगा तपसल्या? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना केल्यावर त्यांची भंबेरी उडाली. चार महिन्यांत एकाचीही बॅग नाही तपासली. मीच पहिला गिऱ्हाईक सापडलो? माझी बॅग तपासायला अडवत नाही. पण माझी एक बॅग तपासताना तुम्ही आतापर्यंत मिंध्यांची तपासलीय का? देवेंद्र फडणवीसांची तपासलीय का? अजित पवारांची तपासलीय का? मोदींची तपासलीय काय हो? अमित शहांची तपासली? आले तर मला तपासल्याचा व्हिडिओ पाठवायचा, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
मोदींची बॅग तपासतानाचा व्हिडिओ मला आला पाहिजे. तिकडे तुम्ही शेपूट घालायची नाही. हा व्हिडिओ मी रिलीज करतोय. तपासा माझी बॅग, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमध्ये असलेली उद्धव ठाकरे यांची बॅग तपासली. या तपासणीचा व्हिडिओ उद्धव ठाकरे यांनी स्वतः मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला. काय उघडायचं ते उघडा नंतर मी उघडतो, तुम्हाला, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी अधिकाऱ्याला सुनावले. मोदी आणि अमित शहांच्या बॅग तपासण्याचा व्हिडिओ पाहिजे, असे यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना खडसावले.