उद्धव ठाकरेंच्या बॅगांची रोज तपासणी होतेय, हे अत्यंत गलिच्छ राजकारण; सुप्रिया सुळे यांची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रोज तीन-चार सभा होत आहे. अशातच गेल्या दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात त्यांच्या बॅगांची तपासणी निवडणूक अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. या तपासणीचे व्हिडिओ स्वतः उद्धव ठाकरे यांनी रेकॉर्ड करून शेअर केले आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे.

रोज बॅगांची तपासणी केली जात आहे आणि टार्गेट केलं जात आहे. विरोधी पक्षांचीच का तपासणी होत आहे? अमोल कोल्हेंच्या बॅगांची तपासणी झाली. उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तर रोजच तपासणी होत आहे. हे अत्यंत गलिच्छ राजकारण आहे, अशी सडकून टीका सुप्रिया सुळे यांनी केली. सुप्रिया सुळे यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

संसदेची संयुक्त समिती (JPC) म्हणजे मोठी गोष्ट आहे. आता ही अदृश्य शक्ती त्यावरही कारवाई करणार का? ही लोकशाही आहे, संविधानावर हा देश चालतो. अदृश्य शक्तीची मनमानी चालत नाही. आमच्या जे संस्कार झालेत ते सर्वांना सोबत घेण्याचे आहेत. यामुळे (बटेंग तो कटेंगे) ही जी वक्तव्य केली जात आहेत ती बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाविरोधात आहेत. फुटीची भाषा आपल्या संविधानात नाही. जोडण्याची आणि प्रेम देण्याची भाषा आपल्या संविधानात आहे. त्यामुळे भाजप संविधान विरोधी आहे, हे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतं. आणि म्हणून ते ही भाषा करत आहेत, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. वक्फ सुधारणा विधेयक आणि भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’च्या नाऱ्याचा सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला.