
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असे घोषवाक्य दिले होते. आता स्वाभिमानाने आणि अभिमानाने म्हणा, आम्ही मराठी आहोत. महाराष्ट्र आणि मराठी भाषा संपवण्याची काही जणांची इच्छा आहे, त्यांना आपली मराठी एकजूट दाखवा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज गरजले. हमे मराठी नही आती म्हणणाऱयांच्या कानाखाली आवाज काढा, असे त्यांनी ठणकावले.
मराठी अस्मितेसाठी सदैव आघाडीवर असणाऱया शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने मराठी भाषा दिनानिमित्त न्यू मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात ‘मराठी भाषा गौरव दिना’चा भव्य सोहळा आयोजित केला होता. त्या सोहळय़ात उद्धव ठाकरे यांनी संबोधित करताना मायमाऊली मराठी भाषेची स्तुती करतानाच, मराठी आणि महाराष्ट्रद्वेष्टय़ांवर कडकडीत आसुड ओढले.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात शिवसेनेचे योगदान अधोरेखित करतानाच, मराठी माणसाने स्वाभिमानाने जगावे यासाठीच शिवसेना आहे, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठणकावून सांगितले. अमृताते पैजा जिंके असा मराठीचा गोडवा आहे. अमृताते पैजा जिंकणारी मराठी आहे, तिची चिंता करण्याची काय गरज आहे, पण मराठी भाषा दिनाला आता चिंतेची किनार आहे. कारण गद्दारी करून महाविकास आघाडीचे सरकार पाडले गेल्यानंतर हमे मराठी नही आती असे ऐकून घ्यावे लागत आहे, याकडे लक्ष वेधतानाच, असे आवाज आले तर ते बोलणाऱयांच्या कानाखाली मराठीचा आवाज निघाला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठीचा अभिमान जपताना इतर भाषेचा दुस्वास नको
मराठीचा अभिमान जपायलाच हवा, पण इतर भाषेचा दुस्वास करू नका, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मुलांना इंग्रजी माध्यमात घातले तरी घरी मराठीचे संस्कार देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. पैसे नसल्याने सातवीतच शिक्षण सोडावे लागले असतानाही माझे आजोबा प्रबोधनकार झाले आणि बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदयसम्राट झाले, असे उदाहरणही त्यांनी दिले. महाविकास आघाडीचे सरकार असताना आपण मराठीचे शिक्षण सक्तीचे केले होते, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
मातृभाषेच्या मुद्दय़ावर भक्कम एकजूट हवी
तेलंगणाने मातृभाषेची सक्ती केली आहे. कर्नाटकात भाषेच्या मुद्दय़ावर सर्व लोक लक्ष्य बाजूला ठेवून एकत्र येतात. पण महाराष्ट्रात भाषेच्या मुद्द्यावर अजूनही एकजूट दिसत नाही, अशी खंतही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. आपल्याला मराठी माणसाची भक्कम एकजूट उभारावी लागणार आहे, असे ते म्हणाले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास केंद्रातील मोदी सरकारने अनेक वर्षे टाळाटाळ केली आणि निवडणुकीच्या तोंडावर तुकडा टाकतात तसा अभिजात भाषेचा दर्जा दिल्याची घोषणा केली, याकडेही उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले. हे सर्व जनतेला माहिती असून आता आपल्या जगण्यातून आपण मराठी आहोत हे सर्वांना जाणवून दिले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांचीही भाषा मराठी होती. ते झाले नसते तर भाजपवाल्यांना दिल्ली दिसली नसती, असेही ते कडाडले.
सणासुदीला व्हॉट्सअॅपवर हॅप्पी शिवजयंती, हॅप्पी महाशिवरात्री असे संदेश दिले गेले. आता हॅप्पी होली येईल आणि नंतर गुढीपाडवाही येईल. व्हॉट्सअॅपवरही आपण स्वच्छ मराठी भाषेतच संदेश पाठवले पाहिजेत, असे ते म्हणाले.
जगाला चांगले शिकवणारी आपली आई मराठी भाषा आहे, म्हणून आम्हाला तिचा अभिमान आहे. आपण गावात वगैरे रामराम म्हणतो, पण आता रामराम म्हणणारे आपण जय श्रीराम कधी म्हणायला लागलो हेसुद्धा कळले नाही. कुणी म्हणायला लावले आपल्याला जय श्रीराम? नवीन हिंदुत्ववाद्यांनी आपल्याला राम नावाचे महत्त्व शिकवण्याची गरज नाही. जय जय रघुवीर समर्थ म्हणणारे रामदास स्वामी यांनी आम्हाला ते आधीच शिकवले आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात शाहीर अमर शेख यांनी मराठी माणसासाठी दिल्लीत संसदेच्या बाहेर आंदोलन केले होते. दिल्ली दणाणून सोडली होती. ‘जागा मराठा आम तो जमाना बदलेगा’ असे अमर शेख म्हणायचे आणि मराठी माणसाने जमाना बदलून दाखवला होता. पुढे ते म्हणायचे, ‘दो कोंडी के मोल मराठा बिकने को तय्यार नाही.’ आता गद्दारांमुळे दिल्ली म्हणते हे बिकाऊ आहेत. आता गेले कुठे आपले स्वत्व? असा बोचरा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
जैविकतेवर देशभर चर्चा व्हायला हवी
दिल्ली येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष तारा भवाळकर यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर विचार व्हायला हवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. भवाळकर यांचे भाषण ऐकल्यानंतर मी जैविक नाही असे म्हणणाऱ्यांवर खरेच किती विश्वास ठेवायचा यावर चर्चा व्हायला पाहिजे, देशभर चर्चा व्हायला पाहिजे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवरही शरसंधान केले. भवाळकर यांनी जे भाषण केले ते दिशा देणारे भाषण होते आणि त्यांनी मांडलेले विचार हे प्रबोधनकारांच्या विचारांशी मिळतेजुळते आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मंगळावर यान गेले म्हणून आपण फटाके वाजवतो आणि ते यान पृथ्वीवर उतरत असताना माणसाच्या पत्रिकेत मंगळ शोधत बसतो, नेमके कुठं जायचेय आपल्याला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केवळ धार्मिक कर्मकांड करणे म्हणजे संस्कार नाही, तर चांगले काम करणे म्हणजे संस्कार आहेत, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मी जैविक नाही हे वाक्य कोणाच्या तरी अंगलट आले म्हणून फाटे फाडण्यासाठी म्हणून ती मुलाखत घेतली गेली की काय? असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील मुलाखतीवर टीका केली आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असते तर बिर्ला क्रीडा केंद्र येथे मराठी भाषा भवन कधीच उभारले गेले असते आणि मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम तिथे असता. मराठी रंगभूमीची वाटचाल दाखवणारे दालन आपण करणार होतो. पण आता लाडका पंत्राटदार तिथे आला पाहिजे, असे मिंध्यांचे धोरण आहे. पण याद राखा, तिथे आम्ही उपऱ्यांना घुसू देणार नाही. तिथे एकही वीट रचण्याचा प्रयत्न झाला तर ती उखडून टाकू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
दुबईला जाऊन हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट मॅच बघणारे आम्हाला बाळासाहेबांचे विचार सांगत आहेत. मुख्यमंत्रीपद मिळाले नाही, ते गावाला जाऊन बसतात. ते आम्हाला विचार सांगत आहेत.
मराठी साहित्य संमेलनात शमीमा अख्तर या मुसलमान मुलीने महाराष्ट्राचे राज्यगीत आहे ते पहाडी आवाजात गायले. यावर आता बटेंगे तो कटेंगे म्हणणारे काय बोलणार?
असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर
कविवर्य विंदा करंदीकर यांच्या कवितेच्या ओळींचीही आठवण करून देताना उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसेनेवर आरोप करणाऱया नीलम गोऱहे यांच्यावरही अनुल्लेखाने निशाणा साधला. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱयाने घेत जावे…’ ही विंदांची कविता सर्वांनाच माहीत आहे, पण त्यांचीच दुसरीही एक कविता आहे असे सांगत त्या कवितेतील दोन ओळीही उद्धव ठाकरे यांनी ऐकवून दाखवल्या. ‘असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर’ असे मराठी माणसाने जगण्याची गरज आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
गंगेत कितीही डुबक्या मारा; गद्दारीचा शिक्का पुसला नाही जाणार
उद्धव ठाकरे प्रयागराजमध्ये महाकुंभासाठी गेले नाहीत अशा एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचाही समाचार यावेळी उद्धव ठाकरे यांनी घेतला. ते म्हणाले की, ‘मला आता गंगेचे पाणी दिले. मला मान आहे सन्मान आहे. पण महाराष्ट्राशी गद्दारी करायची, पन्नास खोके घ्यायचे आणि तिकडे डुबकी मारायची याला काय अर्थ? कितीही डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
मराठी साहित्य संमेलनात संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर जे बोलल्या त्याचा विचार व्हायला हवा. आपला जन्म जैविक नाही, असा दावा करणाऱयांवर त्यांनी परखडपणे विचार मांडले. त्यानंतर त्या कुंकवाबाबत बोलल्या. आपल्या देशाचे यान मंगळावर गेले म्हणून आपण आनंदी होतो, पण इथे आपण पत्रिकेत मंगळ शोधतो. आपण कोणत्या दिशेने जात आहोत?
हम करे सो कायदा म्हणत देशातील ‘दोन’ जणांना मराठी भाषा, महाराष्ट्र आणि मराठी माणूस संपवायचा आहे, येथील उद्योगधंदे राज्याबाहेर नेत मराठी माणसाच्या हातात कटोरा द्यायचा आहे, मात्र मराठी माणूस त्यांचा हा कटोरा त्यांच्या चेहऱयावर फेकल्याशिवाय राहणार नाही.
स्वाभिमानाने आणि अभिमानाने म्हणा, आम्ही मराठी आहोत!
न्यू मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात ‘मराठी भाषा गौरव दिना’चा भव्य सोहळा गुरुवारी पार पडला. सभागृह गर्दीने तुडुंब भरले होते. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.