स्वकीयांकडून भारतमातेला साखळदंडात जखडण्याचे प्रयत्न होताहेत, ते आपण तोडणारच! उद्धव ठाकरे यांची गर्जना

मुंबईत शनिवारी संविधान दिंडी काढण्यात आली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधत सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. जनतेचे मूलभूत अधिकार सरकार हिरावून घेत आहे, हीच लोकशाही आहे काय, असा संतप्त सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच एका हातात भगवा आणि दुसऱ्या हातात तिरंगा हे आमचे विचार आहेत, घालीन लोटांगण हे आमचे विचार नाही, असा जबरदस्त टोलाही त्यांनी लगावला.

बॅलेट पेपरद्वारे मतदान होत असताना शिक्का मारून घडी घातल्यानंतर शिक्क्याची शाई त्या उमेदवाराच्या नावालच लागत होती. आपण मतदान कोणाला केले आहे आणि मत नेमके कोणाला मिळत आहे, हे समजत होते. आपण देशाचे नागरिक आहोत. संविधानाने, घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार आपण बजावला आहे, हे आपल्याला त्यावेळी समजत होते. मात्र, आता मतदान कक्षात गेल्यावर बटन दाबतोय, दिवा पेटतोय, आवाज येतोय. एखाद्या प्राणासंग्रहालयात काचेआड प्राणी दाखवतात, त्याप्रमाणे काचेच्या मागून व्हीव्हीपॅटची चिठ्ठी दाखवण्यात येते. आपण सर्व बरोबर आहे, असे बघून निघतो. मात्र, ती चिठ्ठी नंतर खाली जातो, कुठे जाते ते माहित नाही. ती खाली मतदानपेटीत जातही असेल. मात्र, यात प्रश्न आणि शंका कायम राहतात, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

मतदान केल्यावर बटना दाबल्यावर, दिवा लागतो, आवाज येतो, व्हीव्हीपॅटची चिठ्ठी दिसते. मात्र, आपण दिलेले मत आणि नोंदणी झालेले मत यात तफावत आहे किंवा नाही. आपण दिलेले मत नेमके कोणाला गेले, हे जाणून घेण्याचा आपला अधिकार सरकारने हिरावून घेतला आहे. आपण व्हीव्हीपॅटची चिठ्ठी पाहिली पण ती केराच्या टोपलीत जात असेल त्याची मोजणीच होत नसेल तर आपण केलेल्या मतदानाचा काय उपयोग आहे. लोकशाहीत अशा मतदानाला काहीही अर्थ नाही. त्या चिठ्ठीने काहीही साध्य होत नाही. फक्त खर्च वाढत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आता तर मतमोजणीबाबत संशय असलेल्या मतदान केंद्रीतील व्हिडीओ शूटिंग मागितले तरी मिळणार नाही, असा नियम केला आहे. चंदीगढमध्ये एका व्हिडीओ शूटिंगमुळे महापौर निवडीतला घोटाळा न्यायालयासमोर आला. एवढे महत्त्व या व्हिडीओ फुटेजला आहे. तेथील महापौर निकाल पुन्हा नव्याने घेण्यात आले. मात्र, आता ते फूटेडच मिळणार नाही. सध्या देशात नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावले जात आहेत. या प्रकारांना पुरावे का गाडावे, हे जनतेने ठरवायचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आमच्या एका हातात भगवा आणि दुसऱ्या हातात तिरंगा आहे, हे हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे विचार आहेत. घालीन लोटांगण, वंदिन चरण हे त्यांचे विचार नाहीत. त्यामुळे फक्त वंदन करणाऱ्यांना आणि लायकी नसताना वंदन करून घेणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. संविधानासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि शिवसेनाप्रमुखांचा महाराष्ट्र तत्पर आहे, हे आपण इथे उपस्थित राहून दाखवून दिले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात,तालुक्यात संविधान आणि भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येत आहे. संविधान रक्षणाची जबाबदारी आपली आहे, हे यातून दिसून येत आहे, असेही ते म्हणाले.

काही जण फक्त भारत माता की जय असा नारा देतात. मात्र, स्वातंत्र्यापूर्वी देश जसा साखळदंडात होता. तसाच तो आता त्यांच्या साखळदंडात जखडण्याचा प्रयत्न करत आहेत. आपले स्वकीय जर भारतमातेला पुन्हा साखळदंडात जखडणार असतील, तर ते साखळदंड तोडण्याची जबाबदारी आपली आहे. आपण आपण ती स्वीकारली आहे, असा इशारा आपण देशाला जखडण्याची स्वप्ने बघणाऱ्यांना देत आहोत. सर्व जनतेला मतदार दिन्याच्या शुभेच्छा. जागे रहा,तत्पर राहा, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले.