व्यापारी मित्रांसाठी भाजपचा वक्फच्या जमिनींवर डोळा! जीनांनाही लाजवेल असा भाजपला मुसलमानांचा कळवळा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वक्फ विधेयकावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जोरदार समाचार घेतला. संसदेत भाजप आणि मित्रपक्षाच्या नेत्यांनी या विधेयकावरून मुसलमानांचा कळवळा आणणारी केलेली भाषणे मोहम्मद अली जीनांनाही लाजवतील अशी होती, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. हे विधेयक नेमके मुस्लिमांच्या विरोधात आहे की बाजूने आहे? बाजूने असेल तर भाजपने हिंदुत्व सोडले का? असा खोचक सवाल त्यांनी केला.

भाजपचा वक्फच्या जमिनींवर डोळा आहे, शिवसेनेचा विधेयकाला विरोध नाही, तर भाजपच्या ढोंगीपणाला आणि वक्फच्या जमिनी ताब्यात घेऊन व्यापारी मित्रांना देण्याच्या भ्रष्टाचाराला विरोध आहे, अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत वक्फ विधेयकाबद्दल प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, विनायक राऊत उपस्थित होते.

सर्व विषय बाजूला ठेवून आर्थिक संकटाबाबत चर्चा करा

पंतप्रधान, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्र्यांनी इतर सर्व विषय बाजूला ठेवून या आर्थिक संकटाबाबत देशाला विश्वासात घेऊन लोकसभेत, राज्यसभेत चर्चा करायला हवी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. ते म्हणाले की, कोरोना काळात मी मुख्यमंत्री असताना चीन अरुणाचल भागात घुसला होता. त्यावेळी पंतप्रधान मोदीही घरूनच काम करत होते. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग घेऊन देशातील सर्व मुख्यमंत्री आणि प्रमुख पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली होती. देशहितासाठी तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आमचा पाठिंबा असेल, असे सर्व मुख्यमंत्र्यांनी मोदींना सांगितले होते.

देशासमोर येणाऱ्या आर्थिक संकटाबाबतही पंतप्रधानांनी चर्चा केली असती तर शिवसेनेने एकमुखाने पाठिंबा दिला असता, असे उद्धव ठाकरे म्हणाले. दुर्दैवाने तसे काही झाले नाही, उलट त्याकडे दुर्लक्ष होईल असेच केले जातेय. कारण मोदी सरकार पाकिस्तानला इशारा देऊ शकते, चीनला देऊ शकत नाही, अमेरिका तर फार दूर राहिली, त्यामुळे असहायतेने ते करताहेत ते भोगत बसायचे आणि ते कुणाला कळू नये म्हणून दुसरे विषय काढायचे असे मोदी सरकारचे चाललेय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

भाजपचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळेच

भारतीय जनता पक्ष नेमके काय करतेय हेच कुणाला कळत नाही. कधी सांगतात औरंगजेबाची कबर खोदा, यांचे लोक कुदळ फावडी घेऊन जातात मग वरून आदेश येतो की थांबा खोदू नका. मग परत माती टाकतात. मधेच म्हणतात मशिदीत घुसून मारणार, लोकं मारायला गेले की त्यांना थांबवतात आणि सांगतात हे सौगात-ए-मोदी घेऊन जा. भाजपचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत, लोकांना आपसात लढवायचे, झुंजवायचे आणि आपण राजकीय पोळ्या भाजायच्या असे विकृत राजकारण भाजप करतेय, अशी टीकेची तोफ उद्धव ठाकरे यांनी डागली.

370 हटवून किती कश्मिरी पंडितांना जमिनी दिलात ते सांगा

कश्मीरमधून 370 कलम काढले गेले तेव्हा शिवसेनेने पाठिंबा दिला होता. हजारो कश्मिरी पंडित निर्वासित झाले होते तेव्हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना महाराष्ट्रात आसरा दिला होता. 370 कलम काढून इतकी वर्षे झाली आहेत, किती कश्मिरी पंडितांना त्यांच्या हक्काच्या जमिनी परत मिळाल्या? हे आधी भाजपच्या लोकांनी, गृहमंत्र्यांनी सांगावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. पाकव्याप्त कश्मीरबाबत सरकारने काही भूमिका घेतलेली नाही. चीनने पेंगाँग लेकजवळचा 40 हजार वर्ग किलोमीटरचा भाग व्यापला आहे, पण त्याबद्दल मोदी सरकार बोलत नाही, असेही ते म्हणाले.

ते वचन जीनांच्या पावलावर पाऊल टाकून दिले का?

2014 मधील भाजपचा वचननामाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दाखवला. ते म्हणाले की, त्या फेकूनाम्यात भाजपने वक्फ बोर्डाच्या जमिनींवर घुसखोरी करणाऱ्यांवर कारवाई करू असे म्हटले होते. ते वचन जीनांच्या पावलावर पाऊल टाकून दिले होते की अटलबिहारी वाजपेयींच्या पावलावर पाऊल टाकून दिले होते हे देवेंद्र फडणवीसांना विचारायला हवे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

अफरातफरीला पायबंद घाला, पण मुद्दाम काही उकरून काढू नका

रविश कुमार यांच्या एका व्हिडीओचा दाखला यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला. चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री होते तेव्हा शमशाबाद येथे 1100 एकर जमीन विमानतळाला दिली. ती देताना राज्य वक्फ बोर्डाची परवानगी घेतली होती का?, केंद्राची परवानगी घेतली होती का? असेल किंवा नसेल. म्हणजेच हे विधेयक न आणताही सरकार स्वतःला पाहिजे तेच करणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. वक्फ बोर्डात अफरातफर होत असेल तर त्याला नक्कीच पायबंद बसला पाहिजे, पण मुद्दाम काही उकरून काढणार असाल तर सहन करणार नाही, असेही त्यांनी बजावले.

भाजपला मी आवाहन करतो किंवा आव्हान देतो की, तुम्ही हिंदू, हिंदुत्व करत असाल आणि तुम्हाला मुस्लिमांचा तिटकारा असेल तर आधी तुमच्या झेंड्यातला हिरवा रंग काढून दाखवा. नपेक्षा जुमलेबाजी बंद करा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेने हिंदुत्व सोडले असे काही बाटग्यांचे, म्हणणे आहे. मग संसदेत त्यांच्या आजूबाजूला मुस्लिमांची तारीफ चालली होती तेव्हा गद्दारांच्या शेपट्या कुठे गेल्या होत्या? तेव्हा त्यांनी लाज, लज्जा सोडली होती का? बाळासाहेबांचे विचार मानणारे म्हणता मग मुस्लिमांचे लांगूलचालन मान्य करणार नाही असे म्हणत का बाहेर पडले नाहीत ?

सत्ताधाऱ्यांनी ईदच्या मेजवान्या झोडून ढेकर देऊन वक्फ विधेयक मांडले. गोमांस खाण्याचे ज्यांनी समर्थन केले होते त्या केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी विधेयक मांडले हा तर योगायोग किंवा ठरवून आणलेला योगायोग होता.

शिवसेनेने वक्फ विधेयकामध्ये काही सूचना केल्या. हिंदूंसह विविध जातीधर्माच्या ट्रस्ट आहेत. देवस्थानांचे, मंदिरांचे ट्रस्ट आहेत. वक्फ बोर्डावर सरकार गैरमुस्लिम लादणार आहे तसा हिंदूंच्या ट्रस्टवर गैरहिंदू सरकारने मुद्दामहून लादला तर शिवसेना सहन करणार नाही.

वक्फ विधेयकावरून शिवसेनेवर काँग्रेस किंवा भाजपचा अजिबात दबाव नाही. शिवसेना अंधपणाने विधेयकाचे समर्थन करणार नाही. भाजपने वक्फ बोर्डात पारदर्शकता जरूर आणावी, पण मुसलमानांची एवढी बाजू घेताय तर हिंदूंचाही विचार करा.

वक्फ विधेयकाने हिंदूंचे डोळे उघडले

भाजपचे मित्रपक्ष असलेल्या जेडीयू आणि टीडीपीने वक्फ विधेयकावरील चर्चेवेळी भाजपच्या नाकावर टिच्चून सांगितले की, आम्ही मुस्लिमांचे रक्षण करणार. त्यावेळी चीन आणि अमेरिकेसमोर हिंदुस्थानची असहाय्य अवस्था झाली आहे तसे अमित शहा, पियूष गोयल, रिजीजू आणि राजनाथ सिंह खाली मान घालून बसले होते, भाजपचा एकही कुणी त्याविरोधात बोलला नाही. हे विधेयक मुस्लिमांच्या हिताचे आहे असे भाजपवाल्यांनी सांगितले. मग भाजपने हिंदुत्व सोडले का, असा सवाल पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी केला. हिंदूंनी आता जागृत व्हायला हवे. कारण भाजप आता मुस्लिमांची बाजू घ्यायला लागलीय, वक्फ विधेयकाने देशातील तमाम हिंदूंचे डोळे उघडलेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

फटाक्याची वात लावतात आणि पळून जातात

गरीबांमध्ये लावालाव्या आणि मारामाऱ्या लावण्याची भाजपची वाईट सवय आहे. फटाक्याची वात पेटवायची आणि पळून जायचं. तो फुटून सगळं झालं की मग मिरवायला यायचं… की आम्हीच लावली होती वात. अरे पण वाट लागली त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल करतानाच आम्हीच सगळं काही केलं ही जी वृत्ती आहे त्याचा आम्ही विरोध केला आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला.

संसदेवरही वक्फ बोर्डाने दावा केल्याची माहिती खोटी

देशात मोदी सरकार आले नसते आणि वक्फ सुधारणा विधेयक आणले नसते तर वक्फ बोर्डाने दिल्लीतील सीजीओ कॉम्प्लेक्स आणि संसद भवनासह अनेक गावे व मालमत्ता हडपल्या असत्या. त्याप्रकरणी 1970 पासून न्यायालयातही खटला सुरू होता आणि तत्कालीन यूपीए सरकारने ती सगळी जमीन वक्फ बोर्डाला दिली होती, असा दावा केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजीजू यांनी संसदेत केला होता. उद्धव ठाकरे यांनी यावेळी एका मराठी वृत्त संकेतस्थळावरील बातमीचा दाखला देत रिजीजू यांचा तो दावा खोडून काढला. उद्धव ठाकरे यांनी ती बातमीच वाचून दाखवली. वक्फ बोर्डाने संसद परिसर किंवा लगतच्या संकुलांवर कोणताही दावा केलेला नसल्याचे दिल्ली वक्फ बोर्डातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेच स्पष्ट केल्याचे त्या बातमीत नमूद आहे. एका मराठी दैनिकातील बातमीचाही दाखला यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.

अनेक मुस्लिमांनी वक्फ विधेयकाचे समर्थन केले आहे आणि तशी पत्रेदेखील आम्हाला पाठवली आहेत असा भाजपने दावा केला आहे, मात्र यावर किती विश्वास ठेवायचा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नक्षलवाद्यांच्या शांतीप्रस्ताव पत्रकाने चर्चेला उधाण! आता केंद्र सरकारने कारवाया थांबवून चर्चा करावी, असे आवाहन करणारे पत्रक बुधवारी प्रसारमाध्यमांना प्राप्त झाले आहे. मात्र या पत्राच्या सत्यतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, असेही एका बातमीत नमूद असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.

शिवसेनेला बाळासाहेबांचे विचार शिकवू नका. 1995 मध्ये शिवशाही सरकारच्या काळात बाळासाहेबांनी मुस्लिमांच्या इज्तेमासाठी बीकेसीमध्ये परवानगी दिली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस बच्चे होते. आता तीच जागा भाजपने व्यापारासाठी बुलेट ट्रेनच्या घशात घातली. वक्फ विधेयक मुसलमानांच्या हिताचे आहे म्हणता, मग त्याला विरोध करणारे आम्ही हिंदुत्व सोडले की भाजपने हिंदुत्व सोडले? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

अरे तुम कहना क्या चाहते हो…

कधी सांगतात औरंगजेबाची कबर खोदा. लोक कबर खोदायला जातात, मग आरएसएसचे लोक म्हणतात, नको नको, खोदलं आहे त्यावर माती टाका. कधी म्हणतात, मशिदीत घुसून मारू. तर कधी सांगतात, ते बाजूला ठेवा आणि ही सौगात घेऊन जा. हेच मुस्लिमांना दुषणं देतात आणि नंतर त्यांच्याकडेच जाऊन ईदची पार्टी झोडतात. हे म्हणजे, ते नाही का येतं… अरे तुम कहना क्या चाहते हो… तशी भाजपची गत आहे आणि तेच मी भाजपला विचारत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हिंदुस्थानने कर कमी करावेत नाहीतर आम्हीही कर लादू, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. ते आजपासून लादले गेले. परिणामी शेअर बाजार कोसळला आहे. देशाचा आर्थिक पाठकणा मोडेल की काय, देशावर आर्थिक संकट येईल की काय अशी परिस्थिती आहे. त्याकडे दुर्लक्ष व्हावे म्हणूनच काल वक्फ सुधारणा विधेयक मांडले गेले.