भारतीय जनता पक्षाने बुधवारी त्यांची दहावी यादी जाहीर केली. मात्र या यादित देखील सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेले उदयनराजे भोसले यांचे नाव नाहीए. त्यामुळे दहा याद्यांनंतरही उदयनराजे भोसले हे वेटिंगवरच असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.
उदयराजे हे गेल्या महिनाभरापासून वेटिंगवर आहेत. उमेदवारी साठी उदयराजे हे दिल्लीला देखील तळ ठोकून होते. अमित शहा यांनी त्यांना भेट देण्यासाठी तब्बल चार दिवस थांबवून ठेवले होते. दरम्यान चार दिवसानंतर भेट दिल्यानंतर अमित शहा यांनी उमेदवारीचे आश्वासन उदयनराजे भोसले यांना दिले होते. मात्र आता दहावी यादी आली तरी उदयनराजे यांचे नाव नसल्याने त्यांच्या समर्थकांमधील अस्वस्थता वाढत चालली आहे. दरम्यान उमेदवारीच्या प्रश्नावर बोलताना उदयनराजे यांनी महाविकास आघाडीने शाहू महाराज यांना घरी जाऊन उमेदवारी दिली, असे प्रसारमाध्यमांसमोर सांगत भाजपला सुनावले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बुधवारी दोन उमेदवार जाहीर केले. त्यात सातार्यातून त्यांनी शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सातार्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यामुळे या जागेवर उमेदवारीचा पेच निर्माण झाला होता. आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव आज जाहीर करण्यात आले.