
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे अरबी समुद्रात झाले पाहिजे. पर्यावरणासंदर्भातील नियमांमुळे जर तिथे ते करता येणे शक्य नसेल तर राजभवनात शिवस्मारक करावे, अशी मागणी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री रायगड दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी अरबी समुद्रातील शिवस्मारकाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले होते. त्या ठिकाणी स्मारक होणे शक्य नसेल तर बाजूलाच असलेल्या राजभवनात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असल्याचे उदयनराजे म्हणाले.
राज्यपालांना जागा लागते किती?
अरबी समुद्राला लागूनच राजभवनाची जागा आहे. ती जागा थोडी थोडकी नाही तर 48 एकर आहे. राज्यपालांना जागा लागते तरी किती? असा प्रश्न उदयनराजे यांनी केला आहे.