गोगावले अदृश्य पालकमंत्री; सामंतांच्या मल्लिनाथीने नॅपकिनवाल्या शेठचा चेहरा उतरला

मंत्रीपद आणि पालकमंत्री पदासाठी गेल्या अडीच वर्षांपासून कोट शिवून बसलेले मिंधे गटाचे आमदार भरत गोगावले यांना आज त्यांच्याच पक्षाचे मंत्री उदय सामंत यांनी चिमटा काढला. गोगावले हे आमचे अदृश्य पालकमंत्री आहेत, असे सामंत म्हणाले. तेव्हा नॅपकिनवाले शेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोगावलेंचा चेहरा मात्र खाडकन उतरला.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी पालकमंत्री उदय सामंत अलिबागमध्ये आले होते. बैठक संपल्यानंतर त्यांना पत्रकारांनी घेरले. यावेळी भरत गोगावले यांच्या मंत्रीपदाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारताच सामंत म्हणाले, गोगावले हे तांत्रिकदृष्ट्या पालकमंत्री नसले तरी ते अदृश्य पालकमंत्री आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर पत्रकारांमध्ये हशा पिकला. पण बाजूलाच उभ्या असलेल्या गोगावलेंचा चेहरा मात्र पडला.

सामंत यांच्या हे लक्षात येताच त्यांनी आज ते अदृश्य पालकमंत्री आहेत. लवकरच ते दृश्य पालकमंत्री होतील, अशी सारवासारव केली. यावेळी चेहरा पडलेले गोगावले यांनी वरवर हसत ‘पुढेही असेच चालू राहील’ असे सांगत मनातील सल बोलून दाखवली.