विशेष – संकल्प संपत्ती निर्मितीचे

>> उदय पिंगळे

आर्थिक स्थिरता आणि भविष्यासाठी मजबूत पाया करण्यासाठी आर्थिक शिस्त आणि नियोजन आवश्यक असते, नववर्षाचे संकल्प करताना आरोग्य, जीवनशैली याला जितके महत्त्व आहे तितकेच किंबाहुना त्यापेक्षा अधिक महत्त्व आर्थिक नियोजनाला आहे.

90 टक्के नववर्ष संकल्प बोलणारे
त्यासाठी मग कष्ट घेतच नाहीत खरे…
असं बोलून फसगत होण्यापेक्षा
न संकल्पाचाच संकल्प करणे बरे…

माझा भाऊ उत्तम पिंगळे याची ही चारोळी. नव्या वर्षाचा मुहूर्त साधून अनेकजण संकल्प करतात. यातील बहुतेक आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी असतात. कोणताही संकल्प करताना प्रयत्न करावे लागतात. त्यात सातत्य राखल्यास आपले आरोग्य उत्तम राहील यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्याची हळूहळू सुरुवात करून वाढवता येतील. त्या जोडीने श्रद्धा आणि सबुरी ठेवून काही आर्थिक संकल्प केले आणि त्यात सातत्य राखले तर त्यातून निर्माण झालेल्या संपत्तीचा उपभोग घेता येईल. यादृष्टीने कोणत्याही मुहूर्ताशिवाय कधीही सुरू करता येतील आणि लवकरात लवकर सुरुवात केल्यास अधिक फायदा होईल असे काही आर्थिक संकल्प-

स्मार्ट (SMART) आर्थिक ध्येये ठरवा –

विशिष्ट (Specific) : काय साध्य करायचे आहे ते स्पष्ट करा (उदा. सुट्टीसाठी 5,000 वाचवायचे).
मोजता येईल असे (Measurable) : प्रगती ट्रक करा (उदा. महिन्याला 500).
साध्य करण्याजोगे (Achievable) : उत्पन्न आणि खर्च लक्षात घेऊन ध्येय ठरवा.
संबंधित (Relevant) : आपल्या जीवनातील प्राधान्यांशी जुळणारे असावे.
वेळमर्यादा (Time Bound) : ठरावीक कालावधी ठरवा (उदा. 31 डिसेंबर 2025 पर्यंत ठरवलेली बचत पूर्ण करायची).
तुमचे बजेट तयार करा किंवा अपडेट करा – आपल्या ऐपतीप्रमाणे गरजा इच्छा बचत अशी उत्पन्नाची विभागणी करा.

50/30/20 हा पुढील नियम वापरा –

50 टक्के गरजा : घरभाडे, वीज बिल, किराणा माल.
30 टक्के इच्छा : मनोरंजन, बाहेर खाणे.
20 टक्के बचत : आपत्कालीन निधी, गुंतवणूक.

हे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून दिले असून यात आपल्या गरजेनुसार टक्केवारीत बदल करता येईल. आपण योग्यच खर्च करतो अशी सर्वसाधारण समजूत असते. नियमित जमाखर्च लिहा… म्हणजे अनावश्यक खर्च कुठे होतो, त्याला योग्य पर्याय कोणता ते सहज शोधता येईल. खर्चाचा शोध घेण्यासाठी अक्सिओ, मनीफाय किंवा स्प्रेडशीटसारखी साधने वापरा. अचूकतेसाठी दर महिन्याला पुनरावलोकन करा.

आपत्कालीन निधी तयार करा

उत्पन्नातून खर्च करण्यापूर्वी बचत, बचतीतून निधीची निर्मिती आणि निधीतून गुंतवणूक असा ाढम असावा. काही खर्च अचानक करावे लागतात. तर उत्पन्न मिळो अथवा न मिळो. काही खर्च आपण टाळूच शकत नाही. यासाठी किमान तीन ते सहा महिन्यांच्या जीवनावश्यक खर्चाची बचत ठेवा. ही रक्कम उच्च व्याजदराच्या बचत खात्यात अथवा विभागून मुदत ठेवीत ठेवल्यास गरजेनुसार त्याचा वापर करता येईल. नियमित बचतीसाठी कायमस्वरूपी सूचना (Standing Instruction) आपल्या बँकेस देता येते.

कर्ज कमी करण्यासाठी रणनीती ठरवा

कर्ज घेतल्याने आपल्यावरची आर्थिक जबाबदारी वाढते. कर्ज रकमेपुढे समान मासिक हप्ता किरकोळ वाटतो. त्यामुळे अनेकदा चैनीसाठी कर्ज घेतले जाऊ शकते. त्यामुळेच ते घेण्यापूर्वी आवश्यक/अनावश्यक अशी विभागणी करा. आधीच कर्ज घेतले असेल तर जास्त व्याजदराच्या कर्जाची आधी परतफेड करून नंतर कमी रकमेचे कर्ज आधी फेडून लवकर यश मिळवा. कर्ज एकत्रित करून कमी व्याजदराच्या पर्यायांचा अवश्य विचार करता येईल.

भविष्यासाठी गुंतवणूक करा

गुंतवणूक करताना अनेकदा निवृत्ती खूप दूर असल्याने त्यासाठी करायची गुंतवणूक टाळली जाते. यासाठी लवकरात लवकर केलेली सुरुवात पावाढ व्याजाचा सर्वाधिक लाभ देते. उत्पन्नाच्या किमान 10ज्ञ् रक्कम ही आपल्या निवृत्ती योजनेसाठी असावी. यासाठी आपल्या पीएफमध्ये स्वेच्छेने वाढ करता येईल. यावर सर्वाधिक करमुक्त व्याज मिळून ती रक्कम पगारातूनच कापली जाईल. विविधतेसाठी कमी खर्चाचे इंडेक्स फंड ईटीएफ हे पर्याय आहेत. कमी रकमेने सुरुवात करत असल्यास तुकडय़ात गुंतवणूक करा. अनेक ब्रोकर्सकडे स्मॉलकेस पर्याय आहेत. म्युच्युअल फंडाकडे आपल्या अल्प, मध्यम दीर्घकालीन गरजेनुसार पर्याय आहेत. दीर्घकालीन ध्येयांसाठी निधी बाजूला ठेवा (उदा. घरखरेदी किंवा शिक्षण).

उत्पन्न वाढवा

अंथरूण पाहून पाय पसरावे असे आपल्यावरील संस्कार असले तरी आपल्या बदलत्या जीवनशैलीशी जुळवून घ्यायचे असेल तर खर्च वाढतच राहणार. अशा परिस्थितीत आपल्याला पाय पसरण्यासाठी अंथरूण वाढवावे लागेल. यासाठी आपल्याला उत्पन्न वाढीचे वेगवेगळे मार्ग शोधावे लागतील, ज्यातून कायदेशीर मार्गे अतिरिक्त कमाई होईल. आपल्या मालकाकडून प्रमोशन अथवा अतिरिक्त वेतनवाढ मागता येईल. नव्या कौशल्यांचे प्रशिक्षण घेता येईल.

विमा पुनरावलोकन करा

आरोग्य, जीवन, वाहन आणि घर विमा आवश्यक आहेत. ते पूर्णपणे घ्या. त्यासाठी भरावा लागणारा हप्ता फुकट जाऊदे अशी प्रार्थना करा. मोठय़ा जीवनबदलांसाठी कव्हरेज वाढवा. दीर्घकालीन अपंगत्व विमा घ्या अथवा थोडा अतिरिक्त प्रीमियम मूळ पॉलिसीवर भरून तो मिळवा.

न वापरलेल्या वस्तू विकून पैसे मिळवा : आपल्याला हव्यात म्हणून अनेक वस्तू आपण हौसेने घेतो. त्याचा वापर न केल्याने त्या तशाच पडून राहतात. एकतर त्या गरजू व्यक्तीस, संस्थेत देता येतील अथवा ऑनलाइन किंवा स्थानिक बाजारात विकून अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल. eBay, Facebook Marketplace, किंवा OfferUp सारखी अॅप्स वापरून हे साध्य करता येईल.

शिका आणि स्वतला अपडेट ठेवा

शिक्षणावर केलेली गुंतवणूक ही सर्वोत्तम गुंतवणूक आहे. सतत काहीतरी शिकत रहा. त्याचा कधी ना कधी नक्की उपयोग होईल. दर तीन महिन्यांत एक आर्थिक विषयावरील पुस्तक वाचा (उदा. रिच डॅड पुअर डॅड किंवा द इंटेलिजेंट इन्व्हेस्टर). आधी वाचलेले पुस्तक पुन्हा वाचल्याने वेगळीच अनुभूती मिळते. त्याचा आनंद घ्या. विश्वासार्ह आर्थिक ब्लॉग्स, पॉडकास्ट किंवा यू टय़ूब चॅनेल्स फॉलो करा. विविध वेबिनार किंवा वर्कशॉपमध्ये सहभागी व्हा.

नियमित आर्थिक पुनरावलोकन करा

आर्थिक पुनरावलोकन म्हणजे मालमत्तेचे बाजारमूल्य रोज सातत्याने तपासणे नसून, ठरावीक अंतराने त्याचा आढावा घेणे. आपल्या खर्चाचाही आढावा घ्यायला हवा. अनपेक्षित खर्च किंवा उत्पन्न बदलांवर आधारित ध्येये समायोजित करायला हवीत. आपले अल्प यश साजरे करून प्रेरणा कायम ठेवायला हव्यात.

शाश्वत आणि नैतिक पर्याय निवडा

भविष्याच्या दृष्टीने शाश्वत जीवनशैली ही आपण अनुसरायला हवी. म्हणूनच गुंतवणूक करताना ESG (पर्यावरण, सामाजिक, आणि प्रशासन) फंडमध्ये गुंतवणूक करा. स्थानिक व्यवसायांना आणि पर्यावरणपूरक कंपन्यांना पाठिंबा द्या.

हे सर्व उपाय तुम्हाला आर्थिक स्थिरता आणि भविष्यासाठी एक मजबूत पाया तयार करण्यास मदत करतील. यातील कोणत्याही टप्प्यावर अधिक माहिती हवी असल्यास फी आकारून योग्य सल्ला देणारे गुंतवणूक सल्लागार आज सहज उपलब्ध आहेत.

(लेखक अर्थ अभ्यासक आहेत.)