
>> उदय पिंगळे
गुंतवणूकदार गुंतवणुकीच्या माध्यमातून कंपन्यांसाठी भांडवल उभे करण्याची जोखीम स्वीकारतात त्या बदल्यात त्यांना लाभांश, बोनस, राईटस् असे लाभ मिळतात. याशिवाय बाजारभावाने शेअर्स विकण्याची तसेच खरेदी करण्याची संधी मिळते. यात आपली एकंदरीत कर देयता कमी करण्यासाठी आयकर कायद्यात असलेल्या तरतुदींचा आधार घेऊन गुंतवणूकदार कायदेशीररीत्या आपली कर देयता आपण कमी करू शकतात. ज्याला ‘टॅक्स हार्वेस्टिंग’ असे म्हणजेच ‘सनदशीर कर छाटणी’ असे म्हटले जाते.
गेल्या वर्षी ऑक्टोबर 2024 पर्यंत बाजार नवनवे उच्चांक करीत होता. हे एकमेव असं आर्थिक वर्ष आहे, ज्यात गुंतवणूकदारांनी सुरुवातीला अभूतपूर्व तेजी अनुभवली आणि त्यानंतर बाजार निर्देशांक जवळजवळ 15 टक्क्यांनी खाली आला. ज्या शेअर्सचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते, त्यामध्ये अधिक घट झाली. त्यामुळे गुंतवणूकदार घाबरले आणि त्यांनी विक्री सुरू केली. त्यामुळे बाजारभाव मोठ्या प्रमाणात खाली आले. आता बाजार स्थिर होऊन त्यात कधी वाढ होईल यावर सर्व जण लक्ष ठेवून आहेत. अनेकांनी खरेदी केलेल्या शेअर्सच्या बाजारभावात 50 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.
कंपन्यांसाठी भांडवल उभे करण्याचे भांडवल बाजार हे सुयोग्य साधन आहे. त्यामुळे त्यांना अत्यल्प खर्चात मोठे भांडवल उपलब्ध होते. गुंतवणूकदार जी जोखीम स्वीकारतात त्या बदल्यात त्यांना लाभांश, बोनस, राईटस् असे लाभ मिळतात. याशिवाय बाजारभावाने शेअर्स विकण्याची तसेच खरेदी करण्याची संधी मिळते. अधिकाधिक लोकांनी भांडवल बाजारात गुंतवणूक केली तर अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होते. यासाठी भांडवल बाजारामधील गुंतवणूकदारांना त्यांनी घेतलेल्या अधिक जोखमीस प्रोत्साहन म्हणून आयकरात काही सवलती देण्यात आल्या आहेत.
– मान्यताप्राप्त शेअर बाजारात खरेदी केलेले शेअर्स अथवा 65 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक असलेले म्युच्युअल फंड योजनेचे युनिट एक वर्षाच्या आत विकल्यास मिळणारा निव्वळ नफा हा अल्पकालीन भांडवली नफा समजण्यात येतो. असा नफा 23 जुलै 2024 पूर्वी झाला असल्यास त्यावर सरसकट 15 टक्के या सवलतीच्या दराने आणि 23 जुलै 2024 नंतर 20 टक्के या सवलतीच्या दराने कर आकारणी होईल. जर अल्पकालीन भांडवली तोटा असेल तर तो दीर्घकालीन भांडवली लाभासमोर समायोजित होईल. तरीही तोटा शिल्लक राहिल्यास पुढील आठ वर्षांत तो कधीही अल्प अथवा दीर्घ भांडवली लाभासमोर समायोजित करता येईल. यासाठी प्रत्यक्षात मालमत्तेची देवाणघेवाण होणे आवश्यक आहे. म्हणजेच विक्रेत्याच्या खात्यातून खरेदीदाराच्या खात्यात शेअर्स वर्ग होणे अपेक्षित आहे. ‘डे ट्रेडिंग’ म्हणजे एकाच दिवशी एकाच खात्यातून एकाच शेअर्सची आधी खरेदी आणि विक्री किंवा आधी विक्री आणि नंतर खरेदी केल्यास त्यातून मिळालेला लाभ हे व्यावसायिक उत्पन्न समजण्यात येऊन त्यावर नियमित दराने कर आकारणी होते.
– एक वर्षानंतर विक्री केली तर होणारा निव्वळ नफा हा दीर्घकालीन भांडवली नफा समजण्यात येईल. यातून अल्पकालीन तोटा वजा करून आलेल्या रकमेतून जास्तीत जास्त 1 लाख 25 हजार रुपयांवर कर नाही म्हणून वगळले जातील. त्यानंतर शिल्लक दीर्घकालीन भांडवली नफ्यावर 23 जुलै 2024 पर्यत 10 टक्के आणि 23 जुलै 2024 नंतर 12.5 टक्के या विशेष दराने कर आकारणी केली जाते. जर तरीही दीर्घकालीन भांडवली तोटा असेल तर तो तसाच ठेवून त्याचे समायोजन पुढील आठ वर्षांत दीर्घकालीन भांडवली नफ्यासमोर करता येते.
नफा मोजताना खालील गोष्टी विचारात घ्याव्यात
– जेव्हा शेअर्स /युनिट्स विकतो तेव्हा ते खरेदी केल्याच्या भावातून विक्री किंमत वजा केली असता येणारी रक्कम ही भांडवली नफा किंवा तोटा असते. शेअर्स 31 जानेवारी 2018 पूर्वी खरेदी केले असतील तर ते कोणत्याही भावाने खरेदी केले असतील तरी 31 जानेवारी 2018 या दिवशीचा सर्वोच्च भाव ही त्याची खरेदी किंमत म्हणून धरता येते. यापूर्वी दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर आकारणी केली जात नव्हती म्हणून ही खरेदी किंमत धरण्यात येते. कायद्यातील या तरतुदीला ‘ग्रँडफादरिंग’ असे म्हणतात.
– 31 जानेवारी 2018 नंतर खरेदी केलेल्या शेअर्सची किंमत जी असेल तीच घ्यावी लागेल.
– जे शेअर्स/युनिट्स प्रथम खरेदी केले ते प्रथम विकले (FIFO) असे आयकर कायदा मानतो.
– जे शेअर्स राइटस्मध्ये मिळाले त्यासाठी प्रत्यक्षात मोजलेली किंमत ही त्याची खरेदी किंमत समजली जाईल. दुसऱ्याकडून राईटस् विकत घेऊन शेअर्स खरेदी केले असतील तर राईट खरेदीची किंमत आणि शेअर्स खरेदीची किंमत ही खरेदी किंमत समजण्यात येईल.
– जर शेअर्स बोनस म्हणून मिळाले असतील तर त्याची किंमत शून्य समजण्यात येईल.
– कंपनी विभाजन होऊन शेअर्स मिळाले असल्यास ही मूळ कंपनी विभाजित होताना तिची मालमत्ता नव्या कंपनीकडे वर्ग झाली त्याच्या टक्केवारीनुसार दोन्ही खरेदी किंमत विभाजित होईल. उदा. ‘अबक’ कंपनीचे 100 शेअर्स गुंतवणूकदाराने 400 रुपयांनी खरेदी केले आहेत. त्यावर ‘बकड‘ कंपनीचे 100 शेअर्स मिळाले. ही कंपनी स्थापन होताना मूळ कंपनीची 5 टक्के मालमत्ता हस्तांतरित झाली असेल तर नव्या ‘अबक’ कंपनीकडे 95 टक्के मालमत्ता असल्याने आणि हे शेअर्स 400 च्या 95 टक्के म्हणजे रु.380/- ने खरेदी केले आणि ‘बकड‘ कंपनीचे शेअर्स 400 च्या 5 टक्के म्हणजे रु.20/- ने खरेदी केले असे समजले जाईल. दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी तारीख ही मूळ कंपनीचे शेअर्स ज्या तारखेस खरेदी तीच समजण्यात येईल.
आपली एकंदरीत कर देयता कमी करण्यासाठी आयकर कायद्यात असलेल्या याच तरतुदींचा आधार घेऊन बाजारभाव कमी झाल्याचा फायदा घेऊन आपल्याला झालेला दीर्घ आणि अल्पकालीन भांडवली नफा आपल्याला कमी करता येईल. त्यामुळे त्यावर कमी कर द्यावा लागेल. यासाठी प्रत्यक्षात तोटय़ातील शेअर्स विकावे लागतील. असे शेअर्स आपण त्याच दिवशी आपल्या दुसऱ्या खात्यात किंवा दुसऱ्या दिवशी त्याच खात्यात जवळपास त्याच किंवा जवळपास भावाने खरेदी केल्यास कागदोपत्री तोटा होईल. सदर तोटा दीर्घकालीन तोटा असल्यास दीर्घकालीन नफ्यासमोर आणि अल्पकालीन तोटा असल्यास अल्प आणि दीर्घकालीन भांडवली नफ्यासमोर समायोजित करता येईल. तरीही तोटा राहिल्यास तो पुढील आठ वर्षांत समायोजित करता येईल. त्यामुळे आपली एकंदर कर देयता कमी होईल. अशा प्रकारे कायदेशीररीत्या आपली कर देयता आपण कमी करू शकतो. यास ‘टॅक्स हार्वेस्टिंग’ असे म्हणतात. ‘हार्वेस्टिंग’ याचा शब्दश अर्थ ‘संचयन’ असा होतो. येथे कोणताही संचय न होता आयकर कमी होत असल्याने यास ‘सनदशीर कर छाटणी’ असे अधिक जुळणारे नाव योजले आहे.
या तरतुदींचा फायदा घ्यायचा असेल तर…
– आपला या वर्षीचा आजपर्यंतचा दीर्घकालीन भांडवली नफा आणि अल्पकालीन भांडवली नफा किती आहे ते पहा. कितीही कमीअधिक व्यवहार असले तर ब्रोकर्सच्या आपवरून अथवा संकेतस्थळावरूनही माहिती सहज मिळवता येईल.
– त्याचप्रमाणे आपल्या होल्डिंगमधील तोटय़ातील शेअर्स आणि त्यातून होणारा अल्प आणि दीर्घकालीन तोटा किती आहे तो काढा.
– दीर्घकालीन भांडवली नफ्यावर दरवर्षी एक लाख पंचवीस हजारांवर कोणताही कर नाही हे लक्षात ठेवून त्याहून अधिक असलेला नफा किती ते पहा.
– आपल्या गुंतवणूक संचातील तोटय़ातील शेअर्सचा दीर्घ आणि अल्प भांडवली नफा समायोजित होईल एवढ्या किमतीचे शेअर्स विका. त्यामुळे कागदोपत्री तोटा होईल.
– आपण ज्या भावाने शेअर्स विकलेत, जवळपास त्याच भावाने त्याच दिवशी आपल्या दुसऱ्या खात्यात किंवा दुसऱ्या दिवशी किंवा त्यानंतर कधीही तेच शेअर्स खरेदी करा. म्हणजे आपला गुंतवणूक संच तसाच राहील, पण तोटा दिसेल.
– तेच शेअर्स घेतले पाहिजेत असं काही बंधन नाही. तोटा करून येणाऱ्या पैशांत अधिक उत्तम गुंतवणूक संधी असेल तर असे शेअर्सही खरेदी करता येतील.
– तुम्ही अलीकडेच भांडवल बाजारात आले असाल किंवा खूप जुने गुंतवणूकदार असाल तर दरवर्षी एक लाख पंचवीस हजार या दीर्घ मुदतीच्या करमुक्त भांडवली नफ्याचा आपल्याला कसा लाभ मिळवता येईल याचा विचार करून विक्री करून नफा किंवा तोटा करून घ्यावा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा लवकरच आधी विकलेले किंवा अधिक उज्ज्वल भविष्य असलेले शेअर्स त्याच पैशांत घ्यावेत.
कर नियोजनाच्या दृष्टीने या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या आठवडय़ात आपल्याला शेअर्स तोटय़ात विकून कर देयता निश्चितच कमी करता येईल. हे पूर्णपणे कायदेशीर आहे. यात आपण कोणतीही करचोरी करत नसून कायदेशीर मार्गाने आपला कर कमी कसा होईल ते पाहत आहोत. जरी अल्प अथवा दीर्घ मुदतीचा नफा नसेल तरीही तोटा करून घेऊन तो पुढील वर्षांमध्ये समायोजित करता येईल. करविषयक हा लाभ आपले विवरणपत्र विहित मुदतीत भरणाऱ्या करदात्यांना मिळत असल्याने ते वेळेत भरले जाईल याची काळजी घ्यावी. खरे तर तोटा करून घेणे सामान्य गुंतवणूकदारांना फारसे आवडत नाही. कधीतरी ठरवून असा तोटा करून घेणे हे आपल्या फायद्याचे असते हे एव्हाना आपल्या लक्षात आले असेलच. यासंबंधात काही शंका असल्यास आपल्या कर सल्लागाराची मदत घ्यावी आणि या आर्थिक वर्षाच्या उरलेल्या मोजक्या दिवसांत आपली कर देयता कमी करावी.
(लेखक अर्थ अभ्यासक आहेत.)