महाराणा प्रतापांच्या वंशजांमध्ये यादवी उफाळून आली आहे. मेवाड घराण्याचे नवे राजा विश्वराज सिंह यांना सिटी पॅलेसमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. यावेळी सिटी पॅलेसबाहेर जोरदार राडा झाला. दगडफेकीत तीन जण जखमी झाले. राजस्थान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
मेवाड राजघराण्याचे राजा महेंद्र सिंह मेवाड यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या गादीवर विश्वराज सिंह यांना बसवण्यात आले. चित्तोडगड येथील फतेहप्रकाश महालात त्यांचा राज्याभिषेकही झाला. राज्याभिषेकातील महत्त्वाची धुणीदर्शन प्रथा पार पाडण्यासाठी विश्वराज सिंह हे उदयपूरच्या सिटी पॅलेसमध्ये आले. येथे त्यांचे चुलत बंधू अरविंद सिंह मेवाड हे वास्तव्य करून आहेत. अरविंद सिंह यांनी विश्वराज सिंह यांना राजमहालात प्रवेश करण्यास मनाई केली. विश्वराज सिंह यांना सिटी पॅलेसच्या महाद्वारावरच रोखण्यात आल्याने मोठा तणाव निर्माण झाला. दगडफेक, घोषणाबाजीही झाली. परिस्थिती चिघळल्याने विश्वराज सिंह हे धुणीदर्शन न करताच परतले.
अरविंद सिंह मेवाड यांनी विश्वराज सिंह यांच्या राज्याभिषेकाला तसेच त्यांना उत्तराधिकारी घोषित करण्यास विरोध केला आहे. सिटी पॅलेसमध्ये प्रवेश करण्यास मनाई करणारी कायदेशीर नोटीसही त्यांनी पाठवली होती. मेवाड राजघराणे संचालित करण्यासाठी ट्रस्ट नेमण्यात आला असून, गादीवर माझा आणि माझ्या मुलाचाच अधिकार असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.