U19 Women’s T20 World Cup – टीम इंडियाची गाडी सुसाट, 4.2 षटकांमध्येच केला वेस्ट इंडिजचा खुर्दा

मलेशियामध्ये सुरू असलेल्या 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकामध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा खुर्दा केला आहे. वेस्ट इंडिजने दिलेले आव्हान टीम इंडियाने अवघ्या 4.2 षटकांमध्ये पूर्ण करत विश्वचषकाची विजयी सुरुवात केली आहे.

मलेशियातील क्लालालंपूरमध्ये टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज या संघांमध्ये सामना पार पडला. या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार निकी प्रसादने घेतलेला निर्णय गोलंदाजांनी सार्थ करून दाखवला. गोलंदाजांनी आपली धारधार गोलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना मैदानावर टिकू दिले नाही. वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 13.2 षटकांमध्ये अवघ्या 44 धावांमध्येच तंबुत परतला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाच फलंदाजांना भोपळाही फोडू दिला नाही. टीम इंडियाकडून परुणिका सिसोदिया हिने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर जोशीता आणि आयुषी यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या

वेस्ट इंडिजने दिलेल्या तुटपुंज्या आव्हानाच सामना करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाने आपली पहिली विकेट त्रिशाच्या स्वरुपात 4 या धावसंख्येवर गमावली. परंतु त्यानंतर जी कमलिनीने 3 चौकारांच्या मदतीने 16 धावा आणि सानिका चाळके हिने 3 चौकारांच्या मदतीने 18 धावा करत संघाला 4.2 षटकांमध्ये विजय मिळवून दिला. टीम इंडियाचा पुढचा सामना 21 जानेवारी रोजी मलेशियाविरुद्ध होणार आहे. तसेच साखळी फेरीतील तिसरा सामना 23 जानेवारी रोजी श्रीलंकाविरुद्ध होणार आहे.