त्रिशाने इतिहास घडविला, हिंदुस्थानची उपांत्य फेरीत धडक

हिंदुस्थानने दुबळय़ा स्कॉटलंडचा 150 धावांनी धुव्वा उडवून 19 वर्षांखालील महिला टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत धडक दिली. सलामीवीर त्रिशा गोंगाडी हिने (नाबाद 110 धावा) शतकी खेळी करीत इतिहास घडविला. कारण या वर्ल्ड कपमध्ये शतक ठोकणारी ती पहिलीच फलंदाज ठरली.

हिंदुस्थानकडून मिळालेल्या 209 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा केवळ 14 षटकांत अवघ्या 58 धावांतच खुर्दा उडाला. त्यांच्याकडून पीप्पा केली (12), एम्मा वॉल्सिंगहॅम (12), पीप्पा प्राऊल (11) व नईमा शेख (10) यांनाच दुहेरी धावा करता आल्या, तर तिघींना भोपळाही फोडता आला नाही.

त्याआधी, कामालीनी (51) व त्रिशा गोंगाडी (नाबाद 110) यांनी 13.3 षटकांत 147 धावांनी खणखणीत सलामी देत स्कॉटलंडच्या गोलंदाजीची पिसे काढली. 42 चेंडूंत 9 चौकारांसह अर्धशतकी खेळी करणाऱ्या कामालीनीला मैसी मासेराने बाद करीत एकमेव विकेट टिपला. त्रिशाने 59 चेंडूंत नाबाद शतकी खेळी सजविली.