U19 Women’s T20 World Cup – बांगलादेशला धोबीपछाड, हिंदुस्थानची सेमी फायनलमध्ये धडक

मलेशियामध्ये सुरू असलेल्या महिलांच्या 19 वर्षांखालील विश्वचषकात टीम इंडियाची धमाकेदार कामगिरी सुरू आहे. टीम इंडियाने सुपर सिक्स च्या पहिल्याच सामन्यात बांगलादेशला लोळवत 42 चेंडूमध्येच सामना जिंकला आहे. या विजयासह टीम इंडियाने अगदी थाटात सेमी फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे.

टीम इंडियाची कर्णधार निक्की प्रसादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवत बांगलादेशी फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या. टीम इंडियाच्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेशचे फलंदाज पत्त्यांसारखे कोसळले. बांगलादेशला 20 षटकांमध्ये फक्त 64 धावांपर्यंतच मजल मारता आली. टीम इंडियाकडून वैष्णवी शर्माने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर सोनम यादवने 2, शबनम आणि मिथीला यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

बांगलादेशने दिलेल्या माफक आव्हानाचा टीम इंडियाने झटकीपट पाठलाग केला. सलामीला आलेली त्रिशा अक्षरश: बांगलादेशच्या गोलंदाजांवर तुटून पडली होती. तिने 46 चेंडूंमध्ये 10 चौकारांच्या मदतीने 58 धावांची नाबाद वादळी खेळी केली. त्यानंतर कर्णधार निक्की प्रसादने सुद्दा 14 चेंडूंमध्ये 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 22 धावा चोपून काढल्या व टीम इंडियाला 7.1 षटकांमध्येच विजय मिळवून दिला.