US elections 2024 : अमेरिकन निवडणुकीत चर्चा होत असलेल्या ‘त्या’ 2 महिलांचं हिंदुस्थान कनेक्शन काय?

अमेरिकेमध्ये सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. रिपब्लिकन पक्षाने डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदासाठी, तर जेडी वेन्स यांना उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे. यानंतर अमेरिकेमध्ये निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. उपाध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे जेडी वेन्स यांच्यात रंगतदार सामना होणार आहे. विशेष म्हणजे या लढतीकडे हिंदुस्थानचेही लक्ष असणार आहे. कारण कमला हॅरिस आणि जेडी वेन्स यांची पत्नी उषा चिलुकुरी यांचे हिंदुस्थानातील तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांशी खास नातं आहे.

कमला हॅरिस

विद्यमान आणि अमेरिकेच्या राजकीय इतिहासातील पहिल्या महिला उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचा जन्म कॅलिफोर्नियातील ऑकलंड येथे झाला. कमला हॅरिस यांच्या आई श्यामला गोपालन हॅरिस या हिंदुस्थानी असून त्यांचे मूळ गाव तामिळनाडूमध्ये आहे. चेन्नईतील बसंत नगर येथे त्यांचा जन्म झाला होता. 19 व्या वर्षी त्या शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्या आणि यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले येथे त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. तिथेत त्यांची भेट आफ्रिकन वंशाच्या डोनाल्ड जे. हॅरिस यांच्याशी झाली.

दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 1963मध्ये त्यांनी लग्न केले. 1964मध्ये कमला हॅरिस यांचा जन्म झाला. पुढे हॅरिस दाम्पत्याचा घटस्फोट झाला आणि श्यामला यांनी कमला हॅरिस यांचा सांभाळ केला. त्यामुळे त्यांच्यावर हिंदुस्थानी संस्कृतीचाही प्रभाव आहे. त्या आईसोबत अनेकदा हिंदुस्थानात येत असतात. गेल्या निवडणुकीत त्यांना हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांचा चांगला पाठींबा मिळाला होता.

उषा चिलुकुरी 

दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाकडून उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळालेले जेडी वेन्स यांची पत्नी उषा चिलुकुरी या हिंदुस्थानी वंशाच्या आहेत. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्या ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून कार्यरत असून त्यांचे आई-वडील आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यातील पमारू गावचे रहिवासी आहेत. उषा चिलुकुरी या हिंदू असून त्यांचा पती जेडी वेन्स हे रोमन कॅथलिक आहेत.

2013मध्ये येल विद्यापीठातमध्ये जेडी वेन्स आणि उषा चिलुकुरी यांची भेट झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि 2014मध्ये दोघांनी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे लग्नही केले. या दाम्पत्याला इवान, विवेक आणि मीराबेल अशी तीन अपत्य आहेत.

उषा यांचे आई-वडील अमेरिकेला स्थायिक झाले आणि सॅन डियागोमध्ये त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांनी येल विद्यापीठातून इतिहास या विषयातून शिक्षण घेतले आणि पुढे केंब्रिज विद्यापीठातून आधुनिक इतिहास या विषयात मास्टर्स ही पदवी घेतली. त्यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयासह विविध लॉ फर्ममध्ये काम केले असून दिवाणी खटले सोडवण्यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या पतीच्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत.