Under 19 Asia Cup मध्ये पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध हारल्यानंतर टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत सलग दोन सामन्यांमध्ये विजय संपादित केला. युएईने दिलेल्या 138 धावांच्या आव्हानाचा पाठलाग टीम इंडियाच्या सलामीच्या जोडीने एकही विकेट न गमावता 16.1 षटकात पूर्ण करत संघाला मोठा विजय मिळवून दिला. या विजयामुळे टीम इंडियाने गुण तालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली असून संघाचे सेमीफायनलचे स्थान निश्चित झाले आहे.
युएईविरुद्ध पार पडलेल्या सामन्यात युएईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र युएईचा कर्णधार अफजल खान याचा निर्णय फलंदाजांनी धुडकावून लावला आणि युएईचा संपूर्ण सघ 137 या धावसंख्येवर बाद झाला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी धारधार गोलंदाजी करत युएईच्या अर्ध्या संघाला 72 या धावसंख्येवर तंबुत पाठवले. टीम इंडियाकडून युधाजीत गुहा याने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तसेच हार्दिक राज आणि चेतन शर्मा यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.
युएईने दिलेल्या आव्हानाच पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाने दणक्यात सुरुवात केली. सलामीला आलेल्या वैभव सूर्यवंशीने ताबडतोब फलंदाजी करत 46 चेंडूंमध्ये 6 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 76 धावा चोपून काढल्या. त्याच बरोबर आयुष म्हत्रे याने सुद्धा एका बाजूने आपला धमाका सुरू ठेवत 4 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 67 धावा केल्या. युएईच्या संघाचा कोणताच गोलंदाज या दोघांना बाद करू शकला नाही. टीम इंडियाने 16.1 षटकामध्येच आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत सामना जिंकला.
टीम इंडियाला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध गमवावा लागला होता. मात्र, त्यानंतर टीम इंडियाने दमदार पुनरागम करत आपला दमखम दाखवून दिला. टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात जपानचा आणि आता युएईचा पराभव केला आहे. त्यामुळे गुणतालिकेत टीम इंडियाने पहिल्या क्रमांकावर झेप घेत आपले सेमीफायनलचे स्थान निश्चित केले आहे.