काळम्मावाडी धरणाच्या डोहात निपाणीतील दोन तरुण बुडाले

पुणे जिल्ह्यातील भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील पाचजण बुडाल्याची घटना ताजी असतानाच आता कोल्हापूर जिल्ह्यातील काळम्मावाडी धरणाजवळ असलेल्या दूधगंगा नदीतील डोहात निपाणीतील दोन तरुण बुडाल्याची घटना घडली. कुटुंबासोबत वर्षा पर्यटनाला आले असता, तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गणेश चंद्रकांत कदम (वय 18, रा. आंदोलननगर, निपाणी, जि. बेळगाव) आणि चालक प्रतीक पाटील (वय 22) अशी बुडालेल्या दोन तरुणांची नावे आहेत. पावसाचा जोर आणि नदीचा वाहता प्रवाह यामुळे शोध पथकाला अडथळे निर्माण झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता.

बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील 13 जण वर्षा पर्यटनासाठी राधानगरी येथे आले होते. सोमवारी दुपारी 12च्या सुमारास काळम्मावाडी धरण परिसरातील दूधगंगा नदीच्या डोहात पोहता येत नसतानाही गणेश कदम पोहण्यास उतरला. तो बुडू लागल्याने गाडीचा चालक प्रतीक पाटील याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; पण नदीच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे दोघेही वाहून गेले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळतात राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे जवान सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत बुडालेल्यांचा शोध सुरू होता. गेल्या महिन्यात देखील याच ठिकाणी एका व्यक्तीचा अशाच पद्धतीने बुडून मृत्यू झाला होता. यामुळे पर्यटकांनी वर्षा पर्यटनाला जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.