
विहिरीच्या खोदकामादरम्यान भीषण अपघाताची घटना नंदुरबारमधील नवापूर तालुक्यात घडली. खोदकामावेळी अंदाज चुकल्याने ट्र्रॅक्टर 20 फूट विहिरीत कोसळला. या ट्रॅक्टरखाली दबल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला. विश्वास जोगु गावीत आणि कृष्णा काशिराम गावीत अशी मयतांची नावे आहेत.
नवापूर तालुक्यातील गताडी शिवारातील धरणाजवळ रोजण्या गावीत यांच्या शेतात नवीन विहिरीचे खोदकाम सुरू होते. या कामासाठी ट्रॅक्टर लावण्यात आले होते. सोमवारी रात्री काम आवरल्यानंतर विश्वास गावीत हा विहिरीजवळून ट्रॅक्टर घेऊन चालला होता. यावेळी त्याचा मित्र कृष्णा गावीत हा देखील ट्रॅक्टरवर होता.
विहिरीजवळून जात असताना अंदाज चुकल्याने ट्रॅक्टर 20 फूट विहिरीत कोसळला. यामुळे ट्रॅक्टरखाली दबून विश्वास आणि कृष्णा यांचा जागीच मृत्यू झाला.