
बीड जिल्ह्यातील पाटोद्याहून छत्रपती संभाजीनगर येथे परीक्षेसाठी जाणार्या अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्याची दुचाकी विरुद्ध दिशेने येणार्या उसाने भरलेल्या बैलगाडीला धडकली. या अपघातात चैतन्य वैद्यनाथ जायभाये (वय 20 रा. काकडहिरा, ता. पाटोदा, जि. बीड) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. हा अपघात धुळे ते सोलापूर महामार्गावर सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जालन्यातील वडीगोद्री डाव्या कालव्या जवळ झाला.
पाटोदा तालुक्यातील काकडहिरा येथील चैतन्य वैद्यनाथ जायभाये हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. त्याची छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी परीक्षा होती. ही परीक्षा देण्यासाठी चैतन्य पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारस काकडहिरा येथील घरून छत्रपती संभाजीनगरकडे दुचाकीवर निघाला होता. सकाळी वडीगोद्री डाव्या कालव्याजवळ विरुद्ध दिशेने येणार्या ऊस वाहतूक करणार्या बैलगाडीला दुचाकीची जोरदार धडक बसली. त्यात चैतन्य गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.