सुसाट दुचाकी स्कूल बसला धडकली, पालीजवळ अपघातात तीन ठार

सुसाट दुचाकी स्कूल बसला धडकल्याची घटना पाली- खोपोली राज्य महामार्गावरील कानसळ गावाजवळ आज दुपारी घडली. हा अपघात इतका भयंकर होता की यात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दुचाकीवरून उडून रस्त्यावर कोसळलेल्या तरुणांना पाहून प्रत्यक्षदर्शीच्या अंगावर काटाच उभा राहिला. या अपघाताची नोंद पाली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्याने धूम स्टाईल जीवावर बेतल्याचे समोर आले आहे.

श्रीराज एज्युकेशन सेंटरची स्कूल बस घोटावडे येथून शाळकरी मुलांना पालीकडे घेऊन जात होती. यावेळी पालीहून खोपोलीच्या दिशेने जाणारी भरधाव दुचाकी बसवर जाऊन आदळली. या बाईकवरून तिघेजण प्रवास करत होते. ही थरारक घटना स्कूल बसच्या पाठीमागून येणाऱ्या कारच्या डॅश कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या अपघातात तिघे ठार झाले असून मोनेश वाघमारे, नवनाथ जाधव, विलास घोगरे अशी मृतांची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सचिन निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सूर्यवंशी, पोलीस पथक यांच्यासह अपघातग्रस्त मदत टीम, अमित खिस्मतराव घटनास्थळी दाखल झाले.

जीवघेणी ठिकाणे

लेक सीटी, वावेगाव, दापोडे, कानसळ, खुरावले फाटा, परळी, मजरे-जांभूळपाडा