कल्याणमधून पळवलेले दोन चिमुकले डहाणूत सापडले

चारोटी नाका येथील उड्डाणपुलाखाली सहा जणांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू होते. तीन महिला आणि तीन पुरुष मोठमोठ्याने आरडाओरडा करून एकमेकांना बेदम मारहाण करीत होते. याची तक्रार दक्ष नागरिकांनी कासा पोलिसांकडे केली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी भांडण सोडवण्यासाठी आले आणि मुले पळवणाऱ्या मोठ्या टोळीचा छडा लागला. पोलिसांचे लक्ष याच ठिकाणी बसलेल्या दोन मुलांकडे गेल्यानंतर त्यांनी या मुलांची चौकशी केली. त्यावेळी घाबरलेल्या अवस्थेत बसलेली ही मुले रडू लागली. या सहा जणांनी आम्हाला दोन दिवसांपूर्वी कल्याणमधून पळवून आणले आहे, अशी करुण कहानी या मुलांनी पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी या सहा जणांना गजाआड करून दोन्ही मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.

चारोटी उड्डाणपुलाखाली तीन महिलांसह सहा जणांचे भांडण सुरू आहे. मोठमोठ्याने आरडाओरडा करून ते एकमेकांना मारहाण करीत आहेत, अशी माहिती दक्ष नागरिक चिराग मेहेर यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलीस भांडण सोडवण्यासाठी पुलाखाली गेले. त्यांनी भांडणही सोडवले. त्यावेळी तिथे दोन निरागस मुले घाबरलेल्या अवस्थेत बसलेली होती. हा प्रकार मांदळे यांना संशयास्पद वाटला. त्यांनी या दोन्ही मुलांची विचारपूस केली. त्यावेळी या दोन्ही मुलांनी आम्हाला कल्याण येथून पळवून आल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी विनोद गोसावी (29), आकाश गोसावी (28), अंजली गोसावी (28), चंदा गोसावी (55), जयश्री गोसावी (25) आणि राहुल गोसावी (27) यांच्या मुसक्या आवळल्या. सर्व अटक आरोपी हे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील विजयनगर येथील रहिवासी आहेत. त्यांनी आतापर्यंत किती मुले पळवली आहेत याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

गोड बोलून रिक्षात बसवले

अंबरनाथ येथे राहणारे सूरज मिश्रा (8) आणि सत्यम मिश्रा (5) हे दोघे कल्याणमध्ये आले होते. सहा आरोपींनी या दोन्ही मुलांना गोड बोलून रिक्षात बसवले. नंतर त्यांना पुढे रिक्षामधून चारोटी येथे आणले. ही मुले अचानक गायब झाल्यामुळे त्यांच्या पालकांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. ही मुले चारोटीमध्ये सापडल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक किरण भिसे, पोलीस हवालदार कदम, किरपण, मधाळे यांनी थेट कासा गाठले. अपहरण झालेली दोन्ही मुले पोलिसांनी त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे