विदर्भातील जंगल परिसरात गेल्या दहा दिवसांत दोन वाघांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. 8 दिवसांपूर्वी तुमसर येथे एक वाघ मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर भंडाऱ्यात आज सकाळी एका वाघाचे दोन तुकडे करून जंगलात फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या दोन घटनांमुळे वन विभागाची अक्षरशः झोप उडाली असून गुन्हेगारांचा कसून शोध घेतला जात आहे. वाघांच्या शिकारीची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनांवरून शिकार करणाऱ्या टोळय़ा सक्रिय झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
विजेच्या प्रवाहाच्या माध्यमातून वाघाची शिकार करून दोन तुकडे केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 8 दिवसांत दोन वाघांची हत्या करण्यात आल्याने वन विभाग अलर्ट मोडवर गेला आहे. वाघांची हत्या झाली की आणखी काही कारण आहे ही बाब उत्तरीय तपासणीनंतरच स्पष्ट होईल असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. गडचिरोली जिह्यात गेल्या वर्षी जून महिन्यात वाघाची शिकार करण्यात आली होती. ही टोळी वाघांची शिकार केल्यानंतर त्याच्या कातडीचीही तस्करी करत असल्याचे समोर आले. वन्यजीव कायद्यानुसार महाराष्ट्रात 7, आसाममध्ये दहा वर्षे शिक्षा ते जन्मठेपेची तरतूद आहे.
कल्ला आणि रुमाली या टोळय़ांचा धुमाकूळ
कल्ला आणि रुमाली या दोन टोळय़ांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या टोळय़ा कापडी पिशव्या विकण्याच्या बहाण्याने फिरत असल्याची माहिती मिळाली होती. एकाच ठिकाणी सहा पाय सापळे वाघाच्या पायात आढळले. ही घटना देशातील पहिली असावी अशी चर्चा आहे. या दोन्ही टोळय़ा 2023 पासून चंद्रपूर आणि गडचिरोली जिह्यात टेहाळणी करत फिरत होत्या. दरम्यान, आरोपी वाघाची शिकार करण्यासाठी लोखंडाचा पाय सापळा वापरत होते. ते पेंचीस, हातोडा, लोखंडी खुटी, कुऱहाड, फोल्डिंग चाकू, लोखंडी भाला, कैची, कानस, छन्नीचा वापर करत होते.
अशी करतात शिकार
एक पाय लोखंडी सापळय़ात अडकल्याने जखमी वाघ विशिष्ट परिघाबाहेर फिरू शकत नाही. शिकारी वाघ किती अंतरापर्यंत फिरू शकतो हे तपासून एक वर्तुळ आखतात. त्याच्या बाहेर उभे राहून वाघाला हुसकावतात. वाघ उठून फिरायला लागला की लाकडाच्या ओंडक्याने त्याच्या डोक्याच्या मधोमध मारतात. अर्धमेलेल्या वाघाने डरकाळीसाठी तोंड उघडले की लोखंडी भाला तोंडात टाकतात व त्याला मारून कातडी सोलतात.
चंद्रपूर शहरालगत वाघिणीचे दर्शन
यवतमाळच्या जंगलातील वाघीण धाराशीवच्या पायथ्याला दिसून आल्याने वन विभागाचे तिकडे लक्ष लागले आहे, तर चंद्रपूर शहरालगतच्या नांदगाव खुल्या कोळसा खाणीतही वाघिणीचा वावर असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही वाघीण कैद झाला असून बूम बॅरिअरजवळ तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाला ती दिसली. याची माहिती वन विभागाला मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघिणीला जेरबंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूरचे प्राणीसंग्रहालय आठवडाभर बंद राहणार; एच5एन1ची दहशत
नागपूरच्या गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात एच5एन1 एव्हियन एन्फ्ल्युएन्झा विषाणूमुळे तीन वाघ आणि एका बिबटय़ाचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राने राज्यातील प्राणीसंग्रहालये आणि वन्यजीव बचाव केंद्रांना राज्यव्यापी सूचना जारी केल्या आहेत. या घटनेमुळे खबरदारी म्हणून नागपूर विभागातील प्राणीसंग्रहालये बंद ठेवण्यात येणार आहेत. यात विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि प्राणी तसेच सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी तत्काळ उपाययोजनांची रूपरेषा आखण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शहरातील प्राण्यांमध्ये संसर्ग पसरू नये याची खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
‘त्या’ पर्यटकांना कायमची बंदी, चार जिप्सीचालक आणि गाईड्स तीन महिन्यांसाठी निलंबित
उमरेड कऱहांडला अभयारण्यात गेलेल्या पर्यटकांच्या वाहनांनी वाघीण आणि तिच्या पाच बछडय़ांना रस्त्यातच काही काळ घेरून ठेवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. त्यानंतर चार जिप्सीचालक आणि चार गाईड्स यांना प्रशासनाने तीन महिन्यांसाठी निलंबित केले आहे. जिप्सीचालकांना प्रत्येकी 25 हजार रुपये दंड, तर गाईड्सना प्रत्येकी 1 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात सहभागी असलेल्या पर्यटकांना उमरेड कऱहांडला अभयारण्यात येण्यास यापुढे कायमची बंदी घालण्यात आली आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने ही कारवाई केली आहे.
हायकोर्टाकडून गंभीर दखल
उमरेड-पवनी-कऱहांडला अभयारण्यात पर्यटकांच्या वाहनांकडून वाघांचा रस्ता अडवण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. ‘थर्टी फर्स्ट’ला असाच प्रकार घडला. याची उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतःहून गंभीर दखल घेतली आणि याबाबत सुमोटो जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांना दोन दिवसांत उत्तर सादर करण्याचेही आदेश दिले.