कळवा खाडीपात्रातील दोन हजार झोपड्यांना ‘रेड अलर्ट’ , प्रशासनाने दारोदारी चिटकवल्या धोक्याच्या नोटिसा

आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून कळवा खाडीपात्रातील 2 हजार झोपड्यांना ठाणे पालिकेने रेड अलर्ट दिला आहे. कळवा प्रभाग समिती हद्दीतील खाडीपात्रात बेकायदा राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. पावसाळ्याआधी जागा तत्काळ रिकामी करा, जीवितहानी झाल्यास पालिका जबाबदार नाही, अशा धोक्याच्या नोटिसा प्रशासनाने दारोदारी चिटकवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान पावसाळा सुरू होण्यापूर्वी झोपड्यांचा वापर बंद करून इतरत्र निवारा शोधावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

जून ते सप्टेंबर या चारही महिन्यांत सरासरीपेक्षा जोरदार पाऊस पडेल, असादेखील अलर्ट हवामान खात्याने दिला असल्याने ठाणे महापालिका आतापासून कामाला लागली आहे. ठाणे महापालिकेच्या कळवा प्रभाग समिती हद्दीत असलेल्या खाडीकिनाऱ्यावरील घरे अतिवृष्टीमुळे वाहून जाण्याच्या घटना मागील काही वर्षांत सातत्याने घडत आहे. ते सध्याच्या घडीला कळव्याच्या खाडीपात्रात 880 तर वनविभागाच्या जागेवर 995 अशा एकूण 1 हजार 875 बेकायदा झोपड्या उभ्या आहेत. अतिवृष्टीच्या काळात महाभरतीमुळे किनाऱ्यावर उभारण्यात आलेल्या झोपड्या व घरे वाहून जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता महापालिकेने वर्तवली आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी घरे रिकामी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कळवा प्रभाग समिती हद्दीतील खाडीकिनाऱ्यावरील झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना नोटिसा देण्याचे काम सुरू झाले आहे. दोन आठवड्यांत या भागात बेकायेशीररीत्या राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या घराबाहेर नोटिसा चिटकवण्यात येणार आहेत. झोपड्यांचा वापर तत्काळ बंद करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. – ललिता जाधव, (कळवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त)

हे आहेत हॉट स्पॉट
कुकाई देवी मंदिराचा खाडी परिसर, गजानन नगर, विटावा गाव, गणपती विसर्जन घाट, खारघर कंपाऊंड, कळवा नाका, जानकी नगर, मातोश्री शांतीनगर, जय भीम नगर, लहुजी नगर, महात्मा फुले नगर, खारेगाव गणेश विद्यालयाचा मागील परिसर.