
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या दोन दिवसांत आतापर्यंत सुमारे 500 पर्यटक राज्यात परतले आहेत. राज्य सरकारने इंडिगो आणि एअर इंडिया अशी दोन विशेष विमाने पर्यटकांसाठी केली होती. त्यातून 184 पर्यटक मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, आणखी 232 प्रवाशांसाठी उद्या एका विशेष विमानाची व्यवस्था सरकार करत आहे.
कश्मीरातील महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदनातील कक्ष अशी त्रिस्तरीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. उद्या कश्मीरातून येणाऱ्या विशेष विमानात अकोला, अमरावती येथील पर्यटक असणार आहेत. दिल्लीत महाराष्ट्र सदनात प्रवाशांच्या याद्या सातत्याने तयार केल्या जात असून गरज पडली तर परवाही विशेष विमान करण्याची तयारी राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे.